नवीन लेखन...

वारसा…

पाच वर्षांचा असताना मला बाबा सायकलवर पुढे लावलेल्या छोट्या लाकडी सीटवर बसवायचे. माझे दोन्ही पाय हॅण्डलच्या दांड्याभोवती टाकून मी पुढे सरकून बसायचो. रस्त्यावरुन सायकल वेगानं जाताना मला मौज वाटायची. मात्र रस्त्यावरील चढ चढताना बाबांनी पायडल मारण्यासाठी लावलेला जोर कधी मला जाणवलाच नाही. अशावेळी सायकल एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे कलली जायची व त्या सवारीचा आनंद मी लुटत राहिलो. आई वडिलांनी संसाराचा गाडा असाच जोर लावून ओढत नेताना मी मात्र माझी शाळा, अभ्यास, प्रगती यातच सुखावत गेलो.

एवढा संसार रेटण्याचा जोर आई बाबांनी कुठून आणला असेल हे समजण्याचं माझं तेव्हा वयही नव्हतं. कालचक्र फिरत होतं. प्रत्येक गोष्टीत बाबांना गृहीत धरणारा, ते आहेत, ते बघतील, ते करतील असं म्हणणारा मी, अलगद बाबांच्या भूमिकेत कधी शिरलो ते मलाच कळलं नाही.

तेव्हा आम्ही गावातील मैदानावरील स्टाॅलवरुन गणपती आणायला जायचो. ‘हीच मूर्ती घेऊ’ असा हट्ट करणारा मी ‘अरे, हीच मूर्ती योग्य आहे.’ असं ठामपणे कधी म्हणू लागलो हे मला समजलंच नाही.
‘बाबा, आज मी करु का गणपतीची आरती?’ असं विनवणारा मी, आरती आणि देवपूजा करायला कधी सरसावलो ते कळलंच नाही. ‘अजून थोडा मोठा झाल्यावर तुलाच आरती करायची आहे.’ असं समजावून सांगणारे बाबा मी आरती करताना मागे उभे राहू लागले, हे बघितल्यावर त्यांचं वय झालंय हे मला जाणवू लागलं.

आज वयाच्या अशा टप्प्यावर आलो आहे की, सगळा पट उलगडल्यासारखा वाटतोय. मला पडणारे प्रश्र्न माझ्या मुलाला पडू लागलेत. मी करायचो तो हट्ट, आता तो देखील करु लागल्यावर बाबा मला द्यायचे तशीच उत्तरं आता मी त्याला देऊ लागलोय.
आजही बाप्पा आणायला आम्ही एकत्र जातो. आता सायकलची जागा फोर व्हिलरने घेतली आहे. ‘तुम्ही या बाप्पांना घेऊन, मी घरी थांबून स्वागताची तयारी करतो’ असं बाबा कधी म्हणायला लागले हे कळलंच नाही.

आरतीचं ताम्हन धरायला जड जाईल असा विचार करणाऱ्या बाबांना आज चार आरत्या पूर्ण होईपर्यंत सलग उभं राहणं देखील जड जाऊ लागलंय. त्यांचा तो जोर वाढत्या वयामुळे कधी ओसरला ते कळलंच नाही.

बाबा… सायकलच्या दांडीवर मला बसवून पायडलला जोर लावून तुम्ही वेगात फिरायला न्यायचा, तो तुमचा जोर आज कुठे गेला हे मला समजलंय. तो सगळा जोर तुम्ही माझ्या मनगटात भरलाय आणि ती सगळी जिद्द मला ‘वारसा’ म्हणून दिली आहे, हे आता मला उमजलंय ….

आजही तुम्ही मला खूप आवडता… अगदी गणपती बाप्पांइतकेच!!
आज माझ्या वडिलांचा जन्म दिन!
आजचा हा लेख त्यांच्या चरणी अर्पण…

© – सुरेश नावडकर १-९-२०
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..