अर्थात त्यांच्याबरोबर ही कामे करताना माझी खूपच धावपळ व्हायची. कधी कंटाळाही यायचा. मात्र अंक प्रसिद्ध व्हायच्यावेळेस इतका उत्साह असायचा की जणू नवं अपत्यच बघायला मिळणार आहे. त्याची नाकीडोळी म्हणजेच अंतरंग बघून समाधान व्हायचं.
माझ्या मामेसासूबाई निर्मला पंडितराव यांना लग्नानंतर जेव्हा मी प्रथम भेटले, त्यांच्याशी बोलले तेव्हाच त्या मला इतक्या आवडून गेल्या की, मनाशीच ठरवलं आपल्याला असं होता आलं पाहिजे. सर्वांना आपलंसं करून घेणारं लोभस व्यक्तिमत्त्व. वयाच्या नव्वदी नंतरही हसतमुख असणार्या, दुसर्यांच्या आनंदात आनंद मानणार्या, माझ्या मुलांची आवडती आज्जी, पणतवांची पणजी आज्जी, सर्वांना हवीहवीशी वाटणारी आज्जी. गोष्ट सांगण्याची अलवार पद्धत.
गंमत अशी की मी बेडेकर विद्या मंदिरमध्ये शिकत असताना दुसरी-तिसरीत त्या मला शिकवायला होत्या. अर्थात हे सर्व लग्नानंतर कळलं. शाळेतही सर्वांच्या आवडत्या शिक्षिका.
खरं म्हणजे आपल्या प्रत्येकातच ऊर्जा उसळत असते. अन् आपण मोठे होत जाऊ तशी आपण ऊर्जेला वाट देत असतो. कधी कधी ती सुप्तावस्थेत असते. म्हणजे असं की ती योग्य वातावरणाची किंवा संधीची वाट पाहत असते. कधी असं होतं की अचानक परिस्थिती अशी काही उद्भवते की नकळत जबाबदारी उचलली जाते आणि आपल्याला माहीत नसलेली सुप्त ऊर्जा उसळी मारून येते. अर्थात इतक्या सहज हे घडत नाही. परिस्थिती चांगलं तावून सुलाखून घेते. विचारांचं बीज रुजलेलं असतंच कळत नकळत.
राजेन्द्रांबरोबर लग्न झाल्यावर 3-4 वर्षांतच त्यांचं ‘धनंजय’ आणि ‘चंद्रकांत’ दिवाळी अंक आणि वडील शंकरराव यांच्या प्रती असलेलं अपर प्रेम पाहून थोडी असूया वाटली खरी, मात्र त्यांच्याबरोबर अंकाचं काम करताना त्यांची शिस्त, एकाग्रता, लेखक, चित्रकारांच्या भेटी, व्यवसायाने वास्तुशास्त्रज्ञ असल्याने आणि सर जे जे कला विद्यालयात शिक्षण घेतल्याने चित्रकलेविषयी तयार झालेली नजर, व्यवसायासाठी गरज असलेला ठामपणा या गोष्टीचा प्रत्यय येत गेला. वडिलांवर प्रेम होतं तरी त्यांच्याकडून झालेल्या व्यावहारिक चुका राजेंद्रांनी कटाक्षाने टाळल्या. त्यामुळे कधी कटुताही स्वीकारावी लागली.
अर्थात त्यांच्याबरोबर ही कामे करताना माझी खूपच धावपळ व्हायची. कधी कंटाळाही यायचा. मात्र अंक प्रसिद्ध व्हायच्या वेळेस इतका उत्साह असायचा की जणू नवं अपत्यच बघायला मिळणार आहे. त्याची नाकीडोळी म्हणजेच अंतरंग बघून समाधान व्हायचं. एखादी चूक दिसली तर आपसातच नेत्रपल्लवी व्हायची. मात्र उत्साहाच्या वातावरणात बाधा यायची नाही. विक्रेत्यांचे फोन आणि लेखकांची उत्सुकता यातच दिवाळी साजरी व्हायची. अजूनही होते. कित्येक वेळेला छापखान्याच्या दारात बसून अंकांचे पार्सल बांधले आहे. तर कधी बाईंडरच्या समोर फुटपाथवर बसून पार्सले बांधली आहे. हे सर्व आठवले की वाटतं खरंच ही ऊर्जा येते कुठून? अशा ऊर्जेला वयाचं बंधन नसतं. उलट ती आपल्याला दिवसेंदिवस तरुण करत जाते.
या कामानिमित्ताने झालेल्या दिग्गजांच्या भेटी ऊर्जा देण्यास हातभारच लावतात असे मनापासून म्हणावेसे वाटते. कामानिमित्ताने झालेली चित्रकार के. बी. कुलकर्णी, जॉन फर्नांडीस, वासुदेव कामत, लेखक पटकथाकार निर्माते प्रभाकर पेंढारकर यांच्या भेटी म्हणजे मैफिलीच वाटतात. अत्यंत साधेपणा आणि आपलेपणा. अनंत सामंत, सुहास शिरवळकर आणि शुभदा गोगटे, जयश्री कुलकर्णी, अनुराधा वैद्य, वृंदा दिवाण सगळे जणू आप्त झाले होते. या सार्वांच्या सहवासाची ऊर्जाच आपल्याला पुढे काही नवीन करायला उद्युक्त करत असते.
राजेन्द्रांच्या पाठीमागे अंक चालूच राहावेत असं मनापासून वाटत होतं. कारण त्यांचं वडिलांप्रती प्रेम, अंकांप्रती निष्ठा, नव्यानेच सुरू केलेलं राजेन्द्र प्रकाशन, हे कष्ट असे मातीमोल होऊ द्यायचे नव्हते. 2012 साली राजेन्द्रांनंतर दिवाळी अंकाचं काम करताना त्यांचा सहवास मला मिळतोय, ते इथेच कुठेतरी आहेत हा भास मला सतत होत होता. आजही काम करताना ते जवळपासच आहेत असे वाटते. त्यांची ऊर्जा मला प्रेरणा देत असते. कदाचित राजेन्द्रांनाही काम करताना वडिलांकडून, शंकररावांकडून ऊर्जा मिळत असावी.
— नीलिमा कुलकर्णी
(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply