सुमारे पंधरा-सोळा वर्षापूर्वीची ही गोष्ट.त्यावेळी माझी मुलगी इयत्ता पहिलीत होती.तिला ‘माझी आई’ह्या विषयावर पाच ओळी लिहायला सांगितले होते,व तिने काय लिहायचे हे तिच्या वर्ग-शिक्षिकेने वर्गात फळ्यावरच लिहून दिले होते.
फळ्यावरची आई,माझ्या मुलीच्या आई सारखी नव्हती! म्हणून तिने ‘आपल्या आई’ विषयी पाच ओळी लिहिल्या!! वर्ग-शिक्षिकेला अर्थातच राग आला! व फळ्यावरचीच आई सर्वांनी लिहिली पाहिजे असा आग्रह केला.
ह्या संदर्भात त्यांना भेटलो.’प्रत्येकाची आई वेगवेगळी आहे. मुलांनी फळ्यावरची आई उतरवून काढण्यापेक्षा,त्यांना स्वत:च्या आई बाबत काय वाटते हे मोकळेपणाने लिहिणे अधिक महत्वाचे आहे’असे समजावण्याचा त्यांना प्रयत्न करत होतो.
त्यावेळी त्या गुरुमाउलीने मला एका ब्रम्हवाक्य ऐकवले, “हे पाहा,मला सत्तर वह्या तपासायच्या असतात. सगळ्यांनी सारखे लिहिले की तपासायला सोपे जाते! काय कळले?”
मला एव्हढेच कळले की,आणखी वाद घालणे म्हणजे (स्वेच्छेने) कपाळमोक्ष करून घेणे! त्यानंतर आम्ही काही पालक एकत्र आलो आणि आम्ही ‘सृजन घर’सुरू केले.सृजन घर म्हणजे,’रविवारची गंमत शाळा.’ विशेष म्हणजे आमच्या पैकी कुणीही ‘शिक्षक’नव्हते. शाळेशी व्यर्थ वाद न घालता,शाळेला पूरक भूमिका घेणं हे मुख्य उद्दीष्ट.त्याचप्रमाणे,शाळेने मुलांसाठी जे-जे करावं असं आम्हाला वाटे,ते-ते आम्ही इथे करायला सुरुवात केली. उदा.पावसाळ्यात मुलांनी त्यांच्या शालेय परंपरेनुसार ‘पावसाळ्यातील एक दिवस’हा निबंध त्यांनी शाळेत लिहिला.आम्ही आमच्याी शाळेत पावसाळ्याचे तीन गट केले.गावातला पावसाळा, शहरातला पावसाळा आणि झोपडपट्टीतला पावसाळा.वर्तमान पत्रातील फोटो,बातम्या, शाळेजवळच्या झोपडपट्टीत जाऊन मुलाखती,शेजाऱ्यांची व पालकांची मदत आणि त्यांच्या गटांची निरीक्षणे ह्यांची मदत घेऊन मुलांनी धमाल निबंध लिहिले.एका मुलाने निबंधात लिहिले होते, ‘माझ्या घराच्या बाजूला गॅरेज आहे.पाऊस आला की रस्त्यावर विचित्र आकाराची इंद्रधनुष्ये वाहात असतात.हातात काठी घेऊन आम्ही वाहणारी इंद्रधनुष्ये जोडण्याचा खेळ खेळतो!’ ‘वाहणारी इंद्रधनुष्ये जोडण्याचा खेळ!!’ही उत्तुंग कल्पना केवळ मुलेच करू शकतात. मुलांवर विश्वास ठेवला आणि त्यांना जर अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले तरच हे शक्य होऊ शकते, असा एक नविनच साक्षात्कार मला त्यावेळी झाला.(मी ‘त्या वर्ग-शिक्षिकेचा’ आजन्म ऋणी आहे.)
सृजन घरात मुलांच्या मदतीने निबंध लेखनाच्या विविध पध्दती विकसित केल्या. भाषा, गणित,विज्ञान आणि परिसराबाबत वेगवेगळे उपक्रम आणि प्रकल्प कार्यान्वित केले.इयत्ता पहिलीपासूनच मुलांनी स्वत:हून वेगवेगळे प्रयोग केले व निष्कर्ष काढले. शैक्षणिक सहलींचे आयोजन केले.मुलांनीच मुलांची धमाल प्रदर्शने आयोजित केली.धड्यांची नाट्यीकरणे केली. संवाद कथांसाठी पपेटस् चा वापर केला.दिवाळीत मुलांनी पालकांच्या मदतीने फराळ तयार केला,त्याच्या रेसीपी लिहिल्या! आमची ही रविवारची शाळा पाच वर्ष सुरळीत चालली.
पालक आणि शिक्षक म्हणून मी ह्या शाळेतल्या मुलांच्या मदतीनेच घडत गेलो.हे काम सुरू असतानाच अनेक शिक्षण चळवळींशी,शिक्षण संस्थांशी,शिक्षकांशी सातत्याने संबंध येत गेला.त्यांच्यासाठी /त्यांच्या शिक्षकांसाठी ‘अध्यापन कौशल्य कार्यशाळांचे’आयोजन करत होतो. ह्या कामाची ‘युनिसेफ’ने दखल घेतली आणि त्यांच्या सोबत दोन वर्ष ‘शिक्षण सल्लागार’ म्हणून ग्रामीण/नागरी भागातील शाळांसाठी पण काम केले.त्यातूनच आढळलेले काही मुद्दे सूत्ररुपात पुढे मांडत आहे.
लहानपणीच मातृभाषेबाबात अरुची निर्माण होण्याची काही प्रमुख कारणे पुढील प्रमाणे आहेत.(जिथे भाषेचा पाया घातला जातो,अशा प्राथमिक शाळेपासून जरी सुरुवात केली असली तरी पूर्व-प्राथमिक विभागाला पण सोबत जोडून घेतले आहे.पुढील कारणे ही दोन्ही विभागांचा विचार करून एकत्रितपणे दिली आहेत.ह्या लेखापुरता जागेच्या मर्यादेमुळे फक्त पूर्व-प्राथमिक व प्राथमिक विभागांचाच विचार केला आहे.त्याचप्रमाणे पुढील सर्व कारणांसाठी,काही सन्माननीय अपवाद हे गृहितच धरलेले आहेत.)
— पालक मुलांना गोष्टी सांगत नाहीत.
— हातात पुस्तक घेऊन,गोष्टी वाचून दाखवत नाहीत.
— पालक वेगवेगळ्या विषयांवर मुलांशी गप्पा मारत नाहीत.तसेच मुलांची मते जाणून घेण्यात त्यांना अजिबात रस नसतो.
— आपण जशी गोष्ट सांगितली होती,तशीच/त्याचप्रकारे/त्यात काहीही बदल न करता मुलांने आपल्याला सांगावी अशी पालकांची/शिक्षकांची अपेक्षा असते. मुलांनी केलेले भाषिक/काल्पनिक बदल मोठ्या माणसांना सहन होत नाहीत. त्यांचा (काल्पनिक)इगो दुखावतो.
— घरात पाहुणे आले असता,आपले मूल हे ‘टेपरेकॉर्डर’आहे/असावे ह्याबाबत पालक ठाम असतात! ‘अमूक गाणे/गोष्ट आत्ताच्या आत्ता म्हण/सांग’अशी आज्ञा सोडून पालक वाट पाहात बसतात.मुले अनिच्छेने,नाईलाजाने (खरंतर पालक बलशाली असल्याने,मार मिळण्याच्या भीतीने) गाणं/गोष्ट, म्हणतात/सांगतात. असल्या अपमानास्पद वागणूकीमुळे मुलांच्या मनात गोष्टी/गाणी ह्याविषयी एक अढी निर्माण होते पर्यायाने ती वाचनापासून लांब जातात.
— घरात मुलांसाठी पुस्तकेच नसतील तर..आणि ‘पुस्तक वाचणारे पालक’मुले पाहात नसतील तर..
— मराठी भाषेबाबत अरुची निर्माण करण्याचे सर्वात मोठे योगदान बालभारतीचे म्हणजे पाठ्यपुस्तकांचे पण आहे!! (ह्याबाबत सविस्तर पणे पुढे लिहिले आहे.)
— शिक्षक भाषा शिकविण्याचा (केविलवाणा)प्रयत्न करतात/भाषा शिकविणे म्हणजे पाठ्यपुस्तक पुरे करणे,असे काही शिक्षक समजतात. त्यामुळेच मुले भाषा शिकत नाहीत.जर मुलांवर विश्वास टाकला आणि शिकवण्यापेक्षा ही मुलांसोबत शिकण्याचा अनुभव घेतला,त्यांना शिकण्याची संधी दिली तरच मुलांना भाषेची गोडी लागेल.
— विविध भाषिक खेळांचा अध्यापनात उपयोग केला जात नाही.
— पाठ्यपुस्तकातील रटाळ स्वाध्याय.
— ‘फाटक्या नोटेचे आत्मवृत्त’ ‘पावसाळ्यातील एक दिवस’ ‘माझा आवडता नेता’ हे तेच ते घिसा-पिटा निबंध! (गाइड घ्या,निबंध लिहा)
— शाळेतील बंद वाचनालये (पुस्तके फाटतील म्हणून केवळ पुस्तकांच्या काळजीखातर ती नीट जपून ठेवलेली असतात.)
— ‘वाचन विकास प्रकल्पाची कार्यवाही केवळ कागदोपत्रीच’पाहायला मिळते.
— विश्वकोश,व्युत्पत्ती कोश,संस्कृती कोश,शब्द कोश,इत्यादी संदर्भ ग्रंथांचा वापर शिक्षकच करत नसतील तर मुलांना कसे समजावे?
— ‘अवांतर वाचन म्हणजे केवळ वेळ फुकट घालवणे! त्यापेक्षा अभ्यासाचे काही वाचा.’अशा ठाम (आणि अपरिवर्तनीय) मताचे अनेक पालक/शिक्षक.
— विविध भाषिक उपक्रम आणि प्रकल्पांचे मुलांच्या मदतीने शाळेतूनच आयोजन होत नाही.
— परीक्षा पद्धती ही आकलनापेक्षाही स्मरणशक्तीवर भर देणारी असल्याने,’घोका आणि ओका’ यात मुले अडकतात.
— ‘आपण काही वेगळं करू शकतो’हा विश्वासच शिक्षक/पालक हरवून बसले आहेत.
Leave a Reply