विसरून साऱ्या ताणतणावां ,देवा तुझ्या कुशीत यावे,
करून निश्चिंत आपुल्या मनां, वरूनच पृथ्वीला बघावे,–!!!
कलंदर वावरणाऱ्या ढगां,
सोबत घेत दूरवर हिंडावे,
चहूकडे अन् चहूदिशांना,
आनंदाने गात फिरावे,–!!!
ताऱ्यांसवे फेर धरतां,
गगनाला मुठीत घ्यावे,
पिऊन आधी रजतकणां,
धरणीकडे अभिमानें बघावे,–!!!
नकोत भय भीती चिंता,
विद्युतलतेसह हिंडावे,
कुणी कुठे दहशत माजवतां, लख्खकन कसे चमकून उठावे,-!
पाहण्या सूर्य चंद्राला,
मेघांच्या मऊ दुलईत शिरावे,
पिट पिट करती जेव्हा पापण्या, प्रखर तेजाने भानही विसरावे,–!
वार्याबरोबर दाही दिशा, आपणही सुसाट सुटावे ,
झुगारत सगळ्याच बंधना,
अतुल वेगे मस्त फिरावे,–!!!
वादळासह पृथ्वीवर फेरा,
मनमुराद जिकडेतिकडे घुसावे भयकंपित करत साऱ्या जनां, दराऱ्यात कसे बांधून ठेवावे,
हिरवा गार पसरला गालिचा, नभातून विहंगम दृश्य दिसावे
शक्य तेवढे वसुंधरेला,
वरून प्रदूषणमुक्त करावे,–!!!
© हिमगौरी कर्वे
Leave a Reply