श्रीकृष्ण केशव क्षीरसागर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडोबाची पाल या गावात ६ नोव्हेंबर १९०१ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा जिल्ह्यातील पाली आणि टेंभुर्णी येथे झाले. १९१८ साली साताऱ्याच्या शासकीय शाळेतून ते मॅट्रिकची परिक्षा पास झाले. त्यांचे महाविद्यलयीन शिक्षण धारवाड , कर्नाटक येथे झाले. १९२२ साली त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांना बी. ए . ची पदवी मिळाली. त्यानी त्यांच्या अध्यापनाच्या कारकिर्दीला सुरवात पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कुलपासून केली. १९४५ साली ते एम .इ . एस . महाविद्यालयात प्राध्यापक झाले.
श्रीकेक्षी यांना त्यांच्या आजोबांकडून प्राचीन मराठी साहित्याचे संस्कार झाले तर वडिलांकडून इंग्रजी साहित्याचे संस्कार मिळाले. त्यांच्या चुलत्यांकडून त्यांना सौदर्यवादी , आदर्शवादी दृष्टिकोन मिळाला.
पुण्यामंध्ये त्यांना गोपीनाथ तळवलकर , भय्यासाहेब उमराणी असे मित्र मिळाल्यामुळे त्यांची वैचारिकदृष्ट्या जडणघडण होत गेली.
श्रीकेक्षी यांनी १९२५ पासून आपल्या लेखनाला सुरवात केली . त्यांनी १९३१ साली शेजवलकर यांच्या ‘ प्रगती ‘ साप्ताहिकामध्ये क्रमशः दीर्घ भावकथा लेखन केले. त्यानंतर हे लेखन ‘ राक्षसविवाह ‘ या कादंबरीच्या रूपाने प्रकाशित झाले. त्याआधी १९२६साली ‘ बायकांची सभा ‘ हे त्यांचे पाहिले पुस्तक प्रकाशित झाली सुरवातीला त्यांनी कथा, कविता असे ललित लेखन केले. परंतु १९३६ साली सावरकर आणि पटवर्धन यांच्या भाषाशुद्धीवर परखड टीका केल्यामुळे ते सर्वाना माहीत झाले. ती टीका त्यांनी सह्याद्री मासिकांमधून केली होती. त्याचप्रमाणे त्यांनी भाई डांगे आणि सानेगुरुजी यांच्या उपदेशप्रधान भूमिकेवर टीका केली. पुणे येथे महाराष्ट्र शारदा मंदिरात १५ डिसेंबर १९३५ रोजी त्यांनी “ खरी भाषाशुद्धी आणि तिचे खरे वैरी अर्थात सावरकर आणि पटवर्धन ” हा निबंध श्रीकेक्षीं यांनी वाचला. ‘ सह्याद्री ’ मासिकाच्या फेब्रुवारी आणि मार्च १९३६ या दोन अंकांमधून तो प्रसिद्ध झाला. या दोन्ही लेखांनी मराठी साहित्य क्षेत्रात जी खळबळ उडाली तिचे आणि त्या लेखांवरच्या सावरकर आणि पटवर्धन यांच्या प्रतिक्रियांचे चित्रण श्रीकेक्षीं यांच्या ‘ तसबीर आणि तकदीर ‘ या आत्मचरित्रात वाचावयास मिळते.
श्रीकेक्षी यांनी अनेक जणांशी वाङ्मयीन वाद केले. ती एकप्रकारे वाङ्मय चळवळ ठरली होती. ‘ श्रीकेक्षी : एक वाङ्मयीन लेखसंग्रह ‘ ह्या पुस्तकांमध्ये त्यांनी केलेलं अनेक वाङ्मयीन वाद वाचावयास मिळतात. जे. कृष्णमूर्ती यांच्या विचारांबद्दल त्यांची वेगळी मते होती . परंतु दोघे एकत्र आल्यावर झालेला ‘ निशब्द संवाद ‘ पुणेकरांना माहित आहे.
श्रीकेक्षी यांनी भाषाशुद्धीप्रमाणे अश्लीलतेसंबंधी वाद खूप गाजला. त्यांच्या मते अश्लीलता हा नीतीच्या कायद्याचा भंग नसून कलेच्या कायद्याचा भंग आहे. साहित्यक्षेत्रात त्यांचा एक विचारवंत समीक्षक म्ह्णून दबदबा होता. त्यांची स्वतःची मते परखड होती ते म्हणत वास्तववाद , सौन्दर्यवाद आणि गूढवाद हे ‘ वाङ्मयाचे त्रिनेत्र ‘ आहेत . ते स्वतःला ‘ सोदर्यवादी-अध्यात्मवादी ‘ समजत असत. त्यांच्या मते आधुनिक टीकाकार कलाकृतीच्या मुखाने कवीच्या मानसरोवरापर्यंत उलट प्रवास करतो , कवीची संपूर्ण कृती मनाने रचतो.
श्रीकेक्षी यांचे आधुनिक मराठी समीक्षा विश्वात आणि विचार विश्वात फार मोठे स्थान आहे कारण त्यांनी समीक्षेला वेगळी दिशा दिली. त्यांनी मराठी आणि अन्य भारतीय आणि जागतिक वाङ्मयातील श्रेष्ठ साहित्यकृतीचे आणि कलावंतांचे अंतरंग उलगडून दाखवले. मराठी भाषेच्या वापरातले वाढत्या अराजकामुळे श्रीकेक्षीं नेहमी व्यथित असत हे त्यांच्या जीवनाच्या अखेरच्या वेळेपर्यंत वेळोवेळी केलेल्या लेखांवरून स्पष्ट होते.
श्रीकेक्षी यांनी ‘ मराठी भाषेचे सरकारी शिल्पकार ‘ हा त्यांचा या विषयावरचा शेवटचा लेख ‘ युगवाणी ‘ च्या राजभाषा मराठी नोव्हेंबर-डिसेंबर १९७९ च्या विशेष अंकात प्रसिद्ध झाला. परिभाषानिर्मितीच्या बाबतीतील त्यांची भूमिका या सरकारी शिल्पकारांनी समजावून घेतली नाही , तिचा विपर्यास केला याचे दुःख श्रीकेक्षी यांना शेवटपर्यंत होते.
स्वातंत्र्यानंतरच्या काळातील नवसाहित्याशी त्यांचे जुळले नाही विशेषतः मर्ढेकरांच्या कवितेशी त्यांचे सूर जुळले नाहीत. ते म्हणत , ‘ नवकाव्यात जे नवे आहे ते काव्य नाही आणि जे काव्य आहे ते नवे नाही.’ साठोत्तर काळातील समीक्षकांच्या एक गटाने त्यांची शत्रूवत उपेक्षा केली. तरीही मराठी समीक्षेच्या इतिहासात त्यांनी केलेले कार्य ऐतिहासिक आणि महत्वाचे आहे.
१९५९ साली मिरज येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या ‘ टीकाविवेक ‘ या ग्रंथास महाराष्ट्र्र शासनाचा पुरस्कार आणि अन्य पुरस्कार मिळाले आहेत
श्री. के . क्षीरसागर यांनी बायकांची सभा प्रहसन , स्त्रीशिक्षण परिषदेची वाटचाल , डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर , राक्षसविवाह , व्यक्ती आणि वाङ्मय समीक्षा , उमरखय्यामची फिर्याद समीक्षा , टीकाविवेक समीक्षा , आधुनिक राष्ट्रवादी रवींद्रनाथ ठाकूर समीक्षा , वादे वादे समीक्षा , केशवसुत आणि तांबे , तसबीर आणि तकदीर ही पुस्तके लिहिली . त्याचप्रमाणे साहित्य अकादमीने ‘ निवडक श्री.के. क्षीरसागर लेखसंकलन ‘ प्रकाशित केले. त्यांचे ‘ तसबीर आणि तकदीर ‘ हे आत्मचरित्र खूप गाजले.
मराठी भाषेतील लेखक, विचारवंत, समीक्षक प्रा. श्री. के. क्षीरसागर ह्यांचे २९ एप्रिल १९८० रोजी निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply