पहाटेच धुकं नजरेसमोर पसरलेलें,
आनंदाचा दवबिंदू अलगद पानावर पहुडलेला,
अचानक वादळ आलं, अबोल अजानतं,
होत्याचं- नव्हतं करत, सर्व नष्ट करून गेलं!
मन कशातच गुंतत नाही,
आठवण आठवणींची आठवतही नाही,
काल होता आज आहे उद्या असेलही कदाचित,
काळासोबत अनमोल ते हास्य खुलणार नाही!
सहवास होता,सदोदित साथ देणारा,
संयम होता, माझे बोल झेलणारा,
जिद्द होती, नितांत प्रेम करण्याची,
खुपलं नियतीच्या डोळ्यात सारं,
कधी पूर्ण न होणार कस्तुरी-मृगेचं नातं!
वाट बघणार मन केव्हाच गेलं निजून,
शब्दही झाले निःशब्द पुरतं मौन धरून,
झोपेतलं सुंदर स्वप्न विरहाने गेलं विरून,
शापित ठरले नशिब अंबा सारखे,
या जन्मात जन्म घेऊन!
चिता रचली आपल्या नात्याची,
फुंकर ओठांची पोहचली नाहीं,
आटून गेले डोळे, आसवांची ओंजळ भरली नाही,
पोळणाऱ्या या राखेत, दडलायस का कुठे तू ?
शोधतेय मी सतत तुला, येशील का पुन्हा तू?
– श्र्वेता संकपाळ.
Note- (अंबा – काशी राज्याची जेष्ठ कन्या)