काँक्रिट आपल्याला माहित असते. पूल, धरणे, बंधारे इत्यादीसाठी आपण सिमेंट-काँक्रिटचा वापर करतो. तुळईचा आकार आयताकृती असतो. आवश्यकतेनुसार तुळई तीन मीटरपासून १५० मीटर पर्यंत लांब असू शकते. इमारत किंवा पूल यांच्यावर स्वतःचे आणि त्यावर उभारलेल्या वस्तू आणि रहदारीचे वजन, वाऱ्याचा दाब, भूकंपाचे धक्के इत्यादिचे परिणाम स्लॅबवर पडतात. स्लॅबवरून ते मग तुळयांवरच्या सांगाडयावर येतात. तुळया खांबावर आधारलेल्या असल्याने वजन खांबावर येते. सर्व खांब फाऊंडेशनवर उभे असल्याने अखेर हे सर्व वजन इमारतीच्या पायावर पडते. तुळईला ठराविक अंतरावर खांबांचा आधार दिलेला असतो. पण दोन खांबांच्या मधल्या भागाला आधार नसतो. तुळईवर विटांची भिंत असते किंवा पुलाचा रस्ता इत्यादीचा भार असतो. या भाराखाली तुळई खालच्या दिशेने वाकते. या वाकण्यामुळे तुळईच्या खालच्या बाजूला ताण निर्माण होतो व वरच्या बाजूला दाब निर्माण होतो. काँक्रिटला दाब सहन करता येतो पण ताणाखाली ते फाटते आणि त्याला भेगा पडतात म्हणून तुळईच्या खालच्या बाजूला पोलादी सळया टाकलेल्या असतात. त्यालाच आपण आरसीसी- रिएनफोर्ड सिमेंट काँक्रिट म्हणतात.
प्रीस्ट्रेस्ड काँक्रिट समजण्यासाठी एक प्रयोग समजून घेऊ. काही पुस्तकांची थप्पी आडवी करून दोन बाजूला आधारावर ठेवली तर स्वतःचे वजनही न पेलल्याने ती पुस्तके खाली पडतात. पण ती थप्पी जर दोन्ही बाजूंनी हाताने दाबून धरली तर पुस्तके खाली पडणार नाहीत. शिवाय त्या थप्पीवर हलके वजनही तोलले जाईल. दाब दिल्याने पुस्तकांच्या खालच्या बाजूने जो ताण येतो त्याच्या विरूद्ध दाब आल्यामुळे ती पडत नाहीत. या दाबाला पूर्वभार किंवा प्री-स्ट्रेस्ड म्हणतात.
प्री-स्ट्रेस्ड तुळईत नेमके हेच साधले जाते. खालच्या अंगाला जेवढा ताण येईल त्याच्या विरुद्ध दिशेने दाब दिल्याने त्यावर वजन आल्यावर त्यात ताण निर्माण होत नाही आणि तुळईची वजन तोलण्याची शक्ती अनेकपटीने वाढते. मजबूत पोलादी तारांच्या सहाय्याने हा दाब निर्माण केला जातो.
Leave a Reply