नवीन लेखन...

विश्वची विश्व पहा जगती अन धावती

बी रुजते, वाढते, त्याचे रोपटे होते, रोपट्याचा वटवृक्ष होतो. बी ला माहिती नसते तिच्या आत दडलेल्या वटवृक्षाच्या अस्तित्वाची. तिची सृष्टी वेगळी असते. पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक सजीवाची सृष्टी वेगळी, त्याची रचना वेगळी. मानवी विश्वात प्रत्येक माणुस स्वत:ची वेगळी सृष्टी बाळगुन असतो. आपल्याच विश्वात रममाण झालेला. त्याची दु:खे, त्याचे सुख याचे कारण आणि निराकारण तोच करू शकतो. जसा अवकाशाच्या सृष्टीला अंत नाही, तव्दतच मानवाच्या आत दडलेल्या सृष्टीला देखील अंत नाही. ती अनादी आहे, अनंत आहे. मानसिक पातळीवर तेथे ही अनेक उलथापालथी होत असतात, बदल घडत असतात, हे शतक धावपळीचे आहे, स्पर्धेचे आहे. स्पर्धा जशी स्वत:शी आहे, तशीच इतरांशी देखील आहे. स्पर्धेच्या या जगतामध्ये प्रत्येक सजीव आपापली सृष्टी सांभाळून आहे, हे विशेष…

घराच्या अंगणात खेळणाऱ्या बाल गोपाळांना पाहून त्यांच्या भावविश्वाची कल्पना मनाला स्पर्शुन गेली. बालपण म्हणजे निरागस, निरलता आणि निर्लेप मनाचे विश्व. सगळ्यांकडे एकाच नजरेने बघण्याची दृष्टी. कोणाची जात माहिती नाही, त्याचा वर्ण महत्वाचा नाही. बालपणाचे हे भावविश्व साधे-सरळ आणि सोपे. क्षणात रागवायचे, क्षणात हसायचे. ना राजकारण माहित, ना कुणाला खाली खेचण्याची स्पर्धा माहिती. खेळणारे सर्वच जिंकतात, सर्वच हरतात. खेळात जो राजा असतो, पुढच्या क्षणाला तोच चोर बनुन खेळतो देखील. बालमनाच्या विश्वात अनंत प्रश्न जन्म घेतात, अन विरुनही जातात…

इमारतीच बांधकाम सुरू होत. बाजुलाच रखवालदाराची झोपडी होती. त्याची चिल्ले-पिल्ले बांधकामाच्या ठिकाणी टाकलेल्या वाळूवर खेळतात, बागडतात, त्यांना खेळण्यांची गरज लागत नाही. रखवालदार इमाने इतबारे बांधकामावर पाणी मारत असतो. त्याची बायको चुल पेटवुन काहीतरी शिजवत असते. रखवालदाराच्या भावसृष्टीत ‘दिवस भर काम तरच रात्री भाकर’ असेच येत असेल ना? मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता त्याला सतावत नसेल का? चांगले घर असावे असे स्वप्न तो पाहत नसेल का? की त्याच्या जगण्या प्रमाणेच त्याची सृष्टी देखील उजाड झालेली असेल. स्वत:ची स्वप्ने तुडवत, परिस्थितीशी समझोता करत जगण्याची लक्तरे पांघरत, श्वासांचे येणे-जाणे सुरू असेल…

घरात भाड्यांचा आवाज मोठ्याने यायला लागला की समजायचे मालकीणीचे काहीतरी बिनसले आहे. तिच जग जिथे बहरते, सजते आणि खुलते ते म्हणजे स्वयंपाकघर. याठिकाणी ती स्वत:शी संवाद साधत असते. बोलत असते. घरातल्या सदस्यांच्या आवडी-निवडी राखत स्वत:ची आवड बाजुला सारत असते. तिचे विश्व म्हणजे तिचं घर, तिची मुले अन तिचा पती. या सगळ्यांच्या सुखातच तिचं सुख. तिच स्वत:च अस काय असत. मनातून मात्र तिलाही वाटत असत पहाटे उशीरा पर्यंत ताणून द्यावी. कुणीतरी चहा आणुन द्यावा. एखादा दिवस कामातून सुटी मिळावी. मनातलं सगळं ऐकुन घेणारं कुणीतरी हक्काच असावं. दिवसभर राबराब राबणाऱ्या शरीराला अन मनाला सुखाचे दोन शब्द बोलणारा कुणीतरी आपला असावा. तिच्या अंतरंगातलं तिचं विश्व बाजुला सारून ती जगत असते इतरांची स्वप्न पुर्ण करण्यासाठी…

जगण्याच्या रहाट गाड्यात धावतांना अनेक विश्व आपल्या अवती-भोवती फिरत असतात. जो-तो आपल्याच विश्वात मग्न आहे. कुणाला घराची चिंता, कुणाला मुलांची, कुणाला भविष्याची, कुणाला देशाची, कुणाला राजकारणाची.. कुणाला प्रमोशनची… चिंतेचा पसारा जसा वाढत जातो तशी व्यक्तीच्या भावविश्वाची व्याप्तीही वाढत जाते. व्यक्तीपरत्वे विश्व निर्माण होत, बहरत आणि उलगडत जात. या विश्वाच पुढे काय होत… हा प्रश्न छळायला लागतो…

महाभारतामध्ये अर्जुनाला गीता सांगतांना श्रीकृष्णाने म्हटलेच आहे, ‘या विश्वाचा निर्माता मीच आहे आणि संहार करणाराही मीच आहे. अवकाशात असलेल्या अनेक विश्वांची निर्मिती माझ्या पासुनच होते, आणि माझ्यातच ते विलीन होतात. जन्माला आलेला प्रत्येक सजीव त्याची – त्याची सृष्टी घेऊन जगतो, त्याचे विश्व तयार करतो, रंगवतो. ते विश्व घेऊनच तो माझ्यात विलीन होतो…’

दिनेश दीक्षित, जळगाव (९४०४९५५२४५)

Avatar
About दिनेश रामप्रसाद दीक्षित 46 Articles
मी जळगाव येथे वास्तव्यास असतो. जळगाव येथे गेल्या २५ वर्षापासून मी पत्रकारितेत कार्य करत आहे. दहा वर्ष मु. जे. महाविद्यालयाच्या जर्नालिझम डिपार्टमेंटमध्ये गेस्ट लेक्चर घेतले आहेत. मला सामाजिक कार्यात भाग घेण्याची आवड आहे. तसेच तरुण मुलांशी संवाद साधुन त्यांना चांगल्या गोेष्टी सांगण्याचा प्रयत्न करणे आवडते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..