सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्याधिक्षमत्व (Immunity) हा विषय सर्वांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा झालेला आहे . व्याधिक्षमत्वाचा संबंध फक्त कोरोनासारख्या इन्फेक्शनशीच नसून , कुठल्याही रोगापासून शरीराला सुरक्षित ठेवायचे असेल तर उत्तम व्याधिक्षमत्व ही त्याची कवचकुंडले आहेत , मग त्याला कॅन्सरसारखा दुर्धर आजारसुद्धा अपवाद नाही
आयुर्वेदाने व्याधिक्षमत्व हे प्रामुख्याने तीन प्रकारचे सांगितलेले आहे .
१. सहज , २. कालज , ३. युक्तिकृत
सहज म्हणजेच जन्मजात मिळणारे ( आईने घेतलेल्या उत्तम आहार – विहार , आनुवंशिकता आदींमुळे )
कालज म्हणजे कालानुसार प्राप्त होणारे , उदाहरणार्थ तरुणपणी सर्वच लोकांचे व्याधिक्षमत्व उत्तम असते किंवा हिवाळ्याच्या काळामध्ये शरीराचे व्याधिक्षमत्व उत्तम असते . याउलट पावसाळ्यामध्ये व उन्हाळ्यामध्ये ते खालावलेले असते .
यातील तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे व्याधिक्षमत्व म्हणजे युक्तिकृत , हे त्या त्या व्यक्तीने योग्य प्रकारचा आहार , विहार , दिनचर्या , ऋतुचर्या इत्यादी पाळून स्वतः कमवायचे असते .
उत्तम व्याधिक्षमत्व म्हणजे , शरीराला घडवणारे जे मूळ शरीरधातू आहेत रस , रक्त , मांस , मेद , अस्थी , मज्जा , शुक्र या सप्तधातूंचे बल उत्तम ठेवणे . कारण व्याधी निर्माण करणारी वेगवेगळी कारणे जेव्हा एखादी व्यक्ती सेवन करते , तेव्हा प्रथम तिच्या शरीरातील वात , पित्त , कफ हे त्रिदोष बिघडतात . हे दोष प्रमाणापेक्षा जास्त बिघडलेले असले व त्यांना प्रतिकार करण्याची शरीरातील धातूंची कुवत नसेल , तर व्यक्ती रोगाला बळी पडते . म्हणजेच रोग निर्माण करणारी कारणे जास्त प्रमाणात सेवन न करणे हे उत्तम ! जर अशी कारणे सेवन केली गेली , तरी शरीराचे मूळ धातू उत्तम राखून , या कारणांमुळे शरीरात रोग निर्माण होणार नाही , इतपत शरीराची क्षमता वाढवणे म्हणजे चांगले व्याधिक्षमत्व .
यासाठी आयुर्वेदाने दिनचर्या , ऋतुचर्या , आहार – विहार या सर्वांचे नियम घालून दिलेले आहेत . उत्तम व्याधिक्षमत्व असणाऱ्या व्यक्तींना सहसा कॅन्सर होणार नाही आणि झालाच तर तो बरा होण्याची आणि पुन्हा न होण्याची शक्यता खूपच जास्त आहे .
प्रथम कर्करोग किंवा कॅन्सर म्हणजे नेमके काय ? हे आधुनिक वैद्यकाच्या परिभाषेत थोडेसे समजून घेऊ .
आधुनिक शास्त्रानुसार कॅन्सर म्हणजे विकृत पेशींची अमर्याद वाढ . यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत
१. प्राकृत पेशींचे विकृत पेशीत रूपांतर होणे
२. अशा विकृत पेशींची अमर्याद वाढ होणे .
डॉक्टरांना कॅन्सरची शंका आल्यापासून FNAC , BIOPSY इ . द्वारा त्याचे निश्चित निदान होणे , मग त्याची शस्त्रकर्म , केमोथेरपी इ . ट्रीटमेंट घेणे , या ट्रीटमेंट मुळे होणाऱ्या दुष्परिणामांना रुग्ण तोंड देणे . तरीही यातून पूर्ण बरे झाल्यानंतर हा रोग पुन्हा होणार नाही ना ? अशी एक टांगती तलवार कायम डोक्यावर असते . अनेक वेळा रोगाचे निदान होईपर्यंत रोग खूप पुढच्या अवस्थेत पोचलेला असतो व त्यावेळी कोणतेही उपचार उपलब्ध नसल्यामुळे येणारे नैराश्य किंवा एकदा हे सर्व दिव्य करून पूर्णपणे बरे झाल्यानंतर , पुन्हा पुन्हा होणारा कॅन्सर अशा परिस्थितीत रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांची आर्थिक , मानसिक व शारीरिक स्थिती खालावते .
विषादो रोगवर्धनानां श्रेष्ठः ।
चिंता ही सर्व प्रकारचे रोग वाढवण्यात सर्वश्रेष्ठ आहे , असे आयुर्वेदाने सांगितलेले आहे . कॅन्सरच्या बाबतीत तर सतत चिंता करणे हे रोगाचे अतिशय महत्त्वाचे कारण आहे .
गेल्या ३० ते ४० वर्षात कॅन्सरचे प्रमाण समाजात भयावह पद्धतीने वाढत चाललेले दिसते आहे , त्याची नेमकी कोणती कारणे आहेत हे आपण समजून घेऊ . पारंपरिक शेतीच्या पद्धतीत गेली काही वर्षे आमूलाग्र बदल झालेला आहे .
उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी संकरित वाणे , ही संकरित वाणे मुळात दुर्बल असल्याने , त्यांना टिकवण्यासाठी कीटकनाशके , रासायनिक खते यांचा बेसुमार वापर केला जात आहे . आपण सध्या जे अन्न खातो , त्यातच काही कस नाही . मग खाणाऱ्याची प्रतिकारशक्ती कशी चांगली राहणार ? त्यात अन्नातून एवढ्या मोठ्या प्रमाणात पोटात जाणारी रसायने , जी विषसमान आहेत . ती चांगल्या पेशीत जनुकीय बदल घडण्यासाठी व त्यांचे रूपांतर कॅन्सर पेशीत करण्यासाठी जबाबदार ठरतात .
शहरीकरणामुळे वाढलेले पाणी व हवेचे प्रदूषण, विज्ञानाने उपलब्ध झालेल्या सुखसुविधांमुळे बिघडलेली दिनचर्या , श्रमांचा अभाव , पारंपरिक आहाराची जंक फूडने घेतलेली जागा , अनावश्यक स्पर्धा , पैशाचा हव्यास व त्यातून वाढलेले मानसिक ताणतणाव , व्यसनाधीनता ही सर्वच व्याधिक्षमत्व कमी करणारी तसेच कॅन्सरच्या वाढीला कारणीभूत ठरणारी मूलभूत कारणे आहेत .
त्यामुळे केवळ विकृत पेशींना शस्त्रकर्म करून काढून टाकणे किंवा केमोथेरपी , रेडिएशन करून नाहीसे करणे , हा अत्यंत अपुरा चिकित्सा दृष्टिकोन आहे . जीवनशैलीतील सर्वांगीण बदल हेच कॅन्सरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कॅन्सरच्या रुग्णांना उपशय देण्यासाठी अतिशय आवश्यक आहे .
कोणत्याही व्याधीची चिकित्सा करत असताना , त्याची कारणे दूर करणे ही चिकित्सेची पहिली पायरी आहे . त्यामुळे कॅन्सरला प्रतिबंध करायचा असल्यास किंवा झालेला कॅन्सर लवकर बरा करायचा असल्यास वरील सर्व कारणे टाळणे , जीवनशैली सुधारणे ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे .
कॅन्सरच्या सध्या प्रचलित असणाऱ्या चिकित्सेमध्ये , ज्या ठिकाणी कॅन्सरची वाढ झालेली आहे ती गाठ काढून टाकली जाते आणि तो अन्य ठिकाणी पसरू नये म्हणून केमोथेरपी , रेडिएशन याद्वारे विकृत पेशी नाहीशा केल्या जातात . परंतु या चिकित्सेमध्ये वरील सर्वांगीण कारणांचा कोणताच विचार केलेला दिसत नाही . शिवाय चिकित्सा म्हणून देण्यात येणारी केमोथेरेपीची औषधेही स्वतःच विषारी असल्यामुळे बऱ्याच वेळा त्याचा परिणाम म्हणून पुन्हा नवीन ठिकाणी कॅन्सर झालेला आढळतो . त्यामुळे रोगाची चिकित्सा हेच पुन्हा होणाऱ्या रोगाचे कारण ठरते .
कॅन्सरचे निदान झाल्यावर रुग्ण व त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टरांकडून ते निदान नीट समजून घ्यावे . कॅन्सरची स्टेज , त्यावर उपलब्ध असणारे उपचार , उपचारांनी होणारे फायदे आणि तोटे , त्यासाठी येणारा खर्च , रुग्णाचे वय , रुग्णाची शारीरिक , मानसिक क्षमता , कुटुंबाचे पाठबळ या सर्वांचा डॉक्टरांबरोबर विचारविनिमय करून , मगच कोणत्या प्रकारची चिकित्सा करायची याचा निर्णय घेणे योग्य ठरते . सर्व विचारविनिमयानंतर आधुनिक चिकित्सा घेण्याचे निश्चित झाल्यास , सर्व तपासण्या होईपर्यंत जो बराच वेळ जातो , या काळात स्वस्थ बसून न राहता , त्याच वेळी आयुर्वेदिक चिकित्सा घेण्याच्या दृष्टीनेही विचार करावा . बऱ्याच वेळा रुग्णाच्या शारीरिक , आर्थिक मर्यादा यामुळे आधुनिक उपचार करणे शक्य नसते , ग्रामीण भागात तशा सोयी उपलब्ध नसतात , काही रुग्णांना आधुनिक उपचारांचे दुष्परिणाम सहन होत नाहीत . अशा वेळेस आधुनिक चिकित्सा चालू असतानाच बरोबरीने आयुर्वेदाचे उपचार घेणे हे रुग्णाच्या वेदना कमी करणे , आयुष्य लांबवणे , आयुष्याचा दर्जा सुधारणे या दृष्टीने उत्तमरित्या सहाय्यभूत ठरू शकतात . त्यामुळे सर्व उपचार करून थकल्यानंतर , काहीच आशा उरलेली नसताना , शेवटच्या स्थितीत आयुर्वेदाकडे वळण्यापेक्षा , आधुनिक चिकित्सेच्या बरोबरीने किंवा त्याला पर्याय म्हणूनही आयुर्वेदीय उपचार सुरू करता येतात .
आधुनिक चिकित्सेचे दुष्परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने , आयुर्वेदाची पूरक चिकित्सा घेणारे रुग्ण , केवळ आयुर्वेद चिकित्सा घेणारे रुग्ण , आधुनिक चिकित्सा पूर्ण झाल्यावर रोग पुन्हा होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आयुर्वेद चिकित्सा घेणारे रुग्ण अशा सर्व प्रकारच्या अवस्थांमध्ये रुग्णांना दिलेले उपचार फायदेशीर ठरतात , असा अनेक नामांकित वैद्यांचा अनुभव आहे .
शरीरातील दोष , धातू आणि अग्नी यांची साम्यावस्था व आत्मा , इंद्रिय , व मन यांची प्रसन्न अवस्था म्हणजेच संपूर्ण स्वास्थ्य कॅन्सरमध्ये शरीरातील काही ठिकाणी धातूंची निर्मिती , विभाजन , परिपक्वता या स्तरावर मोठा बिघाड झालेला असतो . हा बिघाड पूर्णपणे दुरुस्त करणे शक्य नसले , तरी शरीराचे संतुलन प्राप्त करण्यासाठी योग्य औषध , आहार , पंचकर्म , रसायन , मानस चिकित्सा या सर्वच उपचारांचा उपयोग करावा लागतो .
वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरमध्ये अनेक प्रकारची लक्षणे निर्माण होतात , उदाहरणार्थ ताप , खोकला , रक्तस्राव आदी लक्षणे कमी करून ; रुग्णाला आराम देणारी , अनेक उत्तम औषधे आयुर्वेदात आहेत . त्यालाच शमन चिकित्सा म्हणतात . उदाहरणार्थ रक्तस्रावात दूर्वा , नागकेशर , खोकल्यामध्ये सितोपलादि चूर्ण , अडुळसा , ज्वरामध्ये सुदर्शन घनवटी इत्यादी .
केमोथेरपी किंवा रेडिएशन घेणाऱ्या रुग्णात केस गळणे , त्वचेचा दाह , रक्तातील पांढऱ्या आणि लाल पेशींचे प्रमाण घटणे असे दुष्परिणाम होतात . या काळात शरीरातील निरोगी पेशींचे बल रक्षण करणारी रसायन औषधे अतिशय उपयुक्त ठरतात . उदाहरणार्थ आवळा , गुळवेल , शतावरी इत्यादी .
रोगाचे बल , अवस्था यांचा विचार करून पंचकर्माचा प्रयोग करणे हितकर ठरते . अभ्यंग ( सर्वांगाला तेलाचा मसाज करणे ) , स्वेदन ( औषधी द्रव्यांनी शेक देणे ) ही पूर्वकर्मे व गरज असेल त्यानुसार वमन ( उलटी करवून दोष काढणे ) , विरेचन ( जुलाब देणे ) , औषधी तेल आणि काढ्यांची बस्ती देणे , नस्य ( नाकात औषध टाकणे ) आणि रक्तमोक्षण ( जळवा किंवा सिरिंजद्वारे रक्त काही प्रमाणात काढून टाकणे ) ही पंचकर्मे , पुन्हा पुन्हा रोग होऊ नये या दृष्टीने अतिशय फायदेशीर ठरतात .
कॅन्सर ही शरीरातील धातूंच्या विकृतीमुळे होणारी व्याधी आहे . त्यामुळे धातूंचे बल वाढवणारा , शरीराचे व्याधि क्षमत्व वाढवणारा असा आहार घेणे सर्वांनीच व विशेषतः कॅन्सर रुग्णांनी घेणे अत्यावश्यक आहे . सेंद्रिय पद्धतींनी पिकवलेले अन्नधान्य विशेषतः कमी पॉलिशचे जुने तांदूळ , लाल साळी , सालीसकटच्या डाळी , मूग , सेंद्रिय फळभाज्या , स्थानिक व ऋतुनुसार मिळणारी फळे , देशी गायीचे दूध , देशी गायीचे तूप , तिळाचे तेल , सैंधव मीठ , काळ्या मनुका , खजूर , अंजीर , आवळा , डाळिंब , आले , पुदिना , कोथिंबीर , एरंडेल , मध , गोमूत्र , सोने घालून उकळलेले पाणी आदीचा वापर वैद्यांच्या सल्ल्यानुसार आहारात करणे हे कॅन्सर रुग्णांसाठी परम हितकर आहे .
रुग्णाच्या मनाला आनंददायी वाटेल असे वातावरण आजूबाजूला असणे अतिशय गरजेचे आहे . वरील उपायांमुळे रुग्णाचे व्याधिक्षमत्व टिकून राहते व रोगाचे बल कमी होते . रुग्णाचा जीवनकाल वाढणे , जीवन सुखकर होणे , कॅन्सर चिकित्सेचे दुष्परिणाम कमी करणे , या सर्वच बाबतीत आयुर्वेद चिकित्सा कॅन्सर रुग्णांना अतिशय उपयुक्त ठरते .
रुग्णाने आपल्या रोगाचे जास्तीत जास्त शास्त्रीय ज्ञान प्राप्त करून , आपण घेत असलेल्या चिकित्सेवर पूर्णपणे विश्वास ठेवून , चिकित्सेच्या मर्यादांचे भान ठेवून , योग्य चिकित्सा घेतल्यास , रुग्णाला स्वतःच्या जीवनात आयुर्वेदाच्या माध्यमातून आनंद नक्की फुलवता येतो .
वैद्य उर्मिला पिटकर
सेवाधाम क्लिनिक ,
मुंबई
९८२०३३९५४८
Leave a Reply