मराठी शाहीर व लोककलाकार विठ्ठल उमप यांचा जन्म १५ जुलै १९३१ रोजी झाला. आपल्या भारूडाने समस्त मराठी रसिकांना वेड लावणा-या विठ्ठल उमप यांनी आपल्या बहुआयामी कलासाधनेने अवघ्या महाराष्ट्रावर मोहिनी घातली होती. राज्याच्या लोककलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यामध्ये लोकशाहीर विठ्ठल उमप यांचं मोठं योगदान आहे.
विठ्ठल उमप यांचा मूळचा गळा विदर्भाचा असला, तरी नगर जिल्ह्यातील एका खेड्यात त्यांच्या घराण्याने भेदिकाची परंपरा सुरू ठेवली. विठ्ठल उमप यांचे वडील भेदिकाचे गायक पण उमप यांच्यावर भेदिकापेक्षा आंबेडकरी जलसा आणि सत्यशोधकी तमाशाचा विशेष प्रभाव पडला होता. मुंबईला उदरनिर्वाहासाठी आलेल्या उमप यांनी कामगार वस्तीत मेळ्यातून कामे केली. विठ्ठल उमप हे लोकशाहीर असले तरी त्यांना ‘कवाल’ म्हणूनच लोक पूर्वी ओळखत. पण नंतर मात्र त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून, एक समर्थ लोककलावंत, अशी आपली ओळख निर्माण केली. लोकरंगभूमी, रंगभूमी, कव्वालीचे व्यासपीठ, काव्य संमेलने, रुपेरी पडदा, दूरचित्रवणीचा छोटा पडदा अशा अनेक माध्यमांमध्ये उमप यांचा सर्वत्र संचार होता.
‘आला कागुद कारभारणीचा’ ही लावणी, ‘ऐका मंडळी कान देऊनी तुम्हा सांगतो ठेचात कुडी आत्म्याचं भांडण झालं भारी जोरात’, ‘भूक लागलीया पाठी कशासाठी पोटासाठी’, ‘माझ्या आईचा गोंधळ’, ‘आईचा जोगवा’, ‘आरती श्रीगणेशा जगदीशा’, ‘वादळ वारा तुफान येऊ द्या’, ‘ये दादा आवर रे’, ‘फाटकी नोट मना घेवाची नाय’, ‘भाता मीठ नही टाक्या’ अशा वेगवेगळ्या लोकगीतांच्या गायनाने विठ्ठल उमप यांनी आपला स्वतंत्र ठसा लोकगीताच्या क्षेत्रात उमटविला. ‘माझी मैना गावाकडं राह्यली’ या गाण्यानं तर अनेकांचे डोळे पाणावले.
विठ्ठल उमपांनी अनेक कोळी गीते आणि भीम गीते रचली व गायली. त्यांनी लिहिलेल्या “जांभूळ आख्यान” या नाटकाचे आतापर्यंत ५०० हून अधिक प्रयोग झाले आहेत. १९८३ साली विठ्ठल उमप यांनी आयर्लंडमधील कॉर्क लोकोत्सव गाजविला होता. विठ्ठल उमप केवळ लोकगीत गायनापाशी थांबले नाहीत. त्यांनी लोकरंगभूमीसोबतच नागर रंगभूमीवर संचार ठेवला. ‘अरे रे संसार’, ‘अबक दुबक’, ‘विठो रखुमाय’, ‘खंडोबाचं लगीन’, ‘जांभुळाख्यान’ या चाकोरीबाहेरच्या नाटकांसोबतच ‘हैदोस’, ‘बुद्धम् शरणम्’सारखी नाटके त्यांनी वर्ज्य मानली नाहीत.
विहीर, टिंग्या, सुंबरान,या चित्रपटांमध्ये व डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटातूनही त्यांनी काम केले होते.लोककलेच्या सेवेसाठी आयुष्य वेचणा-या शाहीर विठ्ठल उमप यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.
विठ्ठल उमप यांचे चिरंजीव आदेश, नंदेश आणि उदेश आता त्यांची परंपरा पुढे नेत आहेत. विठ्ठल उमप यांचे २६ नोव्हेंबर २०१० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply