विलायत खाँ यांचे घराणे मूळचे रजपूत, पण पुढे मुस्लिम धर्म स्वीकारलेले. त्यांचा जन्म २८ ऑगस्ट १९२८ रोजी झाला. घराण्यात सूरबहार आणि सतारवादनाची पिढ्यानपिढ्यांची परंपराच होती. त्यांचे वडील उस्ताद इनायत खाँ हे त्या काळचे इटावा किंवा इमदादखानी घराण्याचे आघाडीचे सूरबहार आणि सतारवादक होते काका वाहिद खाँ यांच्याकडे त्यांचे सूरबहार आणि सतारीचे शिक्षण सुरू झाले. आई बशीरन बेगम यांचे माहेरचे घराणे गायकांचे, त्यामुळे आजोबा उस्ताद बंदे हसन आणि आई बशीरन बेगम कडून विलायत खॉंसाहेबांना गायकीची तालीम मिळायला लागली. एक वेळ अशी आली की सतारवादनाकडचे त्यांचे लक्ष कमी होत गेले आणि गायकीकडचा ओढा विलक्षण वाढला. आपल्या मुलाचे सतारवादनाकडे दुर्लक्ष होत आहे हे लक्षात आल्यावर बशीरन बेगमना आपल्या मुलाला स्पष्टपणे तुला संगीतक्षेत्रात जर नाव करायचे असेल, तर ते सतारवादक होऊनच करावे लागेल.
सतार वादनातल्या मर्यादा खाँ साहेबांमधल्या सतत अतृप्त असणाऱ्या कलावंताला, पट्टीच्या गायकाला अस्वस्थ करत होत्या. त्यांच्यावर मात करण्यासाठी खाँसाहेबांनी सतारीच्या रचनेत मूलभूत बदल करायला सुरुवात केली. ‘तब्ली, ‘जवारी’ या सारख्या भागांची रचना बदलत आणि पडदे मिळवण्याच्या पद्धतीचा तसेच चिकारीच्या तारेवर सातत्याने आघात करण्याच्या पद्धतीचा नव्या रचनेशी ताळमेळ साधत खाँसाहेबांनी सतारीतल्या मींड, गमक वाजवताना येणार्याण मर्यादांवर मात केली. डाव्या हाताने तारा खेचण्याचे नवे तंत्र विकसीत करत ख्याल गायकीतली आलापचारी, तानक्रिया तिच्या सगळ्या बारकाव्यांसकट सतारीवर उतरवायला सुरुवात केली. विलायत खाँसाहेबांची रियाजाची पद्धतही अफलातून होती.
एक मेणबत्ती पेटवायची, ती विझेपर्यंत एक पलटा घोटून काढायचा. मेणबत्ती विझली की छोटीशी विश्रांती, थोडेसे धूम्रपान आणि मग पुढची मेणबत्ती पेटवायची आणि दुसरा पलटा सुरू! सिगारेटचा माझ्याइतका विधायक उपयोग कुणीच केला नसेल असे पुढे खाँसाहेब गमतीने म्हणायचे. गायकीतल्या निरनिराळ्या घराण्यांचा अभ्यास करत, त्यातली सौंदर्यस्थळे सतारीवर सही सही वाजवून काढत सतारीला चक्क ‘गाता गळा’ दिला. सतारीवर वाजवल्या जाणाऱ्या ‘गायकी अंग’ या नव्या बाजाचे विलायत खाँसाहेबच जनक आहेत, ‘आर्किटेक्ट’ आहेत असे म्हणावे तर अतिशयोक्ती होणार नाही. विलायत खाँ यांचे १३ मार्च २००४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply