मुग्ध तूं, लुब्ध मी,
बहरती प्रीत, लहरते वार्यावरी ।
भेट अपुली, व्हावी, कधीतरी,
आंस तरळते अंतरी, वरचेवरी ।
आंस ही तरळते अंतरी, वरचेवरी ।।धृ।।
योग जरी असला भेटीचा, नित्यरोजचा ।
नियमित, कधीच नसतो, नेम वेळेचा ।।
“असली” जरी ओढ, सुप्त हृदयाची ।
किमया ही अमोल, सारी नियतीची ।।
श्रांतू तूं, मला न मी,
बेट अपुली, व्हवी, कधीतरी,
आंसही, तरळते अंतरीं वरचेंवरी ।।१।।
चाल साधीच आहे, सरळ मार्गांवरी,
जीवनींच्या तरळ, धुंद, वळणांवरी ।
सौख्य——, ठसठशीत, भाळावरी,
मर्झीच तयाची, असावी सदा, खरोखरी ।।
स्तब्ध तूं, नि:शब्द मी,
भेट अपुली, व्हावी, कधीतरी,
आंस ही तरळते अंतरीं वरचेवरी ।।२।।
ठावून न कुणा, संकेत नियतीचे,
दडले रहस्य यातच, चिदानंदाचे ।
विश्वासूनि तयावरी, मार्गी चालणे,
चालीतुनि त्या, नित स्वानंदी रंगणे ।।
श्वास तूं, उ च्छवास मी,
भेट अपुली, व्हावी, कधीतरी,
आंसही, तरळते अंतरीं, वरचेवरी ।।३।।
नाते जडले अपुले, युगायुगाचे,
विणले धागे, उत्कट प्रीतीबंधाचे ।
असले धूसर जरी, ते योग भेटीचे,
जपणे, ते बंध रेशमी, जिवा शिवाचे ।।
भास तूं, अभास मी,
भेट अपुली व्हावी कधीतरी,
आंस ही, तरळते अंतरीं, वरचेवरी ।।४।।
गुरुदास / सुरेश नाईक
१८ मे २०११३०१ “ड्रीम क्लसिक”गणंजय,
पुणे – अक्षय तृतीया
“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply