गोळ्यांमध्ये टॅबलेट हा सर्वात अधिक वापरला जाणारा औषधाचा प्रकार. औषधाची गुणकारकता टिकावी व रुग्णांच्या सोयीसाठी या गोळ्यांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रकाराप्रमाणे त्याच्या सेवन पद्धतीतही फरक आहे. १) आवरण विरहित गोळ्या (अनकोटेड कॉम्प्रेस्ड टॅबलेट्स) सर्वात जास्त पारंपरिक प्रकार. या गोळ्या पाण्याबरोबर गिळायच्या. गरज वाटल्यास त्याचे तुकडे वा चूर्ण करून घेतल्यासही चालते. २) आवरणाच्छादित गोळ्यांवर (कोटेड टॅबलेट्स) विशेष प्रकारचे आवरण दिलेले असते. कधी साखरेचे आवरण (शुगर कोटेड), कधी पॉलिमरचे (फिल्म कोटेड) आवरण असते.
गोळी जठरात न विरघळता आतड्यात जाऊन विरघळावी यासाठी विशेष प्रकारचे ‘एन्टोरिक कोटिंग’ असते. या गोळ्या घेताना त्याचे आवरण अभेद्य ठेवणे महत्त्वाचे असते. या गोळ्या तुकडे- चूर्ण करून न घेता पूर्ण अख्खी गोळी पाण्याबरोबर गिळावी. एन्टोरिक कोटेड गोळ्या जेवणाच्या अगोदर १ तास अथवा जेवल्यानंतर दोन तासांनी घ्याव्यात. ३) दीर्घकाळ परिणाम करणाऱ्या गोळ्या (सस्टेण्ड | रिलीज टॅबलेट्स) रुग्णाला दिवसात वारंवार गोळी घ्यायला लागू नये व एकदाच घेऊन औषध त्यातून दीर्घकाल झिरपत राहावे यासाठी या गोळ्या बनवलेल्या असतात. गोळ्या घेताना पाण्याबरोबर गिळाव्या व तुकडे, चूर्ण करू नये. ४) चघळायच्या गोळ्या प्रथम पूर्ण चघळून मगच पाण्याबरोबर गिळायच्या असतात. डायजिन, जेल्युसिल, व्हिटॅमीन ‘सी’ च्या काही गोळ्या या प्रकारात मोडतात. अलबेंडाझोल हे जंतावरील औषधही असे मिळते. ते चघळण्यापेक्षा चावून पाण्याबरोबर गिळणे अपेक्षित आहे. ५) विरघळणाऱ्या गोळ्या थोड्या पाण्यामध्ये लगेच विरघळतात. गोळी पूर्णपणे विरघळल्यावर ते द्रावण सेवन करायचे. म्हणजे पूर्ण डोस पोटात जातो. डिस्परिन, लहान मुलांसाठीच्या काही अॅण्टिबायोटिक गोळ्या या प्रकारात मोडतात. ६) तोंडात विरघळणाऱ्या गोळ्या (माऊथ डिसॉल्विंग टॅबलेट्स) जिभेवर ठेवल्यावर काही सेकंदातच विरघळतात. पाणी पिण्याची गरज नसते.
उलटी थांबविणाऱ्या काही गोळ्या सध्या या प्रकारात मिळतात. ७) जिभेखाली ठेवायच्या गोळ्या (सबलिंग्युअल टॅबलेट्स) हार्टअॅटॅकवर उपचार करणाऱ्या या प्रकारात असतात. या गोळ्या जिभेखाली, गालाच्या, ओठांच्या आतल्या बाजूला ठेवायच्या. तिथून हे औषध पोटात न जाताच रक्तात शोषले जाते व त्वरित (काही मिनिटांतच) गुण येतो. गोळी तोंडात ठेवल्यावर येणारी लाळ न थुंकता गिळावी. या गोळ्यांचे तुकडे वा चूर्ण करू नये. सोबत पाणीही पिऊ नये. वरील गोळ्यांचे प्रकार हे मुख्यतः प्रचलित आहेत म्हणून चर्चिले आहेत. टॅबलेट कोणत्या प्रकारची आहे हे लेबलवर नमूद केलेले असते. ग्राहकांनी ते बारकाईने वाचावे. आपल्या डॉक्टर/ फार्मासिस्टला प्रत्येक गोळीच्या पद्धतीविषयी विचारावे.
डॉ. मंजिरी घरत
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply