गोरं करणाऱ्या क्रीम आणि गोरं करणाऱ्या साबणांचा खप फार मोठ्या प्रमाणात होतो. त्वचेला रंग कशामुळे येतो? आपल्या त्वचेमधील मेलेनॉसाइट पेंशींमधून स्त्रवणाऱ्या मेलॅनिन या रंगद्रव्यामुळे त्वचेला रंग प्राप्त होतो. खरं तर याच मेलॅनिनमुळे आपल्या त्वचेला अतिनील किरणांपासून सुरक्षा मिळते म्हणूनच शास्त्रीयदृष्ट्या सावळी त्वचा असणं ही एक निसर्गाने आपल्याला दिलेली भेट आहे.
ज्या लोकांमध्ये मेलॅनिन कमी प्रमाणात तयार होते त्यांच्या त्वचेचा रंग गोरा असतो. प्राणी पेशींमध्ये टायरोसिन नावाच्या विकरामुळे मेलॅनिन (रंगद्रव्य) तयार होण्याचं प्रमाण ठरतं.
टायरोसिनप्रतिबंधक रसायनांमुळे मेलॅनिन (रंगद्रव्य) तयार होण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्वचा उजळते.
गोरं करणाऱ्या साबणांमध्ये मेलॅनिन (रंगद्रव्य) कमी करणाऱ्या विविध रसायनांचा वापर केला जातो. यासाठी हायड्रोक्विनोन, कोजीक आम्ल, हायड्रोजन पेरॉक्साईड, ग्लुटॅथायोन, अल्फा हायड्रॉक्सी आम्ल जसे लॅक्टिक आम्ल, सायट्रिक आम्ल आणि ग्लायकॉलिक आम्ल, अॅसकॉर्बिक आम्ल म्हणजेच जीवनसत्त्व ‘क’, अल्फा टोकोफिरॉल (जीवनसत्त्व ‘ई’), अल्फा लिपॉइक निआसिनामाईड ही रसायने साबणांमध्ये वापरली जातात.
भारतात पूर्वीपासूनच गोरं होण्यासाठी केशर, हळद, दही, बेसन, चंदन, लिंबू आणि मध अशा अनेक पदार्थांचा वापर होत. आहे. दह्यामधील लॅक्टिक आम्ल, लिंबूमधील जीवनसत्व ‘क’ ही रसायने मेलॅनिनचं प्रमाण कमी करून त्वचा उजळण्यास मदत करतात. केशरातील क्रॉसिन नावाच्या रसायनामुळे त्वचा उजळते. हायड्रोजन पेरॉक्साइड, मध आणि लिंबू यांच्या वापराने त्वचा ब्लीच (विरंजन ) होऊन उजळते. पण हा परिणाम तात्पुरता म्हणजे काही काळापुरताच असतो. मधामध्ये शर्करेबरोबरच ग्लुटॉनिक, लॅक्टिक, ब्युटेरिक अशी अनेक आम्लं असतात त्यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते. काही रसायनांचा वापर एकत्रित केला जातो, जसं लिंबू आणि मध. काही फळांच्या रसांचा किंवा लगद्याचा वापर त्वचा उजळण्यासाठी केला जातो. या फळात असणारी रसायनं त्वचा उजळवतात.
-अनघा वक्टे (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply