जगनला ते काम नवीन नव्हते. काम फारसे अवघड पण नव्हते. शाखेचा वर्धापन दिन साजरा करायचा होता. या खेपेला मुंबईचा साहेब येणार होता. इतकंच. मॅनेजरने एक मिटिंग घेऊन कामाचे वाटप केले होते. कोणाला खाण्या – पिण्याची सोय सोपयली, कोणी चहा कॉफी, कोणी सीटिंग अरेंजमेंट, कोणी स्वागतासाठी हारतुरे, आणि असच बरेच काही काही.
जगन्या शिपाई माणूस. तरी त्याच्याकडे अत्यंत महत्वाचे काम होते. साहेबांच्या हातून वृक्षारोपणा करावे, हि सूचना त्यानेच मांडली होती आणि अपेक्षे प्रमाणे ती सर्वानुमते मान्य करण्यात आली. वृक्षारोपणाच्या तयारीची जवाबदारी त्याच्याच खांद्यावर येऊन पडली!
जगन मोठा कष्टाळू माणूस. साहेबाना विचारल्या शिवाय तो इकडची काडी तिकडे करत नसे! त्याने खाली मुंडी घालून साहेबांच्या केबिन मध्ये मुसंडी मारली.
“सायेब, जरा बोलायचंय!”
“बोल!”
“तेच काय कि, झाड लावाच्या तयारी साठी, काय त उचल देता का? इचारायच होत!”
“उचल? म्हणजे ऍडव्हान्स? कशाला पाहिजे?”
“आता, झाड लावण्याचा कारेक्रम, म्हणता नर्सरीतन झाड घेन आलं. जमिलीत खड्डा खुदाई आली!”
“खड्डा खोदायला कशाला पैशे? तू खोद कि!”
“आता काय बोलू? युनियन आडवी येति! ते म्हणत्यात ‘शिपायाच्या’ डूटीत असली काम येत न्हाईत! तू नग करुस! मॅनेजर काय बोल्ला, त सम्प करू!”
हे मात्र खरे होते.
“बर अजून?”
“ईटा पंचवीस एक लागतीनं, खड्या बाहिरन लावल्या. अन एक पानी शिंपाया झारी!”
“झारी?आपल्या कडे जुनी होती कि? कुठे तरी पहिली होती मी!”
“हाय! पर बुडाला गंजून फुटली हाय! असले ईद्री, गंजकी, झारी मुमैच्या साहेबांच्या हाती देन, बर दिसन का?”
“मग?”
“नवी आनु का?”
“काय आणायचं ते आण! पण बिल मात्र घेऊन ये! मी ऍडव्हान्सच वोउचर सोडतो.”
मग मात्र जगन समाधानानं मुंडी हलवून कामाला लागला.
त्यानं जुनी झारी स्टोअर रूममधून बाहेर काढली. आणि आपल्या सायकलच्या हॅण्डलला अडकवली. साहेब संध्याकाळी बँकेतून ‘व्हिजिट’ला निघून गेल्यावर, त्याने शाखेसमोरच्या जागेच्या एका कोपऱ्यात गेल्यावर्षी, ‘वृक्षारोपणाच्या’ खड्यातली, वाळलेल्या झाडाची दोनफुटी काडी उपसून काढून फेकून दिली. चार-दोन ओंजळी कोरडी माती बाजूला काढली. मोठ्या स्क्रू ड्रायव्हरने अजून थोडे उकरल्या सारखे केले. आणि तो सायकलला टांग मारून निघाला.
त्याच्या घराजवळ डिगा घिसाडी राहायचा, त्याच्याकडून झारीच बुडखा बदलून घेतलं. पेंट मात्र स्प्रे पैंटिंग वाल्याकडून करून घेतला.
सकाळी तो चकाचक नवी झारी घेऊन, ऑफिसला लवकरच आला. जवळ पास हुडकून विटांचे तुकडे जमा करून, तिरपे कालच्या खड्या भोवती रोवले. ओंजळभर चुना पाण्यात कालवून सावकाश त्या विटांच्या तुकड्याना सफेदी मारली! खड्याच्या आसपासचे गवत मात्र त्याने मनलावून काढले.
अकराला साहेब ऑफिसात आले, तेव्हा त्यांना तो पांढऱ्या विटांनी सजवलेला खड्डा आवर्जून दाखवला. साहेब खुश झाले.
“जगन, झकास काम केलंस!”
“मग? आपलं काम असच असत! एकदा मनावर घेतल्यावर, हा जगन्या माग हटत नाही! पण एक वांदा झालाय! त्यो नर्सरीवाला दोनशे रुपये मागतोय! हातभार रोपाचे!”
“अरे ये घेऊन! मुंबईचे साहेब खुश झाले पाहिजेत!”
“म, हरकत नाय!” ०००
दुसरे दिवशी ऑफिसमधल्या पोरी, झगझगीत साड्या अन नाकात नथी घालून आल्या होत्या. त्यांनी पालथ्या मांड्या घालून पायऱ्या वरल्या, ओट्यावर रांगोळ्या काढल्या. ऑफिसचा हॉल, रंगीत कागदाच्या झिरमिळ्या आणि फुग्यांनी सजवला होतो. लोकल पेपराचे वार्ताहर आणि फोटोग्राफर उगाच इथले तिथले फोटो काढून घेत होते. पण खरा भाव होता तो लोकल टीव्ही चॅनलवाल्या व्हिडीओग्राफरला.
आमंत्रित एक एक करून येत होते. आलेल्याना कारकून मंडळी आदराने बसवून चहा पानाची व्यवस्था करीत होते. दिलेल्या वेळेच्या फक्त दीडतास उशिरा, मुंबईच्या साहेबांची गाडी आली. भर उन्हाळ्यात कोटात साहेबांचे आगमन झाले. टीव्हीचॅनेलची सोय केल्याचे त्यांच्या पर्यंत पोहंचले असावे.
मॅनेजर साहेबानी लगबगीने सामोरे जाऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास आरंभ झाला.
“सुस्वागतम-सुस्वागतम. समस्थ आमंत्रितांचे आणि माननीय, मुसळे साहेबांचे आम्ही शाखेतर्फे सहर्ष स्वागत करतो.
मुसळे साहेबांच्या मार्गदर्शना खाली, या शाखेची नेत्रदीपक प्रगती होत आहे! मी माननीय मॅनेजरसाहेबाना अशी विनंती करते कि, त्यांनी या प्रगतीचा आढावा घ्यावा.”
डायसवरील मॅनेजर, मुंबईचे साहेब आणि ती चतकोर निवेदिका, कटाक्षाने टीव्हीवाल्या कॅमेऱ्याकडे सस्मित पहात होते. कोणी तरी प्रगती अहवालाची फाईल, हळूच मॅनेजर साहेबांच्या समोर ठेवली.
“माननीय मुसळे साहेब, आणि उपस्थित मान्यवर.
आपण जणताच कि, आम्ही प्रतिकूल परस्थितीत अनुकूल प्रगती करत आहोत. त्याला एकच कारण आहे, ते म्हणजे मुसळे सरांचे अनमोल मार्ग दर्शन! (टाळ्या). गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी डिपोझट वीस टक्क्यांनी —-”
“मायला, सुरश्या तू साहेबाला कोणती फाईल दिलीस?” शाम्या ने हळूच विचारले.
“या येथे टेबलवर होती, ती.”
“ती गेल्या वर्षीची होती! या वर्षीची, मला आत्ता सापडली आहे!”
“शाम्या, काय फरक पडतो? त्या ना मॅनेजरला, ना त्या मुसळ्याला, ना पब्लिकला इंटरेस्ट आहे त्या फायलीतल्या आकडेवारीत!”
मॅनेजरचे ते रटाळ भाषण संपले तसे अनेकजण आनंदी झाले! कडाडून टाळ्या पडल्या! मग मुसळे साहेबानी मार्गदर्शनपर आपले चार शब्द आणि अनुभव कथन केले. या मुसळ्यापेक्षा, मॅनेजर परवडला हा भाव सर्वत्र स्पष्ट जाणवू लागला.
सम्भाजी तात्या शेवटच्या लाइनीतल्या, शेवटच्या खुर्चीत बसून पेंगत होते. झोप उडवी म्हणून, त्यांनी तीन घड्याची गायछाप काढून तळहातावर तंबाखू घेतली. चुन्याची कुपी काढून, त्यावर पिचकारी मारली. चांगली मळून गालफाडात सारून दिली. सवयीने दोन्ही हात एकमेकांवर आपटून, तळहातावरला धुराळा झटकला. झालं! त्या पाठोपाठ सगळ्या हॉलभर टाळ्यांचा पाऊस पडू लागला. मुसळे साहेब नाईलाजाने जागेवर बसले.
त्यानंतर रीतसर वृक्षारोपण झाले. जगनच्या हातभार खड्यातल्या, वीतभर रोपाला, लालभडक झारीने पाणी घालताना जबरदस्त फोटो फ्लॅश झाले. जमानेले सगळेच ‘आपण टीव्हीत दिसलोच पाहिजेत!’ या हिरीरीने पुढे सरसावत होते. कॅमेरा सावकाश फिरवून सर्वांचे समाधान, त्या चॅनलच्या व्हिडीओ ग्राफरने केले. अल्पोहार आणि चहा पाणी करून कार्यक्रम संपला.
“पेपर कटिंग्ज आणि या कार्यक्रमाचे कव्हरेज मला पाठवून द्या! ती व्हिडीओ क्लिप पण मेल करा!” मुसळेंनी दोन खारे काजू तोंडात टाकत निघताना मॅनेजरला सांगितले.
“हो सर पाठवतो! माझ्या बदलीच तेव्हड —”
“बघू! या ट्रान्स्फर प्लॅन मध्ये जमलतर घेतो तुमचं नाव!”
मुंबईच्या साहेबांची गाडी धूळ उडवत निघून गेली!
०००
त्या रात्री डिगा घिसाडी अन जगन्या देशी च्या ग्लासांची ‘टक्कर’ मारून गप्पा हाणत होते.
“जगन्या, किती गाळ्या निघाला त्या ‘झाड लावी’ लफड्यात?”
“ज्यादा काय नाही. पन्नास खड्डा खोदाईचे अन विटांचे, तीनशे झरीचे, अन तीनशे रोपट्याचे! अशे सहा शे!”
“हिसाब चुकतंय! साडे सहाशे होत्यात!”
“छे! पन्नास देलते झाडाचे! पर पावत्या निक्या साडे सहाशेच्या हैती! आमच्या हाफिसात कडक नेम हाय! काम कोन तपासात नाय! कागदी चिंटूऱ्या मातर धा -धा वरीस, फायलीत जमा करून जपून ठुत्यात!”
०००
त्याच रात्री ऑफिसच्या कंपाउंड मधल्या झाडांची एक सभा भरली होती. शोक सभा! सगळी झाडे ओल्या डोळ्यांनी स्तब्ध उभी होती. दर वर्षी प्रमाणे आज हि, या ‘माणसांनी’ दिखाऊ वृक्षारोपण केले. झाडाचे एक रोप ‘जगवण्याचा’ आशेला लावले होते! उद्यापासून, आजच्या या उत्सव रोपट्याला, पाणी न घालता मारलं जाणार होत! याला पुरावा, ते शेजारीच पडलेलं, गेल्यावर्षीच्या, झाडाचं कलेवर आहे! या एकाच खड्यात किती वृक्षारोपण होणार कोणास ठाऊक? ओम शांती! शांती!!
— सु र कुलकर्णी.
आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.
Leave a Reply