फायनल परीक्षेच्या वेळेपासूनच व्ही.जे.टी.आय.मध्ये विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू सुरू झाले. आमचे कॉलेज उत्तम रँकिंगचे असल्याने अनेक मोठ्या कंपन्या नोकरी देण्यासाठी येऊ लागल्या. त्यावेळी व्ही.जे.टी.आय.मधून इंजिनियर होणाऱ्या मुलांच्या खिशात दोन ते तीन कंपन्यांची अपॉईंटमेंट लेटर्स असत. एकंदरीत उत्तम नोकरी मिळणे त्यावेळी बरेच सोपे होते. निदान आमच्या कॉलेजसाठी तरी. एम.आय.डी.सी. च्या सरकारी नोकरीसाठी मी निवडलो गेलो आणि त्यानंतर एका इंटरनॅशनल कंपनीसाठी मी इंटरव्ह्यू दिला आणि दुबई येथील जॉबसाठी माझी निवड झाली. मला पगारही चांगलाच ऑफर झाला. भाऊंबरोबर (वडील), माझ्या काकांबरोबर बरीच चर्चा झाली. श्रीकांतजींबरोबरही चर्चा केली. गाण्यामध्ये काही करिअर करायचे असेल तर दुबईची नोकरी घेऊ नये, जमले तर नोकरीच घेऊ नये असे त्यांचे मत पडले. माझ्या वडिलांनी केमिकल उत्पादनाचा छोटा व्यवसाय सुरू केला होता. मी त्यातच काम करण्याचा निर्णय घेतला. कारण घरचाच व्यवसाय असल्यामुळे मला जास्तीत जास्त वेळ गाण्यासाठी देता येणार होता.
माझ्या वडिलांचे एक जवळचे मित्र आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी आणि निवेदक श्री. शंकर वैद्य हे व्ही.जे.टी.आय. जवळच रहात होते. या चार वर्षात श्री. शंकर वैद्य आणि त्यांच्या धर्मपत्नी महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखिका आणि विश्लेषक सौ. सरोजिनी वैद्य यांचा सहवास मला कॉलेजची चारही वर्षे लाभला. एक वेगळ्या दिशेने धडपड करणारा मुलगा म्हणून असेल कदाचित, पण त्या दोघांनाही माझे कौतुक वाटत होते. त्यांनी मनापासून मला मार्गदर्शन केले. माझ्या सांगितीक वाटचालीत त्यांचा फार मोलाचा वाटा आहे.
आमच्या कंपनीत कामाला सुरुवात केल्यावर एके दिवशी भाऊंची आणि माझी चर्चा झाली आणि ख्यातनाम कवी श्री. मंगेश पाडगावकर यांचे मार्गदर्शन मी घ्यावे असे त्यांनी ठरवले. साहित्यिक वर्तुळात अनेक वर्षे काम केल्यामुळे मंगेश पाडगावकरांशी त्यांची मैत्री होती. मी मंगेश पाडगावकरांना फोन लावला. त्यावेळी ते ऑफिसमध्ये होते. सकाळचे सुमारे अकरा वाजले होते.
“मला भेटायला एक वाजेपर्यंत येऊ शकशील का?” त्यांनी विचारले. मी लगेच होकार दिला.
“अरे, तू ऑफिसात काम करतो आहेस ना? मग लगेच ऑफिसमध्ये सुट्टी घेऊन माझ्याकडे यायला ऑफिस काय तुझ्या बापाचे आहे काय?” पाडगावकरांच्या मिश्किल धाटणीत मला प्रश्न आला. मी लगेचच उत्तर दिले, “मी येऊ शकतो, कारण ऑफिस खरोखरच माझ्या बापाचे आहे.
पाडगावकर खळखळून हसले आणि एक वाजता त्यांनी मला भेट दिली. ज्यांच्या असंख्य कविता आणि गाण्यांचे गारूड संपूर्ण महाराष्ट्रावर आहे, अशा या थोर कवीकडून कलात्मक मार्गदर्शनाची माझी अपेक्षा होती. पण पाडगावकरांनी माझे लक्ष या क्षेत्रातील व्यावसायिकतेकडे वेधले. नामवंत साहित्यिक पु.ल. देशपांड्यांचे एक वाक्य त्यांनी मला ऐकवले,
‘नाटक, सिनेमा, गाणे ही कला आहे असे म्हणता म्हणता तो एक व्यवसाय देखील आहे. याचा या क्षेत्रातील मंडळींना चटकन विसर पडतो आणि कला सादर होते, पण व्यवसाय मात्र बुडतो. या क्षेत्रात दीर्घकाळ काम करायची इच्छा असेल तर कलेइतकेच व्यावसायिकतेकडेही लक्ष दे,’ असा अत्यंत महत्त्वाचा सल्ला त्यांनी दिला. रेल्वेने परत येतांना मी विचार करू लागलो, की माझे वडील मला देत असलेले व्यावसायिक शिक्षण आणि आत्ता मंगेश पाडगावकरांनी सांगितलेला व्यावसायिक दृष्टीकोन जवळ जवळ सारखेच आहेत. फक्त कलाकार म्हणून काम करताना बऱ्याचदा आपण फक्त भावनिक विचार करतो. त्याचा व्यावसायिक विचार करण्याचे भान ठेवायला हवे.
– अनिरुद्ध जोशी
Leave a Reply