वैशाख महिना उजाडतो आणि सनई-चौघड्यांचे आवाज आसमंतात घुमतात.
खेड्यात घरांपुढे मांडव सजतात तर शहरात कार्यालयं लायटिंगनं झगमगून उठतात.
कापडाची, सराफाची दुकानं गजबजून जातात. देणी-घेणी, लग्नातले रीतिरिवाज यावर गप्पा सुरू होतात. आपल्याला माहीत नसलेल्या रिवाजांवर टीका होते.
सुरू क्वचित ‘छे बाई! हे असलं कुठं पाहिलं नव्हतं. ‘ म्हणून नाकं मुरडली जातात.
यावरून सहजच भारतीय संस्कृतीमधल्या विवाहसंस्थेचा विचार मनात आला.
‘विवाह’ हा आपल्याकडे ‘करार’ मानला जात नाही. तो एक पवित्र संस्कार आहे. ब्रह्मचर्याश्रमातला विरक्त कालखंड संपल्यानंतर गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करण हा या संस्काराचा अर्थ. गृहस्थाश्रमीयांना सर्व सुखं उपभोगण्याचा हक्क आहे.
उंची वस्त्रं, दागदागिने, शृंगार, आराम, संपत्ती यापैकी कशाचंच या आश्रमाला वावडं नाही. पण त्याचबरोबर या आश्रमावर जबाबदायाही तितक्याच समाजातील बालकं आणि वृद्ध यांच्या संरक्षणाची जबाबदारी गृहस्थाश्रमाची संन्यासाश्रमातील ईशसेवा आणि जनसेवा करीत राहणाऱ्या विरक्तांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी गृहस्थांनीच पाहायची. आयुष्यातल्या या हक्काची आणि कर्तव्याची जाणीव आपल्या विवाहविधीमध्ये पुरेपूर करून दिली जाते.
या विधींमध्ये वरपक्षाला महत्त्व देणाऱ्या काही रूढी मधल्या काळात घुसडल्या गेल्या. विहिणीचा सन्मान करवलीचा सन्मान, पाय धुणं या सगळ्या रूढी. मूळ विधींमध्ये त्यांना फारसा अर्थ नाही. प्रत्यक्षातील मूळ विधी हे वधू-वर दोघांनाही समान सन्मान देणारे आहेत. जावयाची ‘नारायण’ म्हणून पूजा केली जात असताना सुनेलाही ‘लक्ष्मी’चा मान द्यावा ही या विधींमध्ये अपेक्षा आहे. जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात भारतीय संस्कृती पत्नीला महत्त्वाचं स्थान देते. म्हणून तर विवाहाच्या वेळी पतीनं वधूपित्याला वचन द्यावं लागतं
‘धर्मे च, अर्थे च, कामे च नाति चरामी ।
‘धर्म, अर्थ, काम (ऐहिक आकांक्षाची पूर्ती) हे तीनही पुरुषार्थ मिळवत असताना मी हिची साथ सोडणार नाही. ‘ हिंदू धर्मामध्ये एकटा पुरुष कोणतेही धर्मकार्य करू शकत नाही. मध्यंतरी एका लग्नाला गेले असताना पाहिलं, वर वधूच्या केसांवरून कंगवा फिरवीत होता. कुतूहल म्हणून पुरोहितांना त्याचा अर्थ विचारला. त्यांनी सांगितलं, तसाच काही वाईट प्रसंग आलाच तर तुझी वेणी घालून देण्यापासून सर्व सेवा मी करेन असं आश्वासन यामधून वधूला वर देतो.
ही नवी माहिती ऐकून चाटच पडले. मूळ धर्मात खरं म्हणजे स्त्रीला स्वामिनी ‘चं स्थान आहे. पण व्यवहारात बहुतेक वेळा ते दिलं जात नाही.
स्थल, काल, परिस्थितीनुसार विवाहाच्या अनेक पद्धतीदेखील भारतीय संस्कृतीनं स्वीकारल्या आणि त्यांना धर्मानं, समाजानं मान्यता दिली. आजच्या सुसंस्कृत समाजात या विविध पद्धतीनी विवाह होत नसले तरी पुराणांमध्ये त्यांचा उल्लेख आढळतो. आजही आदिवासी जमातींमध्ये या पद्धती टिकून आहेत.
आपल्याला आवडलेल्या स्त्रीला पळवून नेऊन तिच्याशी विवाह करणं हा राक्षस विवाह. क्वचित एखादी स्त्रीही आपल्याला आवडलेल्या पुरुषाला चक्क पळवून आणून त्याच्याशी विवाह करीत असे. (महाभारतातील उषा – अनिरुद्धांचा विवाह उषेनं अनिरुद्धाला पळवून आणल्यामुळेच झाला होता). आवडलेल्या पुरुषाच्या घरात जबरदस्तीनं त्याची पत्नी म्हणून जाऊन राहणं हादेखील विवाहाचा एक विक्षिप्त वाटणारा प्रकार अस्तित्वात होता ( आदिवासींमध्ये अजूनही याला ‘घरघुशी’ म्हणतात). वधू-वरांच्या माता-पित्यांना विचारात न घेता त्यांनी परस्पर केलेला तो गांधर्व-विवाह. शकुंतला – दुष्यंताचा विवाह या पद्धतीनं झाला होता. मुख्य म्हणजे हा विवाह दोघांच्याही माता-पित्यांकडून नंतर सहजपणे स्वीकारला जायचा.
थोडक्यात, लग्न करून नंतर ‘ही तुमची सून’ असं सांगायला येणं ही काही आजकालची रीत नाही. फार पूर्वीपासून याला सामाजिक मान्यता आहे. वधूनं आई-वडिलांच्या संमतीनं स्वतःच वराची निवड करणं ही स्वयंवर – पद्धत. पूर्वीच्या कथांमध्ये बहुतेक सर्व राजकन्यांचे विवाह हे याच पद्धतीनं झालेले दिसून येतात.
आजही कुठल्याही अपरिहार्य कारणामुळे मुलीचे वडील लग्नाला हजर राहू शकणार नसतील तर या पद्धतीनं विवाह केला जातो. यामध्ये मुलीच्या आई-वडिलांचा संबंध येणारे विधी केले जात नाहीत.
आपल्याकडच्या विवाहपद्धतींवर लिहावं तितकं थोडंच आहे. पण या सर्व प्रकारावरून आपल्या विवाहपद्धती परिस्थितीनुरूप बदलत असतात हे सत्य आहे.
अनुलोम’, ‘प्रतिलोम’ अशा पद्धतीत तर जातिबंधनेही तोडली जातात. थोडक्यात, 6
वरवरच्या रूढी, रीतिरिवाज यांना आपल्या संस्कृतीत फार महत्त्व पूर्वी नव्हतं.
विवाहसंस्थेचा जो गाभा आणि कुटुंबसंस्थेचा आधार दोन जीवांनी शरीरानंच नव्हे, तर मनानं, आत्म्यानं एकरूप व्हावं. एकमेकांच्या सुख-दुःखात भागीदार व्हावं. तोच फक्त इथे महत्त्वाचा आहे. मग या निमित्तानं दोन कुटुंब एकत्र येणार म्हणून एकमेकांना ऐपतीप्रमाणं, अवडंबर न माजवता भेटवस्तू देणं ठीक आहे.
आज आपल्याला चहूकडे काय दिसतं? विवाह-संस्कारांमधला ‘संस्कार’ आणि ‘भावना’ दोन्ही गोष्टी दूर जाताहेत आणि भलत्याच फालतू रूढींना महत्त्व येत आहे. देणं-घेणं, मानापानाच्या नावाखाली संपत्तीचं उठवळ प्रदर्शन भरतं आहे. वधू लक्ष्मीच्या पावलांनी येते. शिवाय ‘विवाह’ हा गृहस्थाश्रमातल्या जबाबदाऱ्यांबरोबर सुखाचाही स्वीकार असतो. त्यामुळे वधू सालंकृत असणं, तिनं सुवासिनीचा सारा शृंगार करणं हे योग्यच आहे. ‘सुवासिनी’ याचा एक अर्थ उत्तमोत्तम वस्त्र परिधान केलेली असा आहे. पण याच शब्दाचा दुसरा अर्थ आयुष्यात जिला एकमेव मंगल वासना (इच्छा) उरली आहे, अन्य इच्छा-आकांक्षा जिला त्याज्य आहेत असाही होतो. म्हणजेच एका पतीखेरीज अन्य साऱ्या इच्छा तिला त्याज्य असतात. आज एखाद्या नटीप्रमाणे नटलेली नववधू पाहताना वाटतं, या मंगल क्षणांमधली भावनांची हळुवार कोवळीक संपून त्यालाही बटबटीत रूप आलंय काय?
रूढींच्या अवडंबराला विरोध म्हणून रजिस्टर लग्न केलं जातं. पण त्यातही आपण विवाहाचे संस्कार फक्त टाळतो. बाकी सारं अवडंबर नव्या पद्धतीनं माजवतोच ना? मग फक्त संस्कारांशीच आपलं वाकडं का?
थोडक्यात, पदोपदी सतावणारा एकच विचार विवाह संस्काराच्या बाबतीतही सत्य आहे. आपण संस्कार हरवत चाललो आहोत, संस्कृती विसरत चाललो आहोत. हृदयाच्या ‘हळुवार, कोमल भावना’ वगैरे आऊट-डेटेड मानल्या जात आहेत. उरलं आहे ते पुन्हा एकदा फक्त प्रदर्शन ! संपत्तीचं प्रदर्शन, भावनांचं प्रदर्शन, सौंदर्याचं प्रदर्शन !
या झगमगाटी जगात एखाद्या सुज्ञ आणि प्रेमळ आईचे
सेवा थोरांची करावी
वाग साऱ्यांशी प्रेमानं
पतीची ही प्राणेश्वरी
मग घराची धनीण ‘
असे शहाणे शब्द निरर्थक ठरणार काय?
Leave a Reply