आयुर्वेद शास्त्रात , नित्य काही चर्या कराव्यात असा उल्लेख आहे . त्यातीलच एक नित्य कर्म म्हणजे व्यायाम होय . व्यायाम कधी करावा , किती करावा , कोणी करावा , कोणी टाळावा आदी सर्व मुद्दे आयुर्वेदात मांडलेले आहेत . त्याबद्दल थोडे सविस्तर जाणून घेऊया .
‘शरीरायासजननं कर्म व्यायाम उच्यते । ‘ अर्थ – ज्या कर्मा / कर्मांमुळे शरीरात आयास ( श्रम ) उत्पन्न होतात , थकवा येतो , त्या – त्या उपक्रमांना व्यायाम म्हणतात . ही व्यायामाची शास्त्रीय परिभाषा होय .
व्यायाम कधी करावा – सकाळी ब्राह्म मुहूर्तावर उठून , मल – मूत्राचे विसर्जन करून , क्रिया आटपून , दंतधावन , अभ्यंग व स्नान केल्यावर व्यायाम करावा . म्हणजेच शरीरातील आधीचे मलरूपी टाकाऊ घटक शरीरातून निघून गेल्यावर अभ्यंग स्नानाने स्वच्छ व तजेला आल्यावर रिकाम्या पोटी व्यायाम करावा .
व्यायाम किती करावा – आयुर्वेदानुसार शरीराच्या क्षमतेच्या अर्ध्या प्रमाणात ( अर्धशक्ती व्यायाम ) व्यायाम करावा . हे कसे ओळखावे ? तर व्यायाम सुरू केल्यावर जेव्हा कपाळावर , काखेत , नाकावर , खांद्यावर वगैरे घाम येऊ लागला , थोडे थकल्यासारखे वाटू लागले , श्वासोच्छ्वासाची गती वाढली , तोंड कोरडे पडले आणि हृदय स्थानी वजन / जखडल्यावत वाटू लागल्या क्षणी अर्धशक्ती व्यायाम झाला असे समजावे . ही अर्धशक्ती प्रत्येक व्यक्तीनुसार भिन्न भिन्न वेळी उत्पन्न होऊ शकते . तसेच प्रकृतीनुरूप , वयानुरूप आणि स्वास्थ्याच्या निकषांवरही याचा कालावधी बदलतो . जो रोज व्यायाम करतो , त्याची ही क्षमता हळूहळू वाढू लागते . खूप RIGOROUS व्यायाम लगेच सुरू करू नये . प्रमाण हळू – हळूच वाढवावे .
व्यायाम विशेषत : वसंत ऋतूत , हेमंत ऋतूत व प्रावृद ( पावसाळी ) असते त्यावेळी करावा . तो सकाळच्या वेळेस व अनाशेपोटीच करावा . मध्यरात्री , मध्यान्ही , उन्हाळ्यात व पोट भरलेले असतेवेळी करू नये . व्यायामाने शारीरिक थकवा अपेक्षित आहे , मानसिक ताण / थकवा नाही . त्यामुळे ओढून ताणून अति व्यायाम टाळावा . बरेचदा स्टेशनवर चालत जातो , सकाळ – संध्याकाळ भाजी मार्केटला जाते वगैरे सांगून व्यायाम केल्याचा ‘ आभास ‘ निर्माण केला जातो . पण या दैनंदिन घरकामांना वा बाहेरील कार्यांना व्यायाम म्हणता येणार नाही . कारण यात दमछाक होणे , घाम येणे इत्यादी नेहमीच होते असे नाही .
व्यायामाने शरीर सुगठित होतेच , त्याचबरोबर MUSCLES ची ताकद , आणि लवचिकता इत्यादीही वाढते . धावणे , उड्या मारणे , दोरीच्या उड्या मारणे , पोहणे , चालणे , नियुध ( लढाई ) , बाहुयुध ( ARM WRESTLING / BOXING ) असे सर्व व्यायामाचे प्रकार शास्त्रात सांगितले आहेत .
व्यायाम कोणी करू नये १० वर्षाखालील मुला – मुलींनी आणि ७० वर्षांवरील ज्येष्ठांनी वरील व्यायाम करू नये , पण सौम्य प्रमाणात नित्य हालचाली , योगाभ्यास केल्यास चालेल . गर्भिणीने , अति वार्तालाप करणाऱ्यांनी , जेवणानंतर , तहान लागलेली असताना , वाताची व पित्ताची व्याधी झाली असताना , भूक लागलेली असताना , तसेच काही आजाराने ग्रस्त असल्यास ( जसे – रक्तपित्त , राजयक्ष्मा , खोकला , दम लागणे , प्रचंड थकवा , अजीर्ण , ताप असतेवेळी , लघवीची तक्रार , अस्थिभंग , कानाचे विकार इत्यादी ) व्यायाम करू नये . वर्षा ऋतूत व्यायाम टाळावा / सौम्य स्वरूपात करावा .
अतिव्यायामाने होणारे त्रास – विविध शारीरिक व्याधी अति व्यायामाने उद्भवू शकतात . तसेच , जर लक्षणांची तीव्रता अधिक असली , तर मृत्यूही ओढवू शकतो .
व्यायामाचे फायदे – व्यायामाचे सर्वांगीण फायदे आहेत . केवळ शारीरिक पातळीवर नव्हे , तर मानसिक , भावनिक , आत्मिक फायदेही आहेत . व्यायामामुळे शरीरात हलकेपणा जाणवतो , काम करण्याची क्षमता वाढते तसेच शरीराची ENDURANCE CAPACITY ( सहनशक्ती ) देखील सुधारते . शरीरातील तिन्ही दोषांमध्ये समतोल साधला जातो , पचनशक्ती सुधारते , नित्य व्यायाम केल्याने वार्धक्य फार काळ टाळता येते . शरीराचा बांधा सुंदर , सुगठित , प्रमाणबद्ध व आकर्षक होण्यास मदत होते . शरीरात पोषक अंश उत्तमरित्या पोहोचल्याने , आळस – थकवा दूर होऊन , कफाच्या विविध व्याधींपासूनही आराम पडतो / त्रास होत नाही . शरीराची ताकद वाढते ( CAPACITY ) तसेच आरोग्यप्राप्ती होते , रोगप्रतिकारशक्ती सुद्धा वाढते . थकवा , श्रम , तहान , उष्णता व शीतलता सहन करण्याची क्षमता वाढते . कांती सुधारते .
शारीरिक बल आयुर्वेदानुसार तीन प्रकारचे असते –
सहज ( जन्मत : असलेली ताकद ) , कालज ( वयानुरूप आणि काळानुरूप , कमी जास्त होते ती ताकद ) आणि युक्तिकृत ( ACQUIRED ) . हे बल म्हणजे काही वेगळे नसून व्याधिप्रतिकारशक्ती आहे . व्यायामाने युक्तिकृत बल वाढविता येते . यामुळे रोगप्रतिबंध चांगल्या पद्धतीने करता येतो . पण जर रोग झालाच , तर त्याची लक्षणे आणि तीव्रता कमी ठेवण्यासही मदत होते . पण हे फायदे तेव्हाच मिळू शकतात जेव्हा रोज , अर्धशक्ती व्यायाम ( वर्षा ऋतू व उन्हाळ्यात अर्धशक्ती पेक्षा कमी ) न चुकता केला जातो
योग व व्यायाम यातील फरक –
योगाभ्यासामध्ये अष्टांग योग अभिप्रेत आहे . पण हल्ली केवळ आसन व प्राणायाम यालाच योग म्हटले जाते . योगाभ्यासात शरीराच्या ज्या हालचाली आहेत , त्या श्वसनाबरोबर SYNCHRONISED आहेत . यात स्थिरतेसाठी अधिक प्रयास केला जातो . ( स्थिरसुखं आसनम् ) योगाभ्यासात प्रत्येक पेशीला ACTION & COUNTER ACTION केली जाते . मांसपेशीचे CONTRACTION & RELAXATION केले जाते . सम्यक् व्यायामाची जी लक्षणे सांगितली आहेत . त्यातील कुठलेच लक्षण योगाभ्यासात अपेक्षित नाही . ( श्वसनाची गती वाढणे , घाम येणे , थकवा जाणवणे वगैरे . )
पण व्यायाम आणि योगसाधनेने दोन्ही , शरीर – मन इंद्रिये – भावना व आत्मा यावर सकारात्मक परिणाम होतो . व्यायाम कुठला करावा हा प्रत्येक व्यक्तीसाठी सापेक्ष आहे , बदलू शकतो . पण किती करावा व कधी करावा हे नियम तेच राहतील .
वैद्य . किर्ती मंदार देव
स्वकृत ,
नौपाडा , ठाणे .
९८२०२८६४२९
Leave a Reply