नवीन लेखन...

वॉटरटाईट डोअर्स

आमचा सिंग नावाचा सेकंड मेट हरियाणाचा जाट होता. बोलत असताना त्याचा टोन एकदम हरियाणवी असाच होता. पंचविशी ओलांडली होती आणि साखरपुडा करून काही दिवसातच तो जहाजावर जॉईन झाला होता. त्याचे पण पाच महिन्यांचे कॉन्ट्रॅक्ट असल्याने जहाजावर पाच महिने होऊन लग्नाच्या अगोदर दीड महिनाभर तरी घरी परत यायला मिळेल म्हणून त्याने लग्नाची तारीख थोडी उशिराच घेतली होती. पाच महिने होऊन गेल्यावर त्याची घरी जाण्यासाठी चलबिचल सुरु झाली होती. अरेंज मॅरेज असल्याने त्याची होणारी बायको सुरवातीला त्याचे डोकं जास्त खात नव्हती तोपर्यंत तो निवांत होता. पण साखरपुडा झाल्यापासून रोज फोन वर बोलणे वाढायला लागले. जहाजावर असताना v सॅट या सॅटेलाईट फोन सिस्टीम मुळे जहाज खोल समुद्रात आणि कुठल्याही देशात असले तरी खूपच स्वस्तात स्वतःच्या फोनवर स्वतःच्या केबिन मधून ऑफ ड्युटी असताना पाहिजे तेवढा वेळ बोलता येत होते. जहाजावर फेसबुक उपलब्ध होते पण तेव्हा व्हाट्सअप नसल्याने व्हिडीओ कॉल तेवढा करता येत नसे. व्हिडिओ कॉल साठी तेव्हा किनाऱ्यावर असताना सायबर कॅफे मध्ये जाऊन व्हिडीओ कॉल करावा लागत असे.

अरेंज मॅरेज असले तरी त्यांच्यात प्रियकर आणि प्रेयसी सारखे नाते फुलायला सुरवात झाली होती. जसे त्याचे पाच महिने पूर्ण झाले तसा तो घरी जाण्यासाठी बेचैन होऊ लागला. त्याची होणारी बायको त्याला रोज रोज परत कधी येणार असे विचारून विचारून नकोसे करू लागली. तसे त्याच्या लग्नाला अजून दीड महिना बाकी होता पण रोज रोज फोनवर बोलायची सवय लागल्यामुळे लग्नाची शॉपिंग करू हे घेऊ ते घेऊ अशी बोलणी होऊ लागली. एखाद्या शब्दावरून किंवा लग्नात असेच झाले पाहिजे अशा कारणांवरून मग रुसवे फुगवे सुरु झाले. प्री वेडिंग फोटो शूटची वगैरे स्वप्ने रंगवली जाऊ लागली.

आमचे जहाज इटलीहून इस्तंबूल मार्गे रशियाच्या नोवोरोसिस्क पोर्ट मध्ये निघाले होते. सहा दिवसांनी जहाज इस्तंबूल ला पोचणार होते आणि तिथे सेकंड मेट, पंपमन, कॅडेट, जुनियर इंजिनियर आणि सेकंड इंजिनियर अशा पाच जणांचे रिलिव्हर येतील आणि त्यांना घरी पाठवले जाईल असा मेसेज आला होता. सेकंड मेट खूप खुश झाला होता पण इस्तंबूलला पोचायच्या दोन दिवस अगोदर कॅप्टनचे मुंबई ऑफिसशी बोलणे झाले आणि बॉस ने सांगितले की सेकंड मेट चा जो रिलिव्हर होता तो मेडिकली अनफिट आहे त्यामुळे त्याच्यासाठी दुसरा रिलिव्हर अरेंज करेपर्यंत काही दिवस जातील, बाकी चार जणांचा क्रू चेंज होईल. सेकंड मेटचा रिलिव्हर जहाज रशियन पोर्ट मध्ये जाऊन पुन्हा रशिया हुन इस्तंबूल ला परत येईपर्यंत अरेंज होईल. इस्तंबूलहुन रशियातील पोर्ट मध्ये कार्गो लोड करून पुन्हा परत येईपर्यंत कमीत कमी सात दिवस लागणार होते. सेकंड मेट या बातमीने खुपच नाराज झाला. आता होणाऱ्या बायकोला कसे समजवायचे या चिंतेने तर तो जास्तच व्याकुळ झाला होता. त्याने तिला सांगितलं की रशिया मधून तुझ्यासाठी खूप सारी शॉपिंग करेन तुला काय काय आणू ते सांग वगैरे बोलून कशीबशी समजूत घातली.

रशियातील नोवोरोसिस्क मध्ये पोचल्यावर असे समजले की तिथे ऑइल टर्मिनलच्या कामगार युनियनने संप पुकारला आहे त्यामुळे जहाजांवर होणारे कार्गो लोडींग अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. रशिया मध्ये कंपनी कडून विजा च्या किचकट अटींमुळे क्रू चेंज होत नसल्याने सेकंड मेट सिंग पार रडकुंडीला आला. त्याच्या लग्नासाठी आता एक महिन्यापेक्षा कमी वेळ राहिला होता एवढे दिवस रंगवलेली स्वप्ने आता धूसर झाल्यासाखी त्याचे त्यालाच वाटायला लागली होती. एक एक दिवस जात होता पण युनियनचा संप काही केल्या मिटत नव्हता. जहाज जेट्टीवर नसल्याने बाहेर किनाऱ्यावर जायला मिळत नव्हते. दहा दिवसानी एकदाचा संप मिटला आणि कार्गो लोड करून जहाज इस्तंबूलच्या दिशेने निघाले. होणाऱ्या बायकोला कबूल केल्याप्रमाणे त्याला बाहेर खरेदीकरिता जाण्याची संधीच मिळाली नाही कारण जहाज त्याची ड्युटी संपल्यावर दोन तासांनी निघणार होते. पुन्हा एकदा त्याला होणाऱ्या बायकोचे रुसवे दूर करायला तासन तास लागू लागले त्यामुळे होणारी झोपमोड आणि त्याच्यात आलेला चिडचिडेपणा कधी कधी उचल खात असे मग तो जेवताना शादी मतलब जिंदगी की बरबादी हे उगाच म्हटले जातं नाही असं सांगून डोक्यावर हात आपटून घेत असे.

काळ्या समुद्रातून भूमध्य समुद्रात जाताना लागणारी इस्तंबूलची सामुद्रधुनी बोस्फ़ोरस स्ट्रेट म्हणून ओळखली जाते ही सामुद्रधुनी दोन्हीही बाजूने ओलांडण्यासाठी जहाजावर इस्तंबूल पोर्ट मधील स्थानिक पायलट जहाजावर येत असतात. साधारण दीड तासात एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जायला वेळ लागतो परंतु मोठ्या जहाजांना एकाच वेळेस एका दिशेकडून दुसरीकडे जाण्यासाठी सोडले जाते, एका मागोमाग एक असे ओळीने जहाजे पाठवली जातात त्यामुळे कधीकधी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या जहाजांना दहा तासांपासून चोवीस तासा नंबर येण्याची वाट बघावी लागते. आमचे जहाज ज्या दिशेने चालले होते तिथे पोचल्यावर दोन तासांनी आमचा इस्तंबूल ट्रान्झिट साठी नंबर लागणार होता. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे समुद्र थोडासा अशांत होता, जहाज जोरात नसले तरी बऱ्यापैकी इकडून तिकडे हेलकावत होते. सेकंड मेट सिंग आज रात्री साइन ऑफ होऊन घरी जायला मिळेल या खुशीत होता त्याचा रिलिव्हर मुंबईहुन विमानाने निघाला असल्याची बातमी आली होती. रात्री एक वाजता पायलट जहाजावर चढणार होता आणि अडीच ते तीन पर्यन्त इस्तंबूल क्रॉस केल्यावर जहाजासाठी प्रोव्हिजन आणि भाजीपाला घेऊन बोट येणार होती आणि त्यामधून सेकंड मेट घरी जाण्यासाठी उतरणार असे ठरले होते. रात्री बारा ते पहाटे चार सेकंड मेट चा वॉच असल्याने पायलटला जहाजावर रिसिव्ह करून नेव्हिगेशनल ब्रिज पर्यंत आणून सोड आणि ऑफ ड्युटी हो असे कॅप्टन ने सिंगला सांगून ठेवले होते. जहाज हेलकावत असतानासुद्धा पायलट त्याला सोडायला आलेल्या लहान बोट मधून कसाबसा जहाजावर चढला. पायलटला अप्पर डेक वरून आत अकोमोडेशन मधील जिन्याने नेव्हिगेशनल ब्रिज वर जाण्यासाठी सेकंड मेट ने रस्ता दाखवला आणि त्याच्या मागोमाग तो अकोमोडेशन मध्ये येऊ लागला. जहाजावर सगळ्या टाक्या किंवा जिथे जिथे बाहेर जाण्यासाठी दरवाजे असतात त्यांना वॉटर टाईट डोअर्स असे म्हणतात. वॉटर टाईट म्हणजे जहाज बुडाले तरी आत अकोमोडेशन किंवा एखद्या स्टोअर रूम मध्ये पाणी येऊ नये एवढे मजबूत दरवाजे असतात. मजबूत असल्याने ते खूप वजनदार आणि भारी भक्कम असतात. जहाज हेलकावत असताना हे दरवाजे अत्यंत काळजीपूर्वक उघडावे लागतात, वाऱ्यामुळे किंवा जहाजाच्या हेलकावण्यामुळे हे दरवाजे बंद होताना जोरात आदळले जातात. सेकंड मेट घरी जाण्याच्या तंद्रीत असल्याने अप्पर डेक मधून आत अकोमोडेशन मध्ये येताना त्याचे थोडेसे दुर्लक्ष झाले, एक पाय बाहेर असताना वॉटर टाईट डोर जहाज हेलकावल्या मुळे एवढ्या जोरात आदळले की सेकंड मेटला दरवाजावर नियंत्रण ठेवता आले नाही. दरवाजा आदळून बंद होत असताना त्याचा डावा पाय बाहेर होता आणि परिणामस्वरूप त्याच्या पायावर वॉटर टाईट डोअर एवढ्या जोरात आदळला की पायाचे हाड मोडल्याचा त्याला स्वतःलाच आवाज आला. त्याच्या तोंडातून जोरात किंकाळी निघाली ती ऐकून पायलट माघारी फिरला आणि त्याने सगळा प्रकार बघून ब्रिजवर कॅप्टनला वॉकी टॉकी वर कॉल करून ताबडतोब माहिती दिली. कॅप्टन ने लगेच सगळ्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले आणि सेकंड मेटला उचलून त्याच्या केबिन मध्ये आणून ठेवले. दहा मिनिटातच जहाज पुढे निघाले आणखीन दीड तासात घरी जाण्याच्या तयारीत असलेला सेकंड मेट केबिन मध्ये वेदनेने विव्हळत होता. माझ्या लग्नाचे आता बारा वाजले, आता लग्नाची तयारी करू की मोडलेला पाय संभाळू म्हणून रडू लागला होता. त्याला पेन किलर गोळ्या दिल्यावर अर्ध्या तासात तो थोडासा शांत झाला. फोर्थ इंजिनियरने त्याला युनिफॉर्म काढून घरी जायला काढलेले कपडे घालायला मदत केली. त्याची सामानाची सुटकेस आणि कागदपत्रे असलेली हॅन्ड बॅग खाली नेण्यात आली. पंपमन आणि फोर्थ इंजिनियर ने त्याला खुर्चीत बसवले आणि खाली अप्पर डेकवर आणले. त्याला एका पायावर चालत जाता यावे म्हणून इंजिन रूम च्या वर्कशॉप मध्ये फिटर ने तासाभरात त्याच्यासाठी पाईप पासून कुबड्या बनवल्या. जहाजावरुन भारतात जाण्यासाठी त्याचे सकाळी अकरा वाजताचे इस्तंबूल ते चंदीगड व्हाया दुबई आणि दिल्ली असे तिकीट आले होते. इस्तंबूल मध्ये पायावर इलाज करण्यासाठी त्याने स्वतःच नकार दिला होता, एकदाचे मला माझ्या घरी जाऊ द्या मग बघेन पायाचे असं तो होणारी वेदना दाबून ठेवून स्वतःलाच समजावत होता. इस्तंबूल ट्रान्झिट संपल्यावर पायलट उतरला आणि दहा मिनिटात जहाज पुढे जाऊन प्रोव्हिजन बोट साठी थांबले. कॅप्टन ने सेकंड मेट साठी दुसरी बोट मागवून सकाळी विमानतळावर पोचवण्या अगोदर इस्तंबूल मध्येच त्याच्या मोडलेल्या पायाला टेम्पररी प्लास्टर करण्यासाठी हॉस्पिटलला पाठवण्याची व्यवस्था करून घेतली होती. पहाटे चार वाजता सगळे खलाशी आणि अधिकारी त्याला निरोप द्यायला अप्पर डेकवर जमा झाले होते. दोन तासापूर्वी पायाचे हाड मोडून सुद्धा सेकंड मेट घरी जाण्याच्या आनंदात वेदना विसरून गेल्यासारखा दिसायला लागला होता. प्री वेडिंग फोटो शूट आता एका पायावर उभं राहून नाहीतर खुर्चीत बसून करावे लागेल म्हणून मिस्कीलपणे बडबडत होता. कसाबसा एका पायावर टेकू देत देत तो गॅंगवेच्या जिन्यावरून खाली क्रू बोट मध्ये उतरला आणि सगळ्यांकडे डोळे भरलेल्या नजरेने हात हलवून निरोप देऊन बोटच्या आत जाऊन बसला.

पंधरा दिवसानी त्याचे प्री वेडिंग फोटो शूट मधील काही फोटो त्याने स्टँडिंग स्ट्रॉंग अशी कॅप्शन टाकून फेसबुक वर झळकावले.

© प्रथम रामदास म्हात्रे

मरीन इंजिनियर

B. E. (Mech ), DIM.

कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..