जगामधल्या जर पाच सर्वश्रेष्ठ लघुकथा लेखकांची यादी केली तर ओ’हेनरी याच नाव त्यात आवर्जून घ्यावं लागतं.अवघे सत्तेचाळीस वर्षाचं आयुष्य लाभलेला हा लेखक आपल्या कथा लिखाणामुळे इतका अजरामर झालेला आहे की उत्कृष्ट लघु कथा कशी असावी असं जर कोणी विचारलं तर टीकाकार आणि जाणकार समीक्षक एकच उत्तर देतात, लघुकथा फक्त ओ’हेनरी याच्या कथे सारखी असावी. अशी अदभूत मोहिनी त्याने साहित्य विश्वाला घातली होती.
11सप्टेंबर 1862, साली त्याचा जन्म अमेरिकेत ग्रीन्सबोरो गावात झाला. तो तीन वर्षाचा असतांनाच त्याची आई वारली. वडील डॉक्टर होते. लहानपणापासूनच त्याला अभिजात साहित्य वाचण्याची आवड होती. अरेबियन नाईट हे बुरट्रान चं पुस्तक त्याला खूप आवडायचं. ग्रॅजुएट झाल्यानंतर त्याच्या काकांचं औषधाचं दुकान होतं. तिथं तो काम करू लागला. आणि वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्याला *रजिस्टर्ड फार्मासिस्ट* ची पदवी मिळाली. दुकानात काम करत असतांना देखील तो लोकांचं निरीक्षण करून चित्र रेखाटायचा.
सततच्या खोकल्या मुळे तो हवापालट करायला टेक्सासला आला. तिथं मोर्ली ब्रदर्स ड्रग कंपनी मध्ये तो कामाला लागला. त्या ठिकाणी त्याने थोडंफार लिहायला सुरुवात केली. त्याला संगीताच उपजत ज्ञान होतं. गिटार आणि मंडोलीन तो खूप छान वाजवत असे.गोष्टी रंगवून सांगणं पण त्याला खूप छान येत असे.
याच काळात तो सतरा वर्षाच्या एथॉल इस्ट्स नावाच्या सुंदर आणि श्रीमंत मुलीच्या प्रेमात पडला.त्याच्या घरच्या लोकांना हे लग्न पसंत नव्हतं म्हणून त्याने पळून जाऊन लग्न केलं. त्याला एक मार्गारेट नावाची मुलगी होती. टेक्सास मध्ये तो ड्राफ्ट्समन म्हणून नोकरी करू लागला. त्या वेळी त्याला शंभर डॉलर पगार होता.
नंतर त्याने ऑस्टिन मध्ये फर्स्ट नॅशनल बँकेत क्लार्क म्हणून नोकरी जॉईन केली.त्या वेळी तो पेपर मध्ये रोलिंग स्टोन नावाचं सदर चालवत असे. सगळं काही सुरळीत चालू असतांना अचानक त्याच्या वर बँकेत अफरातफर केल्याचा आरोप ठेवण्यात आला. आणि त्याला पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली.
तुरुंगात असतांना तो दिवसा कथा लिहीत असे आणि फार्मासिस्ट असल्याने जेल मधील दवाखान्यात फार्मासिस्ट म्हणून काम करत कैद्यांची सेवा करत असे. या काळात त्याने जवळ जवळ 381 कथा लिहून काढल्या.आपले खरे नाव कोणाला समजू नये म्हणून त्याने ओ’हेनरी हे टोपण नाव धारण केलं. तो पर्यंत बाहेरच्या जगात त्याच्या कथा अमाप लोकप्रिय झाल्या होत्या.जगातल्या बहुतेक सगळ्या भाषांमध्ये त्याच्या कथांची भाषांतर झाली होती. पण तो जेल मध्ये होता तो पर्यंत कोणालाच माहित नव्हतं की या कथांचा जनक जेल मध्ये आहे. असा हा विल्यम सिडनी पोर्टर एक अफरातफर केलेला गुन्हेगार म्हणून जेल मध्ये गेला, पण बाहेर आला तो दिगंत कीर्ती मिळवलेला प्रसिद्ध लेखक ओ’हेनरी म्हणून.
त्याच्या जेल मधल्या कालावधीत त्याची पत्नी क्षयाने मरण पावली होती. त्याच्या मुलीला आपले वडील जेल मध्ये आहेत हे कळू दिलं नव्हतं. नंतर त्याने पुन्हा लग्न केलं. आता त्याचं लिखाण यशाच्या आणि कीर्तीच्या शिखरावर होतं. याच काळात डायबेटीस आणि श्वसनाच्या आजाराने तो खूप आजारी झाला. आणि वयाच्या अवघ्या सत्तेचाळिसाव्या वर्षी त्याचं निधन झालं.
सरस्वतीच्या दरबारात आणि लोकांच्या मनात त्याने अत्यंत मानाचं स्थान प्राप्त केलं. जो पर्यंत इंग्रजी भाषा जगात राहील तो पर्यंत ओ’हेनरी हे नाव अत्यंत आदराने घेतलं जाईल. त्याची ‘गिफ्ट ऑफ द मॅगी’ ही कथा जगप्रसिद्ध आहे. अशा या प्रतिभाशाली लेखकाला मानाचा मुजरा.
(मागे हिंदी मध्ये ‘रेनकोट ‘ नावाचा एक चित्रपट ओ’हेनरी च्या कथेवरून निर्माण केला गेला होता.या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले होते.)
-दत्ता जोशी,अंबरनाथ
आम्ही साहित्यिक चे लेखक
Leave a Reply