विश्वासराव पेशवे हे नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव. त्यांचा जन्म २ मार्च १७४२ रोजी झाला. नानासाहेब व गोपिकाबाई यांचा पुत्र विश्वासराव पेशवे हे सर्व पेशव्यांत फार सुंदर होते. हे लहानपणापासून राज्यकारभारांत पडला होता व युध्दाच्या मोहिमांवरहि जात असे. निजामावरील सिंदखेडच्या स्वारींत विश्वासराव यांना मुख्य सरदार करून दत्ताजी शिंद्यास याचा कारभारी नेमलें होतें. विश्वासराव व जनकोजी जवळ जवळ सारख्याच वयाचे असल्यानें त्यांच्यांत अखेरपर्यंत मैत्री होती. या मोहिमेंत औरंगाबादेस व शिंदखेडास मराठ्यांनीं निजामाचा सपशेल पराभव केला. या युध्दांत विश्वासराव व जनकोजी या दोघांनींहि चांगला पराक्रम गाजविला. उदगीरच्या लढाईत ही भाउसाहेबांच्याबरोबर विश्वासराव हजर होते, त्यात त्यांनी हत्तीवरून तिरंदाजी उत्तम प्रकारें केली होती. १७५७ मध्येंच नानासाहेबांनीं दहा हजार फौज विश्वासरावाच्या हाताखालीं स्वतंत्र नेमून दिली होती. उदगीरच्या लढाईनंतर भाऊसाहेब पानिपतावर निघाले. भाउसाहेबांनीं दिल्ली शहर आगस्ट १७६० त हस्तगत केलें त्यावेळीं दरबार भरवून त्यांनीं सर्वांकडून विश्वासरावास नजरा करविल्या यावेळी विश्वासरावानें लष्करी दृष्टीनें किल्ल्याची पहाणी केली. या सालचा दसरा कुंजपुर्याास विश्वासरावाच्या नेतृत्वाखालीं मराठ्यांनीं केला. शेवटच्या दिवशी विश्वासराव व भाऊसाहेब आपल्या सैन्याच्या मध्यभागांत प्रथम हत्तींवर बसून लढत होते. १४ जानेवारी १७६१ रोजी सकाळीं ८ वाजतां लढाईस सुरवात झाली. दुपारीं विश्वासराव हत्तींवरून उतरून दिलपाक घोड्यावर बसला. त्याला तिसर्या प्रहरीं छातींत गोळीं लागली व तो तत्काळ गतप्राण झाला. जवळच भाऊसाहेब होते; त्यांनीं रावाचें शव हत्तीवरील अंबारींत ठेवविलें. व ते शेवटच्या निराशेनें शत्रूच्या सैन्यांत घुसले. विश्वासराव पडेपर्यंत मराठ्यांचाच जय होता. तो पडल्यानें भाऊसाहेब खचले व भाऊसाहेब दिसेनासे झाल्यानें मराठी सैन्य फुटलें आणि गिलचे विजयी झाले. विश्वासरावाच्या शवाचा हत्ती सुजाउद्दौल्यानें आपल्याकडे नेला; परंतु अब्दालीनें शव आपल्याकडे मागून घेतलें. अखेर एक लक्ष रू. दंड भरून गणेश वेदांती, काशीराज वगैरे मुत्सद्दयांनीं शव सोडवून आणलें व त्यास आणि भाऊसाहेबांचें शव शोधून काढून त्यासहि अग्नि दिला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
Leave a Reply