नवीन लेखन...

बनगरवाडीचा लेखक – व्यंकटेश माडगुळकर

Vyankatesh Madgulkar - Author of Bangarwadi

मी वाचन सुरु केल्यानंतर पहिल्या उत्साहात खूप पुस्तकं वाचली. खुप म्हणजे बरीच पुस्तकं वाचली. अक्षरशः एका दिवसात चारचाराशे- पाचपाचशे पानाची पुस्तकं मी संपवली आहेत. तो उत्साह आता कुठे गेलं कळत नाही. असंच एक दिवसात मी एका बैठकीत ‘बनगरवाडी’ हे पुस्तक वाचून काढलं होतं. जी अनेक पुस्तकं कायम लक्षात राहतात त्यापैकी बनगरवाडी हे आहे. मल वाटत नाही कि ती कादंबरी वाचताना लागलेला वेळ आणि मिळालेला आनंद कधी विसरला जाईल. सगळं आयुष्य लहानपणापासून शहरात गेलेलं आहे. आणि बनगरवाडीची सगळी गोष्ट त्या ग्रामीण भाषेत आहे. त्यामुळे सुरवातीला ती भाषा आणि ते जीवन अनभिज्ञ वाटत राहतं. पुस्तकातल्या जीवनामध्ये जो जिवंतपणा आहे तसाच आपल्या रोजच्या जगण्यातही आहे. त्यामुळे त्या कथेशी आणि रोजच्या जगण्याशी कधीच तुटकपणा मला जाणवलं नाही. जितक्या प्रकारचे माणसांचे स्वभाव शहरात बघायला मिळतात तितक्याच किंबहुना जास्त प्रकारचे खेड्यात दिसतात. जास्त वैविध्य खेड्यांमध्ये दिसतं. ते कुठून दिसतं? ते व्यंकटेश माडगुळकरांच्या गोष्टींमधून दिसतं. ते बनगरवाडीमध्ये दिसतं.

दोन लेखक आहेत, ज्यांच्या आयुष्याबद्दल मला कायम कुतूहल वाटत आलेलं आहे. एक व्यंकटेश माडगुळकर आणि दुसरे आहे गो. नी. दांडेकर. कुतूहल वाटायचा कारण म्हणजे दोघांमध्ये बरच साम्य आहे. दोघेहीजण स्वातंत्र्यचळवळीत भाग घेण्यासाठी म्हणून घर सोडून पळून गेले. दोघेही वयाच्या सुमारे १३-१४ व्या वर्षी पळून गेले. दोघांच्याही बाबतीत घडलेलं पुढचं नाट्य म्हणजे चळवळ अचानक थांबली. आणि अपयशी हातानी घरी कसं जायचं म्हणून दोघांनीही घरी जाण टाळलं. दोघांचाही शालेय शिक्षण चवथी-पाचवीपर्यंतच झालेलं आहे. पण दोघांच्याही लेखनाला ज्ञानपीठ मिळावं अशी प्रतिभा दोघांकडेही आहे, दुर्दैवाने अजून मिळालेलं नाही. मला असं वाटत राहतं कि इथून पुढे गोनीदांच्यापेक्षा माडगुळकरयाचं आयुष्य जास्त आवघड होतं. गोनीदा एखाद्या साधुसारखे महाराष्ट्रभर भटकत राहिले. नर्मदा परिक्रमावगैरे पण केली. पण मुद्दा असा आहे कि त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न देवानी आपल्याकडे घेतलं किंवा गोनीदांनी तो देवावर सोपवला. आणि अनंत प्रकारचे अनुभव घेत ते फिरत राहिले. त्या भ्रमंतीच्या काळातले सर्व प्रकारचे अनुभव त्यांना ज्ञानपीठापर्यंत घेऊन जातील. ( मरणोत्तर ज्ञानपीठ देतात का हे माहिती नाही! पण ह्या दोघानाही तो मिळावा ) व्यंकटेश माडगुळकरांच आयुष्य जास्त अवघड अश्यासाठी होतं कि त्यांना त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आपलेआपण सोडवायचा होता. हि स्वेच्छेने स्वीकारलेली फकिरी मोठी अजब गोष्ट असते. अंती समाधान देणारी, आरंभी अनंत कष्ट आणि यातना देणारी. अशी खुशीची फकिरी या दोघांनीही आनंदानी स्वीकारली होती. पुन्हा या दोघांचाही वैशिष्ट्य असं कि दोघांनीही पोटाचा प्रश्न सुटावा म्हणून लेखनाला सुरवात केलेली आहे. सुदैवानी ‘आपण लेखक कसे झालो?’ हे दोघांनीही सविस्तर लिहून ठेवलेलं आहे. माडगुळकरांनी ‘प्रवास : एका लेखकाचा’ मध्ये लिहिलंय कि, पोटापाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा काही कळत नव्हतं. कोणतीही शैक्षणिक पदवी नव्हती, त्यामुळे नोकरीची अपेक्षा नव्हती. नाही म्हणायला पैसे कमवायचे दोन मार्ग समोर होते. चार रोघोट्या मारणं, चार अक्षरं लिहिणं! ते जमत होतं. पैशाचा प्रश्न सुटावा म्हणून कोणी लेखनाकडे वाळू शकतो यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. आपल्याला इतरांपेक्षा वेगळे काही अनुभव आलेत. वाचनामुळे आपल्याला असं काही कळल आहे जे इतरांना सहजी कळणार नाही अश्या गोष्टी लोकांना सांगाव्यात म्हणून माणसं लिहितात अशी माझी अजूनही समजूत आहे. त्यांच्या समोर पैसे मिळवणे हा दुय्यम हेतू असतो, असं मला अजूनही वाटतं.

p-35403-Vyankatesh-Madgulkar-02लेखकानी माण, आटपाडी, जत, माडगूळ या वैराण प्रदेशात चैतन्य ओतलं. हा सगळा परिसर माझ्या आजोबांच्या आणि बाबांच्या परिचयाचा आहे. सततचा दुष्काळ आणि त्यातून घडलेली माणसं हाच माडगुळकरांच्या गोष्टींचा मुख्य विषय आहे. त्या गोष्टी वाचताना बाबा सारख सांगतात कि हि वाडी मी पाहिलीये बर का! ती गावाची वेस, ते गावठाण, तो आठवड्याचा बाजार, ते मारुतीचं मंदिर, तो गावातला मुख्य पार. अश्या स्वभावाची माणसं. जे बाबांनी पाहिलेलं आहे तेच माडगुळकरांनी कागदावर लिहिलेलं आहे. लेखक म्हणून लेखकाचं योगदान काय आहे, जे अनुभव आलेत ते ( आवश्यक तिथे काही बदलांसह ) कागदावर लिहिणं. आपण घेतलेले अनुभव समोर वाचताना जो काय आनंद होतो तो मी बाबांच्या चेहऱ्यावर नेहमी बघतो. श्री. ना. पेंडसे यांनी सांगितलं होतं, ”कि मी कोकण सोडून बाहेर येणार नाही. प्रत्येक घर म्हणजे एका कादंबरीचा विषय आहे कोकणात. एखादा महाकवीची प्रतिभा असलेला कवी जर कोकणात येऊन राहिला तर या प्रदेशावर एक महाकाव्य सुद्धा तयार होऊ शकतं.” जे कोकणाच्या बाबतीत तेचा सर्व प्रदेशांना लागू आहे. लेखक लिहितो हेच लेखकाचं वेगळेपण आणि मोठेपण आहे.

नेहमीच लेखकांनी उभ्या केलेल्या पात्रांमध्ये आपल्याला स्वतः चे अनुभव दिसतील असं नाही, आणि तशी गरजाही नाही. लेखक एक धर्मा रामोशी बघतो. तो आणि त्याची बायको लेखकाच्या घरी काम करत असतात. अचानक बरेच दिवस एकता धर्माचा फक्त कामाला येतो. ती घराबाहेरही पडलेली दिसत नाही. आजारी वगैरे असेल म्हणून लेखक सोडून देतो. एक दिवस जुनं झालेलं, वापरत नसलेलं एक धोतर तो धर्माला देऊन टाकतो. आणि दुसऱ्याचा दिवशी धर्माची बायको ते धोतर नेसून घराबाहेर पडते. त्यानंतर कळतं कि बायको आजारी वगेरे नसून नेसायला घरात काही नाही म्हणून दाराआड बंद राहते. असे अनुभव दरवेळेला आपल्याला आले असतील असं नाही, पण माणसाच्या संवेदना जाग्या ठेवायला हे अनुभव किती उपयोगाचे आहेत. आवेग सहन न झाल्यानं डोळ्यातून पाणी येणं हा अनुभव शहरी जीवनातून बहुतेक नाहीसा झाला असावा. असा फक्त धर्मा रामोशीच नव्हे तर ‘माणदेशी माणसे’ मधील प्रत्येक माणूस हलवून टाकल्याशिवाय राहात नाही. या व्यवहारी जगात असे अनेक धर्मा रामोशी कागदावर उतरवण्याचा आणि त्यायोगे संवेदना टिकवून ठेवण्याचा किती मोठं काम माडगुळकर करत आहेत.

आजोबा होते तेव्हा सांगायचे कि ४८ च्या दंगली मध्ये आपलं पूर्वीचं कडेगावातलं घर लोकांनी जळालं होतं. गुन्हा एकच होता कि आम्ही ब्राह्मण होतो आणि गांधीजींची हत्या एका ब्राह्मणाच्या हातून झाली. ज्यांना आम्ही शेजारी म्हणत होतो. जे अडीनडीला हक्कानी मदत मागायला येत होते, आणि मदत करायलाही येत होते त्यांच्यात हातून ‘शेजारधर्म’ पळाला गेला. कडेगावला कधी विषय निघाला तर अजूनही पिकलेली तोंडं सांगतात कि ७ दिवस तुमचा वाडा जळत होता. ह्या दंगलींचा कादंबरीमय वृतांत म्हणजे ‘वावटळ.’ पुढचे शब्द प्रत्यक्ष वावटळ मधले आहेत- “आपल्या घरांना लागून असलेली घरं, अडीनडीला आपली मदत घेणारी, आपल्याला मदत करणारी आपल्याच गावातली हि माणसं आपली शत्रू होतील असे त्यांना कधी वाटले नव्हते. त्यांच्यापासून आपल्याल धोका आहे, हि जाणीव त्यांना आज पहिल्याप्रथम होत होती. हा धक्का अगदी अनपेक्षित होता. त्यांनी ती मंडळी मुळापासून कलली होती. कधी नव्हे ते त्यांना वाटत होते कि, आपण अनाथ आहोत. आपले असे म्हणायला कोणी नाही. केव्हा काय होईल याचा नेम नाही!’ ‘ज्या शब्दात आजोबा दंगलीची गोष्ट सांगतात त्याच भाषेत नावं बदलून माडगुळकर गोष्ट सांगतात. लेखक लेखक म्हणतात तो यालाच.

मी स्वतः ला एक बौद्धिक शिस्त लावण्याच्या प्रयत्नात आहे. ज्या दिवशी मराठी साहित्यिकाची जयंती किंवा पुण्यतिथी असेल त्या दिवशी त्या साहित्यिकाचं काहीतरी वाचायचं आणि त्यावर स्वतः काहीतरी लिहायचं. तसं ५ एप्रिलला व्यंकटेश माडगुळकर यांची जयंती आहे. त्यानिमित्त हे लिखाण झालेलं आहे. उगाच समीक्षा वगैरे अवघड शब्द न वापरता जे काय आपल्याला आवडलं, ते इतरांना सांगावं. इतरांनीही त्याचा आनंद घ्यावं इतकी साधी भूमिका आहे.

— मुकुल रणभोर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..