जागतिक कीर्तीचे व्हायोलिनवादक पद्मश्री डी के दातार यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९३२ रोजी झाला.
पंडित दामोदर केशवराव अर्थात पं.डी.के.दातार यांची व्हायोलिनची वादनशैली गायकी अंगाची म्हणजे गायनाशी नातं आणि इमान राखणारी होती. खरेतर पंडितजींचे घराणे गायकाचे. त्यांचे वडील केशवराव आणि गायनाचार्य विष्णु दिगंबर पलुस्कर हे गुरुबंधु. त्यामुळे पंडितजींकडे गायनाचा वारसा परंपरेने आलाच होता. मात्र पंडितजी अवघे सहा वर्षांचे असतानाच केशवरावांचे निधन झाले. परिणामी, त्यांच्याकडून गाण्याची संथा मिळालीच नाही. तरीही वडीलबंधु नारायणराव आणि मामा दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांनी पंडितजींवर लहानपणी गाण्याचे उत्तम संस्कार केले. या संस्कारांमुळेच पंडितजींनी लहानपणी गाण्यात उत्तम तयारी दाखवलीही. पण त्यांचे भाह्याच काही वेगळेच होते. ते गाण्यात रमलेले असतानाच एक दिवस नारायणरावांनी त्यांच्या हातात व्हायोलिन दिले. गुरूची आज्ञा शिरसावंद्य मानून पंडितजींनी व्हायोलिन शिकायला सुरूवात केली.
१९४३ मध्ये ते देवधर मास्तरांच्या ‘स्कूल ऑफ इंडियन म्युझिक’मध्ये दाखल झाले. तिथे पंडित विघ्नेश्वरशास्त्री यांच्यासारखे व्हायोलिनवर कमालीचं प्रभुत्व असलेले गुरू त्यांना लाभले. विघ्नेश्वरशास्त्रींनी आपली सारी कला या प्रज्ञावंत शिष्याच्या झोळीत टाकली. मात्र पं. दातार यांनीही मिळालेले दान अंधपणाने स्वीकारले नाही. आपल्या प्रतिभेने त्यांनी ते अधिक झळझळीत केले. वास्तविक पं. दातार व्हायोलिन शिकत होते, तेव्हा श्रीधर पार्सेकर, गजाननबुवा जोशी यांनी व्हायोलिनवादनात चांगलेच नाव कमावले होते. परंतु तोपर्यंत व्हायोलिन हे फक्त वाद्याच्या अंगानेच वाजवले जायचे. परंतु डी. के. दातार गायन शिकलेले असल्यामुळे त्यांनी ते गायकीच्या अंगाने वाजवायला सुरुवात केली. त्यामुळेच त्यांचे व्हायोलिनवादन ऐकताना आपण गायनाची एखादी मेहफील ऐकत आहोत, असाच भास होतो.
पं. डी. के. दातार यांच्या आधी १०० वर्षांची व्हयोलिनवादनाची परंपरा असलेल्या कर्नाटक संगीतात गायकी अंगाने व्हायोलिन वाजवण्याची पद्धत होती. परंतु हिंदुस्थानी संगीतात ती रुजली नव्हती. ती रुजवण्याचे मोठे काम पं. दातार यांनी केले. पं. डी.के. दातार यांनी विघ्नेश्वर शास्त्री पंडितांकडे व्हायोलिन वादनाचे धडे गिरविले. पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे पुत्र डी. व्ही. पलुस्कर यांचा सहवास पं. दातार यांना लाभला. त्यांनी डी. व्ही. पलुस्कर यांना अनेक कार्यक्रमांमधून संगतही केली.
पं. दातार यांना पद्मश्री आणि संगीत नाटक अकादमीचा सन्मानही मिळाला आहे. संगीत रिसर्च अकादमी आणि कुमार गंधर्व फाऊण्डेशन यांनीही पं. दातार यांचा गौरव केला आहे. परदेश दौऱ्यांमध्ये जगातील अनेक देशांमध्ये त्यांच्या वादनाचे चाहते आहेत. त्या ठिकाणी त्यांच्या वादनाचे कार्यक्रम गेली अनेक दशके आवर्जून आयोजित करण्यात येत असत.
भारतातील अनेक विद्यापीठांमध्ये पं. दातार अध्यापन करीत असत. पं डी.के.दातार यांचे निधन १० ऑक्टोबर २०१८ रोजी झाले.
पं. डी.के.दातार यांना आदरांजली.
पं. डी.के.दातार यांचे व्हायोलिन वादन.
https://www.youtube.com/watch?v=lzzef-4idyc
https://www.youtube.com/watch?v=WnB4iaAVedc
https://www.youtube.com/watch?v=EemtViN7zM8
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply