एखादी इमारत बांधायला घ्यायची म्हणजे बऱ्याच जणांची मदत लागते.जसे,तयार इमारतीची विविध दालने कुठे, कशी असावीत हे आर्किटेक्ट ठरवतात. त्यांच्या नकाशाला आर्किटेक्चरल फ्लॅन आणतात.आर्किटेक्चरच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्या इमारतीचा एक सांगाडा तयार करावा लागतो. त्याला बरेच खांब (कॉलम्स) आणि तुळया (बीम्स) असतात. संपूर्ण इमारत या खांब आणि तुळयांनी पेललेली असते.
इमारतीचे बांधकाम करण्यापूर्वी लोखंडी सळयांचा एक पिंजरा तयार करावा लागतो. मग त्यात काँक्रिट ओतून ते पक्के करतात. खांब आणि तुळयांच्या मजबुतीवर इमारतीचे आयुष्य अवलंबून असते. शरीरात हाडांचा सापळा जितका महत्वाचा तसाच हा खांब आणि तुळयांचा पिंजरा इमारतीसाठी महत्वाचा असतो. एखाद्या इमारतीला किती खांब -असावेत, त्याचा आकार किती ठेवावा, त्यातील लोखंडी सळयांची (पिंजरा) रचना कशी असावी हे सगळे अतिशय महत्वाचे पण फारच किचकट काम करतो तो स्ट्रक्चरल इंजिनिअर. हा मुळात सिव्हिल इंजिनिअर असतोच पण त्याने पुढे जाऊन स्ट्रक्चरचा विशेष अभ्यास केलेला असतो. इमारत बांधकामात त्याला खूप महत्व असते कारण इमारतींच्या हाडांचा सापळा तो तयार करुन देतो.सर्व खांब,तुळया यांचे आकार, रचना तो ठरवतो. शिवाय खांब कुठे कुठे टाकावेत हे ही तो ठरवतो. त्यामुळे इमारतीची मजबुती वाढते. जसे मोठ्या आकाराच्या खांबांची जरुरी नाही तसे लहान आकाराचे खांबही उपयोगाचे नाहीत. त्याने इमारत कमकुवत होण्याची शक्यता असते. खांब आणि तुळयांचे योग्य आकार ठरवण्यासाठी वेगवेगळया बाबींचा लागतो.
उदाहरणार्थ इमारतीची एकूण उंची,त्यावरील एकूण वजन, हवामान, भूकंप इत्यादी. हेच ते स्ट्रक्चरल डिझाईन. योग्य डिझाईनला फार महत्व असते. सुंदर दिसण्यासाठी मूळ प्रकृती निरोगी असावी लागते. मगच वरुन केलेला मेकअप उठून दिसतो.तसेच बाहेरुन खूप सजावट केलेल्या इमारतीची संरचना (डिझाईन) जर कमकुवत असेल तर इमारतीचे आयुष्य धोक्यात येते.
Leave a Reply