घरातील भिंतींना रंग लावावा, कारण त्यामुळे १) भिंतीवरील सिमेंट किंवा तत्सम पदार्थांच्या प्लॅस्टरचा टिकाऊपणा वाढतो. २) प्रत्येक खोलीत नैसर्गिक प्रकाश योग्य रीतीने व जास्त प्रमाणात पसरतो. ३) रंगीत भिंतींमुळे खोलीतील वातावरण सुंदर, आकर्षक व आल्हाददायक बनते.
इंग्रजीत पेंट आणि कलर असे दोन भिन्न अर्थी शब्द आहेत, पण मराठीत मात्र पिवळ्या रंगाचा रंग लावावा असे म्हणावे लागते. म्हणून पुढील विवेचनात पेंट आणि रंग (कलर) असे शब्द वापरले आहेत. बाजारात विविध प्रकारचे पेंट उपलब्ध असतात. अगदी चुन्याच्या निवळीपासून ते ऑईल बाऊंड डिस्टेंपर, ऑईल पेंट, आक्रायलिक पेंट, एनॅमल पेंट असे अनेक कमी-जास्त किमतीचे व कमी-जास्त टिकाऊ पेंट उपलब्ध असतात. यापैकी कोणता पेंट निवडावा हा ज्याच्या त्याच्या ऐपतीचा प्रश्न आहे, पण रंग कोणता निवडावा यासाठी काही मार्गदर्शन जरूर करता येते.
१) कोणताही रंग निवडला तरी तो गडद नसावा तर तो फिकट असावा. त्यामुळे प्रकाशाचे परावर्तन चांगले होते. गडद रंग खोलीमध्ये काळोखी आणतो व डोळ्याला आल्हाददायक वाटत नाही. २) घर जर चारही बाजूंनी उंच इमारतींनी वेढलेले असेल तर घरात प्रकाश कमी येतो. अशा वेळी फिकट पिवळा, पांढरा अथवा फिकट पोपटी रंग योग्य ठरतो. ३) सकाळी आणि संध्याकाळी ऊन घरात येत असेल तर किंवा प्रखर प्रकाश येत असेल तर फिकट निळा, हिरवा किंवा लव्हेंडर रंग निवडावा. ४) बैठकीच्या खोलीत फिकट जांभळा, पिवळा किंवा नारिंगी रंग द्यावा. ५) स्वयंपाकघरात भिंतींनाही अर्ध्या उंचीपर्यंत लाद्या लावलेल्या असतात. त्याला सुसंगत असा रंग द्यावा. ६) झोपायच्या खोलीत फिकट गुलाबी, लव्हेंडर किंवा नारंगी रंग द्यावा. ७) तक्तपोशी पांढऱ्या रंगाचीच असावी. ८) दारे. खिडक्यांना मॅचिंग रंग किंवा सनमायका असावा. हल्ली खिडक्या बहुतेक नैसर्गिक रंगाच्या अॅल्युमिनियम व संपूर्ण काचांच्याच असतात. प्रत्येक रंगात अनेक छटा असतात. त्या आवडीप्रमाणे निवडाव्यात.
Leave a Reply