आजकाल मुंबईत सगळीकडे उंचच उंच इमारती दिसतात. उंच इमारती बांधायला अनेक गोष्टींचा आधार घ्यायला लागतो. मुख्यत्वे मजबूत खांब आणि तेही इमारतीच्या क्षेत्रफळावर एकसारखे विखुरलेले असे ठेवले तर इमारतीचा भार सगळीकडे सारखा वाटला जातो. अशाने इमारत व्यवस्थित उभी राहू शकते.
अशा इमारतींना शीअर वॉलचा आधार असतो. शीअर वॉल म्हणजे काँक्रिटची मोठया आकारची भिंत, जणू पसरलेले मोठ्या आकाराचे खांबच. या बहुतांश भिंती काँक्रिटच्याच असतात. त्यात लोखंडी सळयांचे जाळे विणलेले असते. अशा भिंतींनाच आरसीसीच्या म्हणजे रिएनफोर्सड् सिमेंट काँक्रिटच्या भिंती असे म्हणतात. शहरातील सध्याच्या सर्वच इमारतींची छते म्हणजे स्लॅब्ज या आरसीसीच्या असतात. त्यामुळे त्या वजन व्यवस्थितपणे पेलू शकतात. अशा बांधकामाची ताकद ही सामान्यपणे विटांनी बांधलेल्या बांधकामापेक्षा खूप जास्त असते. इमारतींचे वजन उंचीमुळे वाढलेले असते. वाढलेले वजन पेलण्यासाठी काँक्रिटचे मोठे खांब आणि जाड भिंती बांधणे आवश्यक असते. विटांच्या भिंतींना भार पेलण्याची क्षमता कमी असते.
साधारणपणे इमारतीच्या मध्यभागी लिफ्टभोवती किंवा अगदी बाहेरच्या बाजूला या भिंती घालतात. त्यांची जाडी खालपासून वरपर्यंत एकसारखी असते. ती बदलत नाहीत. जेवढी इमारत उंच तेवढया शीअर वॉल्स अधिक रूंद. याशिवाय सिमेंट काँक्रिटची गुणवत्ता ही आणखी एक महत्वाची बाब असते. कोणत्या गुणवत्तेच्या काँक्रिटने या भिंती बांधल्या आहेत ते महत्वाचे असते. काँक्रिट उच्च प्रतीचे आणि अधिक ताकदवान असावे लागते. बांधकामाच्या जागी बनवलेल्या सिमेंट काँक्रिटपेक्षा कारखान्यात तयार करुन टँकरने बांधकामाच्या जागी आणलेले रेडी मिक्सड़ काँक्रिट हे एकसारख्या गुणवत्तेचे आणि उच्च् प्रतीचे असते. याच्या वापरामु बांधकामाचा दर्जा चांगला मिळवता येतो. गगनचुंबी इमारतींना चांगला पाया असणे हे ही तितकेच महत्वाचे असते.
२००० वर्षापूर्वी कौटिल्याने इमारत किती उंच असावी याबद्धल सांगितलेले तत्व असे की, अशी इमारतं समोरच्या रस्त्यावर पडली तर ती रस्त्याची अर्धी रूंदी व्यापेल एवढीच उंच असावी.
Leave a Reply