आज आपल्या देशात विकलांग चिकित्सा करताना सर्वसाधारणपणे आढळून येणारी बाधा म्हणजे गुडघा या सांध्याचा दाह. स्त्रियांमध्ये या रोगाचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात दिसते.
स्थुलता हे एक महत्त्वाचे कारण यामागे आहे. विशेषतः ५५ ते ६० या वयोवर्यादेनंतर अशा व्याधीचा त्रास जाणवू लागतो. वजन पेलणाऱ्या या गुडघ्याच्या सांध्यातील कास्थी झिजतात व सांध्यातील हाडांची टोके एकमेकांवर घासू लागतात. त्यामुळे हाडांची झीज होते, असमतोलता निर्माण होते, सांध्याच्या भागात व्यंग निर्माण होते व सांध्यात कडकपणा जाणवतो. रोजच्या व्यवहारातील चलनवलन करताना व चालताना वेदना होतात. दिवसेदिवस हा त्रास वाढतच जातो; परंतु हे सर्व सोसण्यापेक्षा गुडघ्याचा सांधा बदलणे हा एक उपाय आहे.
हल्लीच्या आधुनिक संशोधनामुळे ही शस्त्रक्रिया करण्यासाठी नवी नवी तंत्र विकसित होत आहेत. सांध्यातील व्याधीग्रस्त भाग बदलून त्या जागी कृत्रिम भाग बसविण्यात येतात. यामुळे सांध्याची वजन पेलण्याची क्षमता वाढते. सांध्यात निर्माण झालेले व्यंग व आलेला असमतोलपणा शस्त्रक्रियेमुळे कमी होतो. पायाची जुळणी व्यवस्थित होते. संपूर्णपणे गुडघ्याच्या सांध्याचे प्रतिरोपण ही एक मोठी शस्त्रक्रिया समजली जाते. त्यामुळे त्याचे महत्त्वही
तितकेच आहे.
या सांध्याचा जेव्हा मोठ्या प्रमाणात दाह होऊ लागतो त्या वेळी संपूर्ण सांधा बदलण्याखेरीज पर्याय नसतो; परंतु या बाधेची नुकतीच सुरुवात होऊन फारशी हानी झालेली नसते अशा वेळी इतर पर्याय विचारात घेता येतात. ते पर्याय म्हणजे आर्थ्रोस्कोपी करून शस्त्रक्रिया करणे, टिबिया या पायातील हाडाच्या वरच्या भागाचे छेदन करून योग्य तो समतोल गाठणे किंवा फिजिओथिरपीने रोजच्या हालचालींचे व्यवस्थित नियंत्रण करणे. सांध्यातील एखादा विशिष्ट निकामी भाग झाल्यास फक्त तेवढाच भाग बदलता येतो; परंतु सर्व भागांना बाधाझाल्यास असह्य वेदना होतात, चालणे अशक्यप्राय होते व वेदनांमुळे झोपमोड होते. अशा वेळी संपूर्ण सांध्याचे प्रतिरोपण हाच एकमेव उपाय ठरतो.
-डॉ. कौस्तुभ दुर्वे
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply