जपमाळ कशास हवी, सखये ? न हवे रुद्राक्षमणी, सखये
जप करतो आहे तुझाच, माळेविणाच मी सखये ।।
ईशप्राप्तिसाठी ऋषीमुनी जपतप करती खूप
ऋषी न मी, करि तुजसाठी जपतप परी, सखये ।।
जप केल्यानें प्रसन्न होउन, देई दर्शन देव
तुझ्या दर्शना मी आतुर, देशील कधी, सखये ?
उघड्या नेत्रीं वसतें कायम तुझेंच रूप, प्रिये
जपात, मिटल्या नयनां दिसते मूर्ति तुझी, सखये ।।
ओढुनही जपमाळ, न येणें मरणाचें थांबे
माळेवाचुन ना अडलें स्मरणाचेंही सखये ।।
जप करि मी, तूं ‘ज़प’ म्हणशी, पण तुजविण काय ज़पूं ?
‘जीवन झपझप संपो’ , एकच आस मनीं, सखये ।।
११.०७.२०१६
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply