निसर्गाशी माणसाचं नातं फार पुरातन काळापासून आहे. आपल्या बोलण्यातून कित्येक झाडं, झुडपं, रोपं, फळा-फुलांचे संदर्भ सहजपणे येत असतात.. त्यामुळेच संत तुकाराम महाराजांनी म्हटलेला अभंग माणसांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतो.. वृक्षवल्ली आम्हा, फक्त सोयरीच नाही तर ती आमच्यात भिनलेली आहेत..
एखाद्याची आपण वारेमाप स्तुती केली तर ती व्यक्ती लगेच बोलून दाखवते, ‘मला हरबाऱ्याच्या झाडावर चढवू नका.. चुकून पडल्यावर माझे हातपाय मोडतील..’
पूर्वी एखादी मुलगी फारच लाजणारी असेल तर तिला सर्वजण ‘लाजाळूचं झाड’ अशी उपमा देत असत. तिला चारचौघांत बोलण्याचं धाडस होत नसे. आता मात्र अशा लाजाळू मुली, शोधूनही सापडणार नाहीत…
कुटुंबातील एखादा मुलगा वयात आल्यावर इतरांपेक्षा उंचीने जास्त असेल तर त्याला ताडाच्या झाडाचे विशेषण लावले जात असे. ‘तो मुलगा तेवढा ‘ताडमाड’ उंच आहे, बाकीचे सगळे साधारण उंचीचे.’ असं त्याच्याबद्दल सांगितलं जाई..
एखाद्या व्यक्तीने सामाजिक, शैक्षणिक संस्थेच्या स्थापनेपासून, आयुष्यभर कष्ट करून ती नावारूपाला आणली असेल तर त्या व्यक्तीला ‘वटवृक्षा’ची उपमा दिली जाते, कारण वटवृक्ष विशाल असतो व त्याच्या सावलीत अनेकांना विसावा घेता येतो.
काही जणांचे बोलणे हे कडवट असते. ते नेहमी दुसऱ्याचे दोषच काढत राहतात, त्यांना साहजिकच ‘कडू कारल्या’ची उपमा दिली जाते. ‘साखरेत घोळलं, तुपात तळलं तरी ‘कारलं’.. कडू ते कडूच!!’ असं म्हणताना त्या व्यक्तीच्या कडवट स्वभावावर टीका केली जाते.
याउलट काहीजणांचं व्यक्तिमत्त्व हे बाहेरुन फणसासारखं काटेरी, रागीट असतं, मात्र स्वभावाने ते फणसातील गऱ्यासारखे गोड असतात. काहीजण बोलण्यात हुशार व बडबड करणारे असतात, त्यांना ‘बोलघेवडा’ अशी उपमा दिली जाते.
अगदी साधारण, सुंदरता नसलेल्या व्यक्तिमत्त्वाला ‘सुरणा’ची उपमा दिली जाते. सुरण ही फळभाजी आकाराने ओबडधोबड व रंगाने मातकट असते.
जी व्यक्ती आवाक्याबाहेरच्या अवास्तव, अतिशयोक्तीच्या गोष्टी बोलत राहते, त्या व्यक्तीला ‘नाकाने कांदे सोलू नकोस..’ अशी तंबी दिली जाते.
काही जणांना कित्येकदा सांगूनही त्यांच्यामध्ये तात्पुरतीच सुधारणा होते व नंतर ते मूळपदावर येतात.. त्यांना ‘तेरड्याचा रंग तीन दिवस’ असं संबोधलं जातं.
हातातील चांगले काम सोडून दुसरे काम करायला गेल्यावर त्यात अपयश किंवा अडचण आल्यास त्या माणसाची स्थिती धड हे ना ते अशी ‘लोंबकळणाऱ्या दोडक्या’ सारखी होते.
एखाद्याला महत्त्वाचे काम सांगून देखील त्याने ते न केल्यास चिडून त्याला फटकारले जाते.. मी सांगितलेले काम तू केले असतेस तर तुझ्या xxची ‘बाभळ बुडाली’ असती का? असा प्रश्न विचारला जातो..
एखादी गोष्ट सर्वांना समप्रमाणात जेव्हा समजुतीने वाटून घेतली जाते, तेव्हा ‘एक तीळ सात जणांत’ वाटून घेतल्याची उपमा दिली जाते. ‘तिळ’ हा एक अति छोटा पदार्थ, त्याचे सात तुकडे करणे ही देखील अशक्य कोटीतील गोष्ट.. यातून एकीचा, समान वाटणीचा संस्कार दिसून येतो..
एखादी नवीन योजना जेव्हा अंमलात आणण्याचा विचार केला जातो तेव्हा त्याला यश मिळेलच याची खात्री नसेल तर ‘गाजराची पुंगी, वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली’ असा विचार केला जातो…
सहसा न भेटणाऱ्या व्यक्तीची बऱ्याच कालावधीनंतर जर अचानक भेट झाली तर त्याला ‘उंबराच्या फुलाची’ उपमा दिली जाते. कारण ते फूल अभावानेच दृष्टीस पडतं…
नातेवाईकांत जर दोन व्यक्ती समान स्वभावाच्या आढळल्या तर त्यांना ‘ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी’ असं बोललं जातं.
एखादा माणूस जर असंबद्ध बोलत असेल तर त्याच्या बोलण्याला ‘ना शेंडा, ना बुडखा’ असं नावं ठेवलं जातं.
वयस्कर व्यक्ती जर मनानं तरुण असेल तर त्याबाबत टीका करताना ‘पिकल्या पानाचा, देठ हिरवा’ असं बोललं जातं.
भाषण चालू असताना पुढाऱ्याने एखादा विनोदी किस्सा रंगवून सांगितल्यावर, श्रोत्यांत ‘खसखस पिकते’…
एखादा खेडूत शहरात आल्यावर गर्दीत तो त्याच्या वेगळेपणाने ‘पावटा’ म्हणून उठून दिसतो.
एखादी तरुणी बारीक अंगकाठीची असेल तर तिला ‘चवळीच्या शेंगे’ची उपमा दिली जाते.
स्त्रियांच्या सौंदर्याचे वर्णन करताना चाफेकळीसारखं नाक, कुंदकळ्यासारखे दात, डाळिंबी ओठ अशा उपमा दिल्या जातात.
अशाप्रकारे वृक्षवल्ली आपल्या रोजच्या जीवनात सामावलेल्या आहेत..
शेवटी आपलं जीवन हे ‘आळवा’वरच्या पाण्यासारखं असतं.. ते आनंदानं जगण्यातच मजा आहे…कधी तो पाण्याचा थेंब घरंगळून जमिनीवर पडल्यावर मातीत जिरुन जाईल, हे सांगता येत नाही…
© सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
११-७-२१.
Leave a Reply