आग ओकायचं काम सध्या सूर्याकडे आहे. त्यामुळे पोस्ट सर्वांनी जरा मिश्किलीनेच घ्या
सध्या लग्न सराईचा सिझन सुरू असल्याने आमच्या गावात मोठमोठ्याने स्पिकर लावून गाण्यांची चढाओढ चालू आहे. (ऐकणाऱ्यांचे कान आणि डोकं बधीर होईल पण लावणाऱ्यांची हौस काही भागत नाही. हाच प्रकार गणपतीमधे सुध्दा असतो. )
नियम धाब्यावर बसवून त्रासदायक टिपीकल गाण्यांचा सुकाळ ( धुमाकूळ) दिवस रात्र चालू असतो. लग्नदिवसा आधी दोन दिवस जी सुरवात होते ती पार हळद काढणी, सत्यनारायण पूजा पार पडेपर्यंत. (नशीब आमचं पुढे बारशापर्यत चालू ठेवत नाहीत .) आत्ता कडकडीत उन्हाळा आहे पण तरीही मी अशा वेळी लाईट जावा अशी मनापासून प्रार्थना करते. फॅन नसेल तरी चालेल पण डोकं बधीर करणारी कटकट तरी नको. (अर्थात स्पिकर बंद झाला तरी सतत चालू असणारी ती गाणी कानात, डोक्यात वाजतच रहातात हा भाग निराळा)
तर हे सर्व सांगण्याचा मुद्दा असा की , हि जी लग्न स्पेशल गाणी असतात त्यांच्या व्याकरणाची पार वाट लावलेली असते. (उदा. डमडम बेंडबाजा वाजते ठुमकत करवली नाचते.)
बेंडबाजा हा पुल्लिंगी शब्द आहे पण गाण्यात मात्र यमक जुळवण्यासाठी बिच्याऱ्याला नपुसकलिंगी करून टाकलाय. असे प्रत्त्येक गाण्यात एक ना अनेक शब्द आहेत.
बरेच साहित्यिक सुध्दा यमक जुळवण्यासाठी व्याकरणाची वाट लावतात. मला कुणावर टीका करायची नाहीये. पण असे शब्द वापरल्याने ते रूढ होत जातात आणि पुढच्या पिढीवर त्याचा दुष्परिणाम आढळतो. परिणामी भाषा बिघडते.
पूर्वी थोडंसं शिक्षण घेणाऱ्यांचे सुध्दा भाषा आणि लिखाण व्याकरणदृष्ट्या अचूक आणि उत्कृष्ट असायचे . आता पदवीधरांचे सुध्दा नसते.
(ते) पेन नपुंसक लिंगी शब्द असुनही बरेच जण तो पेन (पुल्लिंगी)असा शब्द प्रयोग करतात.
काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीशी माझा लाईट या शब्दावरून वाद झाला.
मी लाईट ला तो लाईट म्हणते. (लाईट याचा अर्थ उजेड किंवा प्रकाश अशा अर्थाने. तो उजेड ,तो प्रकाश म्हणून तो लाईट) माझी मैत्रीण ती लाईट असं म्हणते. (लाईट आली , लाईट गेली)
जर वीज म्हणायचं असं तर ती वीज ठिक आहे पण ती लाईट मला योग्य वाटत नाही. अर्थात हे माझे विचार झाले. मतमतांतरे असू शकतात.
आसपासच्या किती तरी लोकांना “लाईट आली, गेली ” म्हणाताना मी ऐकलं आहे.त्यामुळे माझ्या मैत्रिणीच्या बाजूने मतांचा कौल जास्त असेल. (कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता. )
प्रिय सखी, तू सांगितले होतेस आम्ही साहित्यिकवर प्रश्न विचार, तो लाईट कि ती लाईट ? .
नुसताच प्रश्न टाकून विचारणं योग्य वाटलं नाही म्हणून
लाईट बाबतची पोस्ट केली आहे. तुझा विजय नक्कीच. कारण हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच लोक तो लाईट असं म्हणतात.
— वृषाली जोगळेकर
काव्यसुमन Vj
(`आम्ही साहित्यिक’ सभासद)
Leave a Reply