MENU
नवीन लेखन...

हे हलाहल आम्ही पचवू शकणार नाही

हिंदुस्थानला कायमस्वरूपी गुलामीत ढकलू पाहणाऱ्या शक्तींनी बाहुबलाऐवजी बुध्दिबळाने आपले प्रयत्न चालविल्याचा उल्लेख मागील ‘प्रहार’मध्ये मी केला आहे. या शक्तींनी आपली कुटिल योजना तडीस नेण्यासाठी तीन प्राथमिक लक्ष्ये निर्धारित केली आहेत. त्यापैकी संस्कृतीवरचे त्यांचे अप्रत्यक्ष आक्रमण कसे यशस्वी ठरले, याचा उहापोह मागील लेखात झालाच आहे. या शक्तींचे दुसरे लक्ष्य इथला तरुण वर्ग आहे. भारतीय संस्कृती आणि तरुण वर्ग अशी ही दोन तसेच व्यापार उदिम हे तिसरे लक्ष्य निर्धारित करताना गोऱ्यांनी कमालीचे बुध्दिचातुर्य दाखविले आहे. वरकरणी या तिन्ही बाबी वेगवेगळ्या दिसत असल्या तरी त्यांचा एकत्रित परिणाम एखाद्या राष्ट्राच्या विकासाला किंवा पतनाला परिणामकारकपणे प्रभावित करू शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे. संस्कृतीची वीण विरळ झाली की, त्याचा पहिला बळी ठरतो तो युवावर्ग. विचाराला आणि आचाराला दिशा न मिळाल्याने हा वर्ग सैरभैर होतो आणि अशा विस्कटलेल्या युवाशक्तीकडून राष्ट्राच्या अस्तित्वाची किंवा विकासाची अपेक्षा बाळगणे व्यर्थ ठरते. संस्कृतीरूपी मुळावरच आघात केल्यावर त्या मुळांनी पुरविलेल्या जीवनरसावर पुष्ट होणारी तरुणाई कोलमडून पडायला कितीसा वेळ लागणार? आणि ज्या वृक्षाचे बहरणे, फुलणे बंद झाले असा वृक्ष लवकरच वठणार हे सांगायला पंडिताची गरज नाही. असा वठलेला वृक्ष तोडायला फारसे बळ लागत नाही किंवा असेही म्हणता येईल की, वठलेला वृक्ष तोडण्याच्याच योग्यतेचा असतो. या देशाच्या मुळावर उठलेल्यांचा ‘मास्टरप्लॅन’ त्या दिशेनेच कार्यरत आहे.

‘कुछ बात है की हस्ती मिटती नहीं हमारी,दुष्मन रहा है सदियाँ दौरे जहाँ हमारा’

कवी इकबालचा हा दुर्दम्य आशावाद आणि आत्मविश्वास आता पोखरायला सुरवात झाली आहे.

शेकडो वर्षांच्या गुलामीनंतरही हिंदुस्थानचे अस्तित्व कायम राखणारी ‘कुछ बात’ म्हणजे आपली संस्कृती होती, ध्येयवादाने भारलेले तरुण होते. ‘विवेकानंद’ आणि ‘भगतसिंग’ हातात हात घालून हिंदुस्थानच्या अस्तित्वाचे रक्षण करीत होते. भूतकाळात राजे शिवाजी आणि संत तूकारामानी तेच केले होते. आम्हाला हे कधी कळले नाही. परंतु आमच्या शत्रूंना मात्र आमच्या बलस्थानाची पुरती जाणीव झाली होती आणि म्हणूनच त्यांनी या देशातील विवेकानंद आणि भगतसिंग प्रसवणारी परंपराच नष्ट करण्याचे प्रयत्न चालविले. दुर्दैवाने (अर्थात आपल्या) त्यांच्या प्रयत्नांना अपेक्षेपेक्षा लवकरच आणि भरपूर फळे आली आहेत. भगतसिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर, देशगौरव सुभाषबाबू आज इतिहासाच्या पुस्तकात जेरबंद झालेत. आजचा तरुण केसांची झुलपे वाढवित, गुटखा चघळत चौकाचौकात नेत्रपल्लवी करण्यातच धन्यता मानत आहे.

‘कोण होतास तू, काय झालास तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू’

या गीतात सर्व सार आले आहे.आपले एखादे राष्ट्र आहे, त्या राष्ट्राप्रती आपली काही कर्तव्ये आहेत, ज्या स्वातंत्र्याचा आपण मन:पूत उपभोग घेत आहोत, ते स्वातंत्र्य आपल्याला फुकाफुकी मिळालेले नाही, त्यासाठी लाखो क्रांतिकारकांनी आपल्या जीवनाचा होम केला, हे त्यांच्या गावीही नाही. ‘व्हॅलेंटाईन डे’, ‘फ्रेन्डशीप डे’ च्या छचोर भुलभुलैय्यात अडकलेल्या आजच्या तरुणाला कदाचित हे माहीतही नसेल की ओठावर मिसरूड फुटू पाहण्याच्या वयातच अनेक क्रांतिकारकांनी आपल्या माना देशासाठी फासावर झुलविल्या होत्या. ‘चार काटक्या जमवून घरटे बांधायचे आणि पिलांची वीण वाढवायची यालाच संसार म्हणत असतील तर असला संसार मला करायचा नाही’, असे आपल्या नवपरिणीत वधूला सांगणारे वीर सावरकरांसारखे नरोत्तम याच देशात होऊन गेलेत, हे कुठल्यातरी झुडपाच्या आडोशाने आपले प्रेम फुलविण्याचा पुरुषार्थ करणार्‍या आजच्या तरुण पिढीला कुणीतरी सांगितले पाहिजे. पण सांगणार कोण? आणि सांगताना त्यांच्यासमोर आदर्श कोणाचा ठेवणार? स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी, सुभाषबाबू, वीर सावरकर ही त्यावेळच्या तरुणांची दैवत होती. आज कोण आहे?

सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारा जन्म घेतलेल्या आजच्या तरुणाचा प्रवासच मुळी आईच्या कुशी ऐवजी काचेची पेटी (इंन्क्यूबेटर) पाळणाघर, कॉन्व्हेंट सारख्या संस्कृतीचा, प्रेमाचा, नीतिमत्तेचा आधार नसलेल्या मार्गावरून सुरू झालेला असतो. या संपूर्ण मार्गात त्याच्या आचार-विचाराला दिशा देणारे ना त्याला गुरू मिळत ना शिक्षण! आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची नोंद घेत, भोवतालच्या परिस्थितीचे अवलोकन करीत तो मोठा होत असतो आणि मोठा होत असताना ज्या एका निर्णायक वळणावर त्याच्याकडे राष्ट्र मोठ्या अपेक्षेने पाहत असते नेमक्या त्याच वळणावर हा तरुण अधांतरी लोंबकळत असतो. कुठे जावे? काय करावे? या प्रश्नांची उत्तरे त्याच्याजवळ नसतात. त्याच्याजवळ ना संस्कृती, नीतिमत्तेचे पाठबळ असते ना भविष्याच्या वाटचालीला दिशा देणारा ध्येयवाद असतो आणि या परिस्थितीसाठी त्याला एकट्याला दोष देऊन चालणार नाही. या देशातील युवकांना अशा अनिर्णायकी स्थितीत आणून सोडणारी एक प्रभावी यंत्रणा कार्यरत आहे. आजचा युवक याच यंत्रणेचा बळी ठरला आहे. युवकांची मनोभूमिका ही क्षणात तयार होणारी गोष्ट नाही. त्याचे विचार कणाकणाने गोळा होत जातात आणि हे कणाकणाने पुरविले जाणारे खाद्यच आज भेसळयुक्त आणि दूषित झाले आहे. आपल्या आई-वडिलांना वृध्दाश्रमाचा रस्ता दाखविणारे किंवा एकवेळ वृध्दाश्रम परवडला, परंतु पोराचे घर नको अशी त्यांची अवस्था करणारे आईवडील पुढील पिढीला नीतिमत्तेचे कोणते धडे देणार? पैसा कमाविण्यासाठी कोणत्याही निलाजऱ्या तडजोडी करणाऱ्या बहुतांश आधुनिक सरांकडून त्याने काय शिकावे? ‘उँचे लोगों की उंॅची पसंद’ चा भ्रामक आणि दूषित प्रचार करणाऱ्या प्रसारमाध्यमांचा प्रतिवाद करण्यासाठी खऱ्या अर्थाने ‘उँचे लोग’ आज त्याला समाजात दिसत नसतील तर या प्रचाराला बळी पडणाऱ्या तरुणांना दोष कसा देता येईल? काय करावे किंवा काय करू नये, हे अधिकारवाणीने सांगणारा कुणी एखादा या तरुणांना भेटतच नसेल तर त्यांचे भरकटणे स्वाभाविक म्हणता येणार नाही का?

अशा भरकटलेल्या तरुणांकडून राष्ट्रभक्तीची अपेक्षा कशी करता येईल? 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या सकाळी ‘सारे जहाँसे अच्छा’ असलेला हिंदुस्थान संध्याकाळी पिझ्झा – बर्गरमध्ये विरघळत असेल तर दोष केवळ युवकांचा नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात देशाला स्वतंत्र करणे हे एकच ध्येय समोर असल्याने त्यावेळच्या युवकांना वेगळा ध्येयवाद सांगण्याची गरज नव्हती. परंतु स्वातंत्र्यानंतर परिस्थिती बदलली. ‘ध्येयवादाची’ एक प्रचंड पोकळी निर्माण झाली. दुर्दैवाने ही पोकळी अद्यापही कायमच आहे. परिणामस्वरूप एखादे कारगिल घडल्याशिवाय देशभक्तीचा ज्वर या देशात चढतच नाही. आपली देशभक्तीची कल्पना सीमेवरच्या जवानांपाशी सुरू होते आणि तिथेच संपते. नागरी जीवन जगणारे लोक आणि विशेषत: तरुणवर्ग तितक्याच प्रभावीपणे परंतु निराळ्या मार्गाने देशाची सेवा करू शकतात, हे लक्षात घ्यायला कोणी तयारच नाही. त्यामुळे गावपातळीवरील तरुण गुटखा, दारू आणि तत्सम व्यसनांच्या आहारी जात आहे तर कथित उच्चभ्रू तरुण मॅकडोन्डाल्ड, पिझ्झा – बर्गर, बरिष्टा (कॉफीहाऊस), सायबर कॅफे, लेडीज बारच्या साखळीत स्वत:ला गुंतवित आहेत. त्यांच्या लेखी पुढारलेपणाच्या व्याख्या खाण्यापिण्याचे पदार्थ, कपडे, मोबाईल, दुचाकी किंवा चारचाकी वाहनांच्या संदर्भाने निश्चित होत असतात. ही  आहे आजच्या युवावर्गाची अवस्था आणि त्यांची ही अशी अवस्था करण्यामागे कळत-नकळत आपलाही हातभार लागत आहे.

एकंदरीत, परावलंबनाचे पाश आवळणाऱ्या एका सुनियोजित षडयंत्राला आपण सगळेच बळी पडत आहोत. हे पाश पुराणकथेतल्या मोहक, रूपसुंदर विषकन्येसारखे आहेत. ही विषकन्या आपल्याभोवती वावरत आहे आणि तिच्या ‘वरलीया रंगाला भुलून’ आपण तिच्या प्राणांतक मिठीत हळूहळू परंतु निश्चित गतीने सामावल्या जात आहोत. आजची युवापिढी जेव्हा प्रौढ होईल आणि उद्याची नवी पिढी जेव्हा तारुण्यात पदार्पण करेल तोपर्यंत कदाचित आपला संपूर्ण देश या विषकन्येचे पण आपल्यावर अंकित करून घेत निळाशार होऊन गलितगात्र झालेला असेल, कारण हलाहल पचविण्याची क्षमता असणारे शंकरजी केव्हाच इतिहासजमा झाले आहेत.

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..