ऐक्याचं मुद्दल जर मोडत नसेल आणि भक्तीचा विलास जर करता येत असेल, ऐक्याच्या मुद्दलाला धक्का न लागता म्हणजे अद्वैत अवस्थेला धक्का न लागता जर भक्ती होत असेल तर का न करावी? सागराला बाधा न येता जर त्याच्या वरची लाट त्याच्या वरचा तरंग होऊन मजा जर भोगता येत असेल तर का न भोगावी?
या लागीं हा अक्षरू। ऐसा वेदांती डगरू।
केला देशीं थोरू। सिद्धांताच्या ।।
याप्रमाणे वेदान्तशास्त्राच्या सिद्धान्तात याच्यावर अक्षराचा आरोप केला. ज्ञानावाचून याचा नाश होत नाही. याप्रमाणे जीव कारण व कार्य हे होण्यासाठी परमेश्वराशी मायेचा संबंध असणे हे जरुरीचे आहे. मायेच्या संबंधी जो ईश्वर त्याला अक्षर म्हणतात. अगदी बाईच्या मागे लागलेल्याला बाईलवेडा म्हणतात तसा. हा सर्व संसार आहे, यात अज्ञानाचा भाग फार मोठा आहे. म्हणून या संसारातला क्षर-अक्षर भाग समजून घ्या आणि पुरुषोत्तमापर्यंत पोहचा!
ऐसे जीवकार्य कारण। जया मायासंगुचि लक्षण। अक्षर पुरुषजाण। चैतन्य तें ।।
म्हणून त्या मायेशी संबंधित असणाऱ्या चैतन्याला ‘अक्षरपुरुष’ असे म्हणतात.
आता अन्यथा ज्ञानी।
या दोनी अवस्था जयाजनी।
तथा हरपती धनी। अज्ञानत्वी।।
आता विपरीत ज्ञानाने या जगात उत्पन्न होणाऱ्या जागृत व स्वप्न या अवस्था आहेत. त्या तत्काल अज्ञानात लय पावतात. हा विषय पुन्हा पुन्हा ज्ञानेश्वरीत येतो. कारण काय तर हे नीट समजण्यासाठी! पुन्हा सांगतो, विपरीत ज्ञानाने निर्माण होणाऱ्या जागृती व स्वप्न या ज्या दोन्ही अवस्था आहेत. विपरीत ज्ञानाने काय उत्पन्न झाले तर एक जागृती व दुसरे स्वप्न! त्या ज्या गाढ अज्ञानात लय पावतात.
ते अज्ञान ज्ञानी बुडालिया।
ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया।
जैसा वन्हि काष्ठ जाळूनिया।
स्वयें जळे।।
अग्नी व ज्ञान या दोन्ही ‘सापेक्ष’ कल्पना आहेत. अज्ञान संपल्यानंतर तत्सापेक्ष जे ज्ञान आहे, तेही संपले. ते अज्ञान ज्ञान बुडालिया, मग ज्ञान कुठे बुडाले? तर ज्ञानात! ज्ञानात बुडाल्यानंतर ते काय शिल्लक ठेवणार? मग ज्ञानही गेले. वस्तु ठेवूनी ‘गेले. ‘निजानंद रूपात’ ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही. आनंद आहे.
– बाबा महाराज सातारकर
संकलन : शेखर आगासकर
Leave a Reply