स्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी ही पृथ्वीवरच्या प्रत्येक सजीवाची मूलभूत गरज आहे. तरीही असे आढळून आले आहे की, जगात आज अनेक लोक शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत.
म्हणूनच दूषित पाण्यामुळे पसरणाऱ्या रोगराईचे प्रमाण वाढतच आहे. पाण्याचे प्रदूषण मुख्यतः सूक्ष्म जिवाणू आणि रासायनिक टाकाऊ पदार्थांमुळे होते. हानीकारक सूक्ष्म जिवाणूंमुळे ज्या ठिकाणी पाणी दूषित होते त्या ठिकाणी आतड्याचे रोग जसे टायफॉईड, कॉलरा, आव (डिसेंट्री), काविळ, पोलिओ आढळून येतात. मलामुळे उष्ण हवामानातील भारतासारख्या देशात विषाणू, बुरशी इत्यादींचा प्रादुर्भाव आणि प्रसार जोमाने होतो आणि दूषित पाण्यामुळे होणारे साथीचे रोग झपाट्याने फैलावतात.
– मलेरिया, डेंग्यूसारखे रोगही पाण्यात डासांनी अंडी घातल्याने होतात. लेप्टोस्पायरॉसीससारखा आजार दूषित पाण्यामार्फतच पसरतो.
-प्रदूषित पाण्यामुळे सर्रास होणारे आजार म्हणजे अतिसार, जुलाब, उलट्या, त्वचारोग.
हल्ली आपण पाहतोच की ‘प्रदूषित पाणी’ हा एक ज्वलंत प्रश्न झाला आहे. मुंबई महानगरपालिकेने नुकतीच एक पाहाणी केली. संपूर्ण शहरात पिण्यासाठी वापरले जाणारे पाणी तपासले गेले. त्याचा अतिशय धक्कादायक असा निकाल लागला आहे. मुंबई शहरातील जवळजवळ सर्व वॉर्डातील पाणी दूषित असून, पिण्यास योग्य नाही. पिण्याच्या पाण्यात ई-कोलायसारखे अपायकारक जिवाणू आढळले.
त्यामुळेच मुंबई शहरात कावीळ, टायफॉईट यासारख्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर पोटदुखी, जुलाब इ. आजार व हिपेटायटीससारखे जंतुसंसर्ग बऱ्याच लोकांमध्ये आढळतात. आपल्या घरात येणारे पाणी गढूळ असल्यास, रंग, वास असल्यास ताबडतोब पाण्याची चाचणी करून घ्यावी, आपल्या घरातील फिल्टर या सर्व प्रकारचे दूर करत आहेत याची खात्री करून घ्यावी. तोपर्यंत शास्त्रीय प्रक्रिया केलेले, नावाजलेल्या कंपनीचे, बाटलीबंद पाणी पिणेच सुरक्षित आहे.
– प्रीती मोहिले
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply