आपल्या देशात साधारणत: तीन ऋतू बघण्यास मिळतात उन्हाळा, पावसाला आणि हिवाळा. अजून काही वर्षांनी हे थोडे धाडसाने विधान करावे लागेल की काय असे वाटायला लागले आहे. काही वर्षांपासून लहरी आणि बदलाच्या हवामानामुळे प्रत्येक ऋतूत काहीनाकाही बदल झालेला दिसून येतो आहे. एखाद्या वर्षी जास्तच उन्हाळा, तर पावसाळ्यात प्रचंड पावसाळा. उत्तरेकडील काही राज्यात प्रचंड हिमवर्षाव आणि भूस्खलन झाल्याचे बातम्यांतून ऐकला आणि वाचायला मिळते. मुंबई आणि परिसरात पूर्वीसारखी थंडी आताशा जाणवत नाही पण कधीकधी जास्तच असते. असो.
दर वर्षी शेतकरी आकाश्याकडे डोळे लावून पावसाची वाट बघत असतो, मुंबईत उकाड्याने आणि पाणी कपातीमुळे हैराण झालेला मुंबईकर पावसाची वाट बघत असतो. सध्या गेले दोन पावसाळे महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस झाला म्हणावे लागेल. पण काही भागात अजून दुष्काळ सदृष्य परिस्थिती आहे. पण जेव्हां पाऊस भरपूर पडतो, सर्व तलाव भरून वाहू लागतात त्यावेळेस तात्पुरता आनंद होतो आणि नकळत आपल्या तोंडातून शब्द निघतात ‘चला यंदा पाणीकपात होणार नाही’ पण आपल्याला पाण्याच्या नियोजनाची तजवीज करण्याचे लक्षात येत नाही. हे वास्तव सगळीकडे आणि सगळ्याच बाबतीत बघावयास मिळते.
आपल्याला दररोजच्या जाण्यायेण्याच्या मार्गावर बऱ्याच गोष्टी दिसतात पण आपण त्याचा साकल्याने विचार, चिंतन, अभ्यास किंवा त्याकडे कुतूहलाने बघत नाही. जसे आपल्या शेजारी एखादी इमारत बांधत असतील किंवा जाणाऱ्या येणाऱ्या रत्यावर इमारतीचे बांधकाम चाललेलं असेल तर आपण नुसतं बघतो आणि पुढे जातो. मनात नाना विचार येतात “मुंबईची नुसती वाट लावली आहे”. एवढ्या इमारती बांधून नागरिकांच्या मुलभूत गरजा कश्या भागविता येणार आहेत? मुंबईत दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर रूप घारण करीत आहे. त्याला कारण आहे निसर्गाचे बदललेले ऋतूचक्र. त्यात एखादे वर्षी पाऊस नीट पडला नाही आणि तळी भरली नाही की पाणी कपात आणि बरेच काही. हे सगळे सांगण्याचा खटाटोप अश्यासाठी की…..
सध्या मुंबईसह देशातील बऱ्याच मोठया शहरात नवीन इमारतीं बांधण्याचे विविध ठिकाणी बांधकाम चालू आहे. आमच्याही इमारतीच्या बाजूला इमारत बांधण्याचे खोदकाम चालू आहे. त्यासाठी त्यांनी चांगलाच पाया खोल खणला आहे, म्हणजे इमारत नक्कीच २० ते २५ मजली असणार. खोदकाम करतांना त्यातून निघणारी माती आणि पाणी हे वेगवेगळे करता येत नाहीत. पण काही काळानी खोदकाम थांबते आणि खोदलेल्या खड्यातून पाण्याचे जिवंत झरा लागतो. परंतू झऱ्यातून पाणी एकसारखे वाहत असल्याने आणि खोदलेल्या खड्ड्यात तुंबत असल्याने ते मोटारच्या साह्याने बाहेर काढावे लागते पण ते तसेच जवळच्या गटारात सोडण्यात येते. काही वेळा गढूळ असते पण बऱ्याच वेळा चांगले स्वच्छ पाणी मोठया पाईपातून दिवसाचे जवळ जवळ पाच ते सहा तास किंवा अधिक तास जवळच्या गटारात सोडून दिल्याने याचा कोणालाच काही उपयोग होत नाही बघून मन अस्वस्थ होते. मनात असंख्य विचार येतात.
बऱ्याच गावातील स्त्रियांना पाण्यासाठी कैक किलोमीटर जाऊन पिण्याचे पाणी आणावे लागते आणि आमच्याकडे फुकट आणि भरपूर आहे पण त्याचा बिल्डर किंवा विकासक शुद्ध आणि स्वच्छ पाण्याला योग्य ज्ञाय देत नाहीत असे वाटते. शुद्ध आणि स्वच्छ पाणी प्रयोग शाळेत तपासून आणि खात्री करून, महानगरपालिकेला पाण्याचे नमुने देऊन त्यांनी पाणी पिण्यास योग्य असल्याचा दाखला दिल्यानंतरच त्या पाण्याचा पिण्यासाठी किंवा दुसऱ्या इमारतीतील झालेल्या बांधकामावर फवारण्यासाठी तसेच कुरिंगसाठी किंवा इतर कामासाठी वापर करण्यास काय हरकत आहे? किंवा याचा दुसरीकडे कसा उपयोग करता येईल का हे पाहावे. कुठे साठवून ठेवता येईल का? गावातील शेत तळ्यासाठी किंवा पाण्याच्या टँकरवाल्याला पाणी विकता येईल का? किंवा इतरत्र जमिनीत मुरवता येईल का? ज्यायोगे जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत मिळाले असे वाटते. पण…..!
वरील गोष्टींचा शासन/ग्रामपंचायती/पालिका/महानगरपालिकांच्या संबंधीत अधिकाऱ्यांनी साईटवर प्रत्यक्ष जाऊन निरीक्षण करून त्या संबंधी योग्य ती भूमिका घ्यावी जेणे करून शुद्ध व स्वच्छ पाण्याचे नियोजन होईल आणि पाण्याचा अपव्य टळेल.
जगदीश पटवर्धन