खरे तर इमारतीचे आयुष्य किती हे सांगणे अशक्य असते. आपण बघितले, गुजरातमध्ये शक्तिशाली भूकंप झाला तेव्हा अगदी अलीकडे बांधलेली बांधकामे जमीनदोस्त झाली, पण काही बांधकामे मात्र तडाही न जाता जशीच्या तशी उभी होती. मग हे कसे काय झाले? तसेच जुने जुने पूल उभे असतात पण अलीकडच्या काळातले मात्र पडतात. त्यामुळेच कुठल्याही इमारतीचे नक्की आयुष्य सांगणे खूप कठीण काम आहे.
स्ट्रक्चरल ऑडीट म्हणजे इमारतीच्या सद्यस्थितीचा एकंदर लेखाजोखा, स्ट्रक्चरल अभियंता हा इमारतीच्या सद्यस्थितीचा अंदाज वर्तवू शकतो, थोडक्यात म्हणजे इमारतीच्या तब्येतीची तपासणी ! त्यात किती नुकसान झाले आहे, त्यात काय दुरूस्त्या कराव्या लागतील, वगैरे सांगू शकतो. त्यासाठी इमारतीबद्दलच्या नोंदी कराव्या लागतात. इमारतीचा इतिहास प्रथम गोळा करतात. इमारत कधी बांधली गेली? तिची मूळ वास्तूरचना कशी होती? खांब आणि तुळयांचे आरेखन कसे केले गेले होते? काय काय घटक विचारात घेतले गेले, हे सगळे अभ्यासले जाते. मुख्य म्हणजे, वापरात असलेल्या काळात तिच्यात किती व कसे बदल केले गेलेत ह्याचा तपशील लागतो. हे बदल करताना मूळ खांब, तुळयांना धक्का पोचलाय का? भिंतीत पाणी मुरतेय का? ओल धरलीये का? मुरलेल्या पाण्यामुळे भिंत कमकुवत होते. इमारतीचा वापर कसा आहे ते अभ्यासले जाते. रहिवाशी इमारतीची काळजी कशा प्रकारे घेतात? पुष्कळदा अंतर्गत बदल करताना नकळत काही नुकसान होते. हे सर्व अत्यंत बारकाईने तपासले जाते. या सगळ्याचा सविस्तर वृतांत बनवला जातो. काही ठिकाणी अंतर्गत सजावटीने बराच भाग झाकला गेल्यामुळे बऱ्याच भागाचे परीक्षण करणे अशक्य होते.
अशी तपासणी सहकारी संस्थेच्या नियमाप्रमाणे पहिले १५ वर्ष करावी लागत नाही. नंतर मात्र दर पाच वर्षांनी व इमारतीला ३० वर्षे झाल्यावर दर तीन वर्षांनी करणे आवश्यक आहे. त्यासाठी एखाद्या स्ट्रक्चरल अभियंत्याचा सल्ला घ्यावा. वेळोवेळी इमारतीची योग्य तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती वेळेवर केल्यास इमारतीचे आयुष्य नक्कीच वाढेल.
Leave a Reply