संधीवात म्हणजे सांध्याचे दुखणे. ‘संधिवात’ हे निदान नसूनलक्षण आहे. ज्याप्रमाणे ताप हा मलेरिया, फ्लू अशा अनेक कारणांमुळे येऊ शकतो, त्याचप्रमाणे संधिवातदेखील बऱ्याच कारणांमुळे होऊ शकतो. वैद्यकीय भाषेत संधिवाताला म्हणतात. (हुमॅटिझम) सांधेदुखी किंवा संधीवात दोन प्रकारचे असतात.
१) झिजेचा/घर्षणाचा संधीवात (ऑस्टिओआर्थ्रोयटिस) हा वयोमानानुसार होणारा त्रास आहे. सांधा हा अर्थातच दोन हाडांचा झालेला असतो. या दोन हाडांमध्ये गादी असते. वयोमान व शरीराच्या वजनानुसार या गाद्या घासल्या जातात. त्यामुळे जेव्हा सांध्यावर वजन पडते तेव्हा तेथील हाडे एकमेकांवर घासल्याने त्रास होतो. गुडघेदुखी, मान व कंबर यांचा स्पाँडेलायटिस, हे या प्रकारच्या संधीवातात मोडतात.
२) सुजेचा संधिवात (इनफ्लमेशन आर्थायटीस) – यात सांध्यांना विशेषतः बोटांच्या सांध्यांना सूज येते आणि सकाळी सांधे कडक वाटतात. हुमॅटाईड आर्थायटीस एस.एल.ई. या आजारांत अशी सूज येते. शरीरात युरिक अॅसिड वाढल्यानेही सांध्यांना सूज येऊ शकते. या संधीवाताला (गाऊट) म्हणतात.
या प्रकारचा संधिवात कुठल्याही वयात होऊ शकतो. वर म्हटल्याप्रमाणे सांधा हा अर्थातच दोन हाडांचा बनला असतो. या हाडांवर व सांध्यांच्या आतल्या बाजूला कागदासारखा स्नेहल पटल असतो. ‘सुजेचा संधिवात’ या प्रकारात या पटलाला सूज येते. ती नंतर दिसायला.लागते व सांधा दुखतो आणि सुजतो.
शरीरातील रोगप्रतिकार शक्ती ही रोगजंतूंपासून आपले संरक्षण करीत असते. पण कधी कधी ती आपल्या सांध्यांना परकीय शत्रू मानून त्यांच्यावर हल्ला चढविते. अशावेळी सांध्यांमध्ये असलेला स्नेहल पटल हा हल्ल्याचा बळी ठरतो आणि सुजतो.
या संधिवातात बोटांच्या व पायांच्या सांध्यांना सूज येते. तथापि, नंतर ती बाकीच्या इतर सांध्यांनादेखील येऊ शकते. सकाळी ही सूज जास्त असते व सांधे कडक/ताठर वाटतात. जर उपचार लवकर करण्यात आले नाहीत, तर ही सूज सांध्यातील गादी व नंतर हाडे पोखरते. यामुळे सांधे वाकडे व विद्रूप होऊ शकतात. तुमचे सांधे दीड महिन्यांपेक्षा जास्त दिवस दुखत आहेत का? तीनपेक्षा जास्त सांधे दुखतात का? बोटांचे (हाताच्या आणि पायांच्या) सांधे दुखतात व सुजतात का? सकाळी एक तासांपेक्षा जास्त वेळ सांधे कडक/ताठर वाटतात का? वेदनाशामक गोळ्या सारख्या घ्याव्या लागतात का? हे प्रश्न स्वतःला विचारा व त्यांची उत्तरे होकारात्मक असली तर तज्ज्ञाला भेटा.
डॉ. शशांक अकेरकर
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply