माकड जेंव्हा आरशात बघतं, तेंव्हा त्याला माकडच दिसतं..!
आणि माणसाला..?
हा प्रश्न मी फेबुवर विचारला होता. खुप जणांनी उत्तर द्यायचा प्रयत्न केला. बऱ्याच जणांची उत्तरं मला अपेक्षित उत्तराच्या जवळ जाणारी होती, परंतू मला अपेक्षित असलेली ती उत्तरं नव्हती.
तरी हरकत नाही. प्रश्नावर विचार करायचा आणि विचारांती त्यांना पटलेली उत्तरं देण्याच्या माझ्या मित्र मैत्रिणींनी केलेल्या प्रयत्नांचं मला खरंच खुप कौतुक वाटतं. उत्तर बरोबर किंवा चुक यापेक्षा विचार करणारे लोक माझ्या मैत्र यादीत आहेत, याचा मला जास्त आनंद वाटतो..
तर, माणूस जेव्हा आरशात पाहातो, तेंव्हा त्याला माकडाप्रमाणे माणूसच दिसतो, हे त्या प्रश्नाचं अपेक्षित उत्तर.
परंतू तसं खरंच होतं? याचं उत्तर मात्र नाही असंच मिळतं, असा आपल्या सभोवताली आणि आपल्या स्वत:कडेही पाहाताना निश्कर्ष काढावा लागतो.
माणूस जेंव्हा आरशात पाहातो, तेंव्हा त्या आरशात त्याचा इगो दिसतो, त्याची प्रतिष्ठा दिसते, त्याचं पद दिसतं, पैसा दिसतो, त्याच्या ‘मी’पणा दिसतो. कुणाला सतिन तेंडुलकर दिसतो, कुणाला अमिताभ दिसतो, कुणाला कतरीना दिसते, कुणाला सायना दिसते, तर फार कमी जणींना का होईना, पण लेफ्टनंड स्वाती महाडीकही दिसत असेल.
थोडक्यात माणसाला आरशात स्वत:ला पाहाताना काहीही दिसू शकतं, दिसत नाही तो फक्त त्याच्यातला ‘माणूस’..!
माणूस ‘देवाचा अंश’ असतो असं म्हणतात, परंतू माणसाचं वागणं पाहिलं की, तो ‘माकडाचा (बिघडलेला) वंश’ आहे हे वैज्ञानिक सत्य मात्र पटतं.
फरक एकच, माणूस ज्या माकडाचा वंश आहे, ते माकड मात्र आपल्या नैसर्गिक गुणधर्माशी जास्त प्रामाणिक असतं..म्हणून त्याला आरशात ते स्वत:च दिसतं..
जो पर्यंत माणसाला आरशात तो स्वत: दिसत नाही, तो पर्यंत तो स्वत:चं आणि इतरांचं आयुष्य बदलू शकत नाही..
— ©️ नितीन साळुंखे
9321811091
(फोटो-इंटरनेट)
Leave a Reply