सौदी अरेबियाच्या जुबैल पोर्ट मध्ये सकाळी अँकर टाकून जहाज उभे होते. कार्गो लोडींग करण्यासाठी टर्मिनल कडून दुसऱ्या दिवशी बोलावण्यात येणार होते. अँकर असल्याने संध्याकाळी पाच वाजता इंजिन डिपार्टमेंटमध्ये सगळ्यांची सुट्टी झाली होती. साडे सहा वाजता डिनर करून मोकळी हवा खायला जहाजाच्या मागील भागात ज्याला पूप डेक म्हणतात तिथे दोघ तिघे जण कधी कधी जाऊन बसायचो. आमच्या इंजिन डिपार्टमेंट मध्ये असलेला साताऱ्याचा एक ट्रेनी सिमन आणि लक्षद्वीप जवळील मिनीकॉय आयलंडचा एक वयस्कर मोटरमन पण अधून मधून यायचा.
ऊन्हाळ्याचे दिवस असल्याने दिवस अजून मावळला नव्हता. क्षितिजावर सूर्य हळू हळू समुद्राकडे ओढला जात होता. खाली समुद्राकडे येत असताना सूर्याचे प्रखर तेज कमी कमी व्हायला लागले होते. क्षणा क्षणाला प्रखरता कमी होऊन सूर्याचा रंग बदलत होता. सूर्याच्या मागे आभाळाच्या पडद्यावर सुद्धा विविध रंगछटा पसरत होत्या. या सर्वांचा केंद्रबिंदू म्हणून सूर्य दिमाखात शोभून दिसत होता. समुद्राच्या पाण्यावर सोनेरी झालर पसरली होती. लाटांच्या तरंगांमुळे सोनेरी झालर झुळूझुळू हलतेय असे वाटत होते. जसं जसा सूर्य समुद्राच्या जवळ येत होता तस तसा लालबुंद झाल्यासारखा वाटत होता. काही क्षणातच सूर्य पाण्याखाली जाणार असे दृष्य दिसायला लागले. खाली सरकता सरकता सूर्याने जसा काय समुद्राला स्पर्शच केला आणि समुद्राने सुद्धा त्याला स्वतःमध्ये ओढून घेतले. आत ओढून घेत असताना सूर्याचा गोल आकार मडक्या सारखा झाला. उष्ण भट्टीतून जळणाऱ्या निखाऱ्यांतून बाहेर पडलेले लाल भडक मडके पाण्यात उपडे पडून स्वतःच बुडतेय असे दिसत होते. मडक्याचे तोंड पाण्यात गेल्यावर मग राहिलेला अर्धा भाग हळूहळू पाण्याखाली जाऊ लागला. सूर्यबिंब पाण्याखाली जात जात नाहीसे झाले. मावळतीच्या क्षितिजावर आभाळभर पसरलेला गडद तांबूस रंग हळूहळू फिकट होऊ लागला आणि काही मिनिटातच काळोखात नाहीसा झाला.
सूर्यदेवाचा खेळ संपल्यावर आता चंद्रदेवाने खेळ सुरु केला, चांदण्या लुकलुकायला लागल्या. ट्रेनी सिमनला म्हटलं आता चंद्रप्रकाश कसा दुधाळ दिसतोय पण तो कसल्यातरी विचारात दिसला, तरीपण तो म्हणाला दुधाळ चंद्रप्रकाश पाहिला की तिचा मधाळ चेहरा आठवतो. वाऱ्याची झुळूक आली की तिचे भुरभुरणारे केस आठवतात. जलतरंग जहाजावर येऊन आदळतात तितक्याच मंजुळ स्वरात तिच्या बांगड्या वाजल्याचे आठवतं. त्याला म्हटलं बस कर आता आठवणी, जाऊन मेसेंजर वर व्हिडिओ कॉल कर आणि बघत बस मधाळ चेहरा, फॅनवर भुरू भुरू उडणारे केस आणि बांगड्यांचे मंजुळ स्वर.
त्यावर तो म्हणाला तीन साब तुम्हाला बायको आहे आणि माझी प्रेयसी आहे तिच्या घरी तिचे वडील आणि भाऊ असतात. आपली जेव्हा सुट्टी असते तेव्हा व्हिडिओ कॉल काय व्हॉइस कॉल करायची पण चोरी. त्याला म्हटलं खरं आहे. मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या लग्नापूर्वी ब्राझील मध्ये साडे सात तास मागे असताना प्रियाशी बोलायला ती क्लिनिक मध्ये असेल ती वेळ साधून मला पण पहाटे पहाटे उठून फोन करायला लागायचा तेव्हा व्हाट्सअँप आणि फेसबुक आले नव्हते. जहाजावरील सॅटेलाईट फोनवर दोन तीन सेकंदाच्या टाइम डिले नंतर आवाज पोचायचा. पण कंपनीने व्ही सॅट नावाची कम्यूनीकेशन सिस्टिम लावल्यापासून मोबाईलवर फोन करून मी ऑनलाईन येतोय असे सांगितले की काही मिनिटातच कोणी त्यांच्या प्रेयसी सोबत कोणी बायको सोबत तर कोणी मुलांसोबत तासन तास कॉम्पुटर स्क्रीन समोर बसून बोलत बसायचे.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B.E. (mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply