नुकतेच आम्ही दोन दिवसांसाठी एका रिसोर्टला भेट देऊन आलो आणि आल्या आल्याच त्याने मान टाकली.
कळतंय का तुम्हाला??? दोऽऽऽन दिवस त्याच्याशिवाय…
माझ्या बायकोने काढले. कसे काढले तिलाच माहित. खूऽऽऽप खूऽऽऽप त्रास होत होता तिला, लक्ष कशा कशात लागत नव्हतं, जीवन असार आहे असं वाटू लागलं होतं. तसा मी(आयुष्याचा साथीदार)आणि आमचा लेक घरातच होतो जवळच तिच्या, म्हणजे काही जास्त त्रास झाला तर काळजी घ्यायला. लग्नाचा नवरा, पोटचा पोर पण त्याची कमतरता का कुठे आमच्यामुळे भरून येणारय??? आणि आमच्याकडे, आमच्या आजूबाजूला तो सतत तिला दिसत होता, त्यामुळे अपमान, असूया, डोक्याची आग, विरहाचं दुःख आणखीनच वाढत होतं. अधून मधून डोळ्यात याचनाही दाटत होती, आणि कधी नव्हे ती स्वरात अजिजी, मऊपणा आणि षड्जाच्या जागी खर्ज लागत होता. म्हणजे असं,
“दे ना रे थोडा वेळ तुझा फोन माझी सिरीयल पाहायला. देतोस का? प्लिज दे ना.”
आम्ही परिस्थितीचा फायदा घेऊन “नाही” म्हटल्यावर,
“असं वागतात का कुणी बायकोशी /आईशी? मी तुमची आहे ना?”
हा टोन खरंच रेकॉर्ड करून ठेवण्यासारखा होता. एव्हढ्यावरच हे थांबत नव्हतं तर स्वगतं सुद्धा सुरू होती, Soliloquy हो,
“एव्हढासा असतो पण किती वेड लावतो ना?? माझ्या सगळ्या मैत्रिणी काय म्हणत असतील? त्यांना कळतच नसेल मी अचानक कुठे गायब झाली… माझ्या good morning शिवाय त्यांचा दिवस कसा चांगला जाणार?”
पुढचं स्वगत आमच्याकडे पाहून,
“बघा कसे बसलेयत फोन घेऊन ! काही वाटतंय का? माझ्याकडे फोन नाहीय तर बाबा द्यावा आपला फोन हिला थोडा वेळ. प्रेमच नाही तर वाटणार कसं? कंटाळा आलाय अगदी, पण आहे कोण घरात हे समजून घ्यायला?” अशी थोड्या थोड्या वेळाने Soliloquy सुरू होती.
“कित्ती प्रेमाने जपते मी त्याला, तर असं कसं झालं? आता अगदी जपून ठेवणार.”
मग माझ्या मागे लागून दोन फोन झाले दुकानात. दुसऱ्या वेळी तो म्हणाला की तुमचा सगळा डेटा जाणार, सगळे फोटो उडणार, चालेल ना?
हे ऐकून कळच आली हिच्या छातीत.
“पण होईल ना व्यवस्थित पूर्वीसारखा?”
त्यावर तो हो म्हणाला, आणि ही समाधान पावली.
डेटा जाण्याचं दुःख एका डोळ्यात, आणि तो बरा होऊन परतणार याचा आनंद दुसऱ्या डोळ्यात मावत नव्हता.
घरातली तिची कामं ती यंत्रवत निपटत होती, पण रोजचा जाणवणारा उत्साह, प्रफुल्लित चेहरा आणि थोड्या थोड्या वेळाने मिळणारा त्याचा सहवास आज कुठेच दिसत नव्हता. स्वयंपाक, आवरणं, इतर कामांच्या मध्ये आणि ती आटोपल्यावर करायचं काय??? प्रचंड पोकळी आणि मोकळेपण जाणवू लागलं तिला.
अखेर निकराचा, तिसरा फोन केला आणि तिकडून शब्द आले,
“मॅडम, तुमचा फोन रेडी झालाय. घेऊन जायला हरकत नाही.”
आणि एका क्षणात हीचा चेहरा पूर्वीसारखा चमकू लागला. आनंद, उत्साह संपूर्ण चेहऱ्यावर उमटला. ती अजिजी पूर्ण गेली नव्हती, कारण त्याला आणल्यावर डेटा restore करण्यासाठी लेकाची गरज भासणार होती. त्यामुळे माझ्याकडे मात्र पूर्वीसारखा कटाक्ष टाकून, हिने लेकाला, त्याला आणायला पिटाळलं. जपून आणण्याच्या सूचना दिल्या. उत्साहाने चहा केला. इतक्यात तो घरी येऊन पोहोचला. त्याला प्रेमाने कुरवाळत आणि मायेने गोंजारत जणू ही त्याला विचारत होती,
कुठे होतास रे दोन दिवस? कसे काढले हे दोन दिवस मी माहिती आहे का? आता सांभाळून राहायचं बरं .’
दोघं एकत्र आली आणि ते अजिजीचे स्वर संपले..
— प्रसाद कुळकर्णी.
Leave a Reply