परवा निवडणुकीच्या निमित्ताने एका संस्थेशी संबधित एक सज्जन संचालक गृहस्थ आम्हाला म्हणाले, संचालक म्हणजे लांडगे आहेत. लांडग्यांचा कळप… एक लांडग्याला जमिनीत पुरतात.फक्त मुंडके वर ठेवतात. ते पाहण्यासाठी बकऱ्या जातात तेव्हा लांडगा त्याला हव्या असलेल्या बकऱ्यांचा तोंडात पाय करकचून पकडतो. त्यामुळे अन्य बकऱ्या पळून जातात. मग पकडलेल्या बकरीचा समाचार घ्यायलाl लांडगे लक्ष्याच्या ठिकाणी एकत्र येतात. तेव्हा सज्जन गृहस्थाला आम्हीच सांगितले, बाबारे ….! बकऱ्यासाठी सापळा रचताना कधी काळी वाघ सिंह आले तर जमिनीत पुरलेल्या लांडग्याचे कसे होईल. ते निरुत्तर झालेच,पण उलट त्यांनी हसून दाद दिली.
*खिळ्याकारीने नाल गेला
नालाकारीने घोडा
घोड्याकारीने स्वार गेला
इतका अनर्थ एका खिळ्याने केला*
तात्पर्य सांगायचे झाले तर नुकत्याच पार पडलेल्या विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत केवळ एका माणसामुळे निवडणुकीला सामोरे जावे लागल्यामुळे लाखो रुपयाची धूळधाण झाली. हा अनर्थ कसा झाला, कुणामुळे झाला, याला जबाबदार कोण …? याचं आत्मपरीक्षण संबधितांनी करणे गरजेचे आहे. खरं तर ते या लाखो रुपयाचा चुराडा वाचवू शकत होते, परंतु आपली मनसबदारी कोणी सोडायला कबूल नव्हते. निवडणूक आहे कोणी तरी निवडणुकीला उभे राहणार , त्यात काही गैर नाही. कारण त्यांचा तो हक्क आहे. आता कोणी उभे राहायचे, यावर ढोबळमनाने विचार केला तर उमेदवार हा सामाजिक बांधिलकी जपणारा, चारचौघात उठणारा बसणारा, त्या संस्थेशी आस्था असणारा, त्यांच्या कार्यात योगदान करणारा असावा, हे साधे सरळ गणित आहे. परंतु अती सामान्य वकूबाची माणसं नेतृत्व हातात घेण्याचा प्रयत्न करतात. हे चुकीचे वाटत असले तरी सभासद आहे. त्यांना डिवचण्याचा किंवा यापुढे कधीही निवडणूक लढवू नका, असा सल्ला देत नाही. आपला तसा हेतू नाही. बरेच लोक निवडणुकीच्या रिंगणात उतरतात पण माघार घेतात कारण संबधित संचालक समूह रूपाने त्या त्या माणसाला काही तरी गाजराचं आमिष दाखवितात. त्यामुळे त्यांना आकाशाला गवसणी घातल्यासारखी वाटते, राजकारणात, सहकार क्षेत्रात अशा गोष्टी होत असतात. सर्वसामान्य माणूस निवडणुकीच्या विचारात पडत नाही. समोर येईल त्याचा तो बुद्धीपेक्षा भावनेने आदर करतो.
ही विशाल जुन्नर नावारूपाला आलेली संस्था आहे समस्त सभासदांना त्याचा सार्थ अभिमान आहे. जुन्नर तालुक्यात पुणे, मराठा सारख्या अनेक संस्था होऊन गेल्या. भोंगळ आणि भ्रष्ट कारभारामुळे बुडाल्या. आजही ज्यांचे पैसे गेले ते टाहो फोडत आहेत. विशाल जुन्नरच्या सभासदांना असे वाटत होते की, लोकांना संस्थेविषयी आस्था आहे. प्रेम आहे, जिव्हाळा आहे. त्यामुळे आता पर्यंत चांगले चालले आहे ना ….! चालू द्या म्हणून डोळेझाक करीत होते. परंतु विशाल जुन्नर संचालकांविषयी प्रचंड नाराजी आहे. हे झालेल्या मतदानावरून सिद्ध होते. जेव्हा इतके मतदान कमी प्रमाणात होते., तेव्हा संस्थेवरची विश्वासार्हता गमावलेली आहे. त्यांच्या विषयी मनात असलेली ओल आटत चालली आहे. असा अर्थ होतो की, काही दिवसांपूर्वी आम्हाला घरोघर निनावी पत्र पाठविली गेली. हे अनेक वेळा झाले पत्रे येतात चर्चा होतात. सभासदांना ठाऊक नसलेल्या घटनांचा पाढा पत्रात वाचलेला असतो. पण ही पत्रे पाठविणारे आपल्या संचालकांशी संबधित आहेत. छुप्या पद्धतीने नाराजी व्यक्त करताना कोणी संस्थेला बदनाम करीत असतील तर आतापर्यंत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल का केली जात नाही…? यामुळे सत्शील,सद्प्रवृत्त माणसाला नालायक म्हणून संबोधत असतील तर कायदेशीर कार्यवाही केली जावी. जर संस्था करायला धजावत असेल तर सभासदांनी याला आळा घालावयास हवा. यामुळे संस्थेची विश्वासार्हता धुळीस मिळत आहे. हे समस्ताना सांगणे आवश्यक आहे. विशाल जुन्नर विषयी किंवा त्यांच्या गौरवास्पद कामगिरीविषयी मी काही वर्षापूर्वी आपला वार्ताहर या दैनिकात लेख लिहिला होता. (संचालकांना विसर पडला असेल ) जे चांगले काम त्याचा आवर्जून उल्लेख करावा , असे मला वाटते. निवडणुकीच्या कालावधीत उमेदवार एका खोलीत बसले होते. संरक्षणात्मक व्यूह रचना सुरु असावी. मला पाहिले अन त्यांचे डोळे भिरभिरले. चटकन दार बंद झाले. पारदर्शकता नको. आत्मविश्वास आणि त्यातून निर्माण होणारी संरक्षणात्मक आणि प्रतिकाराची शक्ती गमावली की, माणसं अशी वागतात. निवडणुकीला कोणीही उभे राहावे, ज्यांच्या त्यांच्या मनाचा प्रश्न आहे. आमची मित्रमंडळी त्या समूहात असल्यामुळे निवडणुकीचा विचारही मनात शिवत नाही.
या संस्थेत संस्थापक सदस्य सुभाष शिंदे यांचे योगदान फार मोलाचे आहे. ते हयात नाहीत. संस्था विस्तार होत आहे. रौप्यमहोत्सवी वर्षात सभासदांना काय वाटायचे, या विषयावर काळाचौकीतील महानगरच्या कार्यालयात सभा होती. वक्त्यांनी अनेक सूचना केल्या. आम्ही त्यांना एक सूचना केली. तितक्या रक्कमेचे बोनस रुपी शेअर वाटावेत जेणे करून भविष्यात जो पर्यंत लाभांश मिळत राहील तो पर्यंत सभासदांना रौप्यमहोत्सवी वर्षाची आठवण येत राहील. त्यावर अनेकांनी सभेत विरोध केला पण नंतर देताना मात्र बोनस दिला. आपले सारे सत्य, बाकीचे सारे मिथ्या…! ही भावना जडलेली आहे. आताही या निमित्ताने एक सूचना करावीशी वाटते की, विशाल जुन्नर समूहातील सभासद ज्याची कामगिरी अत्युत्तम आहे. योगदान मोलाचे आहे. अशा सर्वसामान्य सभासदाला *कै.सुभाष शिंदे* यांच्या नावे *विशाल जुन्नर गुणवंत सभासद* हा पुरस्कार संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिला जावा. जेणे करून या संस्थापक सदस्याला खरीखुरी श्रद्धांजली अर्पण केली जाईल. प्रस्ताव आहे. विचार करणे वा न करणे हे संस्थेनी ठरवायचे आहे. लिहिण्यासारखे बरेच काही आहे हल्ली स्पष्ट बोलल्याने अथवा लिहिल्याने बरेच जन नाराज होतात. निवडून आलेल्या सर्व संचालकांचे घोडपदेव डी पी वाडी समूह हार्दिक अभिनंदन करीत आहे.
Leave a Reply