नवीन लेखन...

कोणते देव ? कोणते संत ? ‘बाबा’गिरी कायद्याने बंद करा!

‘बाबा’ राम रहिमला वीस वर्षांची सजा ठोठावली हे ठीक झाले, पण आतापर्यंत ज्या राजकीय पक्षांनी अशा बाबांचा पाठिंबा घेऊन मते मिळविली त्यांच्या नैतिकतेचे काय? पैसा व संपत्ती हेच धर्म आणि अध्यात्माचे अधिष्ठान होत आहे. संत कोण व देव कोण याच्या व्याख्या ठरवा नाहीतर सर्वच धर्मांतील बाबागिरीवर कायद्याने बंदी घाला…!

संत आणि देवांच्या व्याख्या बदलाव्यात असे सध्याचे वातावरण आहे. चांगली माणसे कमी व संत आणि देवांचा आकडा जास्त अशी आपल्या समाजाची स्थिती आहे. संत आणि तथाकथित भगवंतांना लाखो आणि कोटी कोटी भक्त सहज मिळतात; पण गरिबी, अज्ञान, अंधश्रद्धेच्या गर्तेत रुतलेल्या समाजाचे हाल काही संपत नाहीत. हरयाणातील एक ‘बाबा’ राम रहिम यास जगभरात पाच कोटी अनुयायी आहेत. हे पाच कोटी लोक राम रहिम यास देव मानतात. त्याच्यात देवाचा अंश आहे व हा देव कोणत्याही संकटातून मार्ग काढू शकतो, या भ्रमातून त्याचे भक्त आता तरी बाहेर पडले असतील. बलात्काराच्या दोन आरोपांखाली राम रहिमला दोषी ठरवले तेव्हा तो मनाने कोसळला, हात जोडून दयेची भीक मागू लागला.

जो कायदा तो कालपर्यंत जुमानत नव्हता त्या कायद्यापुढे याचक म्हणून हात जोडून उभा होता. बाबा कायद्यापुढे दयेची भीक मागत होता तेव्हा बाहेर त्याचे लाखो अनुयायी हिंसाचार व जाळपोळ करीत सुटले होते. त्या हिंसाचारात ३५ लोकांना प्राण गमवावे लागले. भक्तांचा हा उन्माद कशासाठी तर आपल्या देवाची ताकद दाखविण्यासाठी त्यांना हिंसा करावी लागते. याच बाबाला २० वर्षांची सजा ठोठावली तेव्हा त्याच्यातून ‘देवाचे भूत’ उतरले. तो एक सामान्य माणूस म्हणून जमिनीवर गडबडा लोळू लागला व दयेची भीक मागणा-या त्या ‘देवा’स फरफटत तुरुंगात न्यावे लागले.

कायदा एकच….!
मुसलमान समाज समान नागरी कायद्यास विरोध करतो, पण हिंदूंची श्रद्धास्थाने व देव, संतही कायद्याच्या कचाटय़ातून सुटत नाहीत. तामीळनाडूच्या मुख्यमंत्री असताना जयललिता यांनी कांची पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनाच खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले तेव्हा आमच्या शंकराचार्यांनाही डोळ्यांत अश्रू व हात जोडून दयेची भीक मागताना पाहिले. जयललितांच्या पायावर डोके ठेवण्यासाठी शंकराचार्य तयार होते. ‘संत’ म्हणून लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले आसाराम बापूही बलात्काराचे आरोपी म्हणून तुरुंगात गेले व आजही तुरुंगातच आहेत. देव आणि संत म्हणवून घेणाऱ्यांचे पायही मातीचेच आहेत. भक्तांच्या हाती शस्त्र देऊन ते स्वतःभोवती कवचकुंडले तयार करतात. श्रद्धेच्या आड संपत्ती व शोषणाचे प्रकार घडतात व एखादी अबला त्याविरोधात एकाकी लढा उभा करते व संत, देवांचा पराभव करते.

पाठिंबा हवा…
आसाराम बापूंपासून बाबा राम रहिमपर्यंत सगळेच संत व देव हे राजकारण्यांचे आश्रयदाते. आसाराम बापू व नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे व व्हिडीओ अनेकदा प्रसिद्ध झाले. राम रहिम बाबाने तर भारतीय जनता पक्षाला सरळ पाठिंबा दिला व पाठिंबा दिला तेव्हाही राम रहिम महाशयांवर खून, बलात्काराचे आरोप होतेच. दीडशे गाड्यांत शेकडो सशस्त्र अंगरक्षक घेऊन राम रहिम ‘हडकंप’ माजवीत फिरत होताच, पण अशा व्यक्तीचा पाठिंबा घेण्यापेक्षा पराभव पत्करू असे ठणकावण्याची नैतिकता कुणातही नाही. जामा मशिदीच्या इमामाचा पाठिंबा काँग्रेसवाले घेतात हे जितके चूक तितकेच धर्माच्या नावावर ठेकेदारी करणाऱ्या इतर धर्मीय गुरूंचा पाठिंबा घेणेही चूक.

मीरा-भाईंदरचा एक जैन मुनी सरळ सरळ भाजपचा प्रचार करतो, मांसाहार करणाऱ्यांना शिव्या देतो व त्यांच्या पाठिंब्याने धर्माची मते मिळवून एक राजकीय पक्ष विजयी जल्लोष करतो हे योग्यच नाही. त्याच धर्माचा दुसरा एक मुनी जैन लोकांकडे सर्वाधिक पैसा व संपत्ती असल्याच्या जोरावर हवे ते करू व हवे त्याला विकत घेण्याची भाषा गुजरातमध्ये बसून करतो. यात धर्म व समाजसेवेची भावना आली कुठून..? पैसा व संपत्ती तर पोप, इमाम व अल कायदावाल्यांकडेही आहे व आपण समाजसेवा करतोय असे त्यांनाही वाटते. हाजी मस्तान हादेखील समाजसेवक होता व माटुंग्याचा वरदराजन हा त्यांच्या तामीळ समाजाचा ‘नायक’ होता व गरीबांसाठी तो अन्नछत्रच चालवीत होता, म्हणून तो देव किंवा संत ठरत नाही.

इस्लामचे काय…?
हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, पारशी, जैनांचे मिळून कोट्यवधी देव असतानाही समाजात इतके दैन्य व असुरक्षितता का आहे? ‘इस्लाम’ इतका भक्कम व शक्तिमान असताना पाकिस्तान, अफगाणिस्तान, सीरिया, इराक, लिबियासारखी राष्ट्रे धुळीस मिळाली. तिथे धर्म व अल्लाच्या नावावर रक्तपात सुरूच आहे व ‘इसिस’चे लोक इस्लामचा जय करीत महिलांवर अत्याचार आणि बलात्कार करतात तेव्हा अल्लाही त्या अबलांचे रक्षण करू शकत नाही. कश्मीर खोऱ्यात रोजच युद्ध सुरू आहे व राष्ट्राच्या रक्षणासाठी शेवटी तरुण सैनिकांनाच मरण पत्करावे लागत आहे. देवांच्या रक्षणासाठीही आज अनेक ठिकाणी सैन्य कसे उभे आहे ते अयोध्येत पोहोचल्यावर दिसते.

गाडगे महाराज :
धर्म, अध्यात्माच्या नावावर सुरू असलेली ठेकेदारी माणसाचे मन अस्थिर करीत आहे. मांसाहाराविरोधात जैन मुनी बोलतात व भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करतात. संपूर्ण भारतीय जनता पक्ष अद्यापि संपूर्ण शाकाहारी झाल्याचे दिसत नाही. ‘‘शिवसेनेला मत म्हणजे मांसाहाराला मत,’’ असे बोलणारे उद्या अहिंसेच्या नावाखाली ‘‘कश्मीरही पाकिस्तानला द्या,’’ असे सांगायला कमी करणार नाहीत. देवापुढे बोकड व कोंबडे कापण्याच्या विरोधात महाराष्ट्राच्या संत गाडगेबाबांनी जागृती केली. त्यांचा लढा अंधश्रद्धेविरुद्ध होता. आजच्याप्रमाणे जैन मुनींचे राजकारण तेव्हा पेटले नव्हते. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले तेव्हा लोकांच्या मदतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्तेच पुढे आले. देवांच्या नावावरचे हे कार्यच शेवटी महत्त्वाचे ठरते. बाकी ‘राम रहिम’सारख्यांची बाबागिरी झूठ असते. सर्वच धर्मांतील अशा ‘बाबागिरी’वर कायद्यानेच बंदी यावी.

सुप्रसिद्ध लेखक श्री. अनिल अवचट यांचं ‘मांत्रिक’ हे पुस्तक सर्वांनी जरूर वाचावं. बुवांचं आणि त्यांच्या नादाला लागलेल्या भक्तांचं मानसशास्त्र अवचटांनी अतिशय उत्तम प्रकारे उलगडून दाखवलंय. यातला पुण्यात काही वर्षांपूर्वी होऊन गेलेला वाघमारे बाबा तर स्त्रीयांनी खरंच लक्षात ठेवण्यासारखा. सर्व समस्यांवर उपाय म्हणून ‘योनीपुजा’ करायला सांगणाऱ्या या बाबाच्या नादाला अगदी डाॅक्टर, इंजिनिअर, प्राध्यापिका असलेल्या उच्चविद्या विभुषित बायका लागलेल्या होत्या. जमलेल्या सर्व बायकांना नग्न करून वर्तुळात बसवून तो एखादीची योनीपुजा करायचा आणि मग सर्वांसमक्ष तिचा भोग घ्यायचा. सासुचा भोग सुनेसमोर, आईसमोर मुलीचा भोग आणि हे सर्व दैवी उपायाच्या नांवाखाली. या बायकां घरी ‘उपाशी’ असतात हे वर याचं पकडलं गेल्यानंतरचं समर्थन.

स्त्रीयांचा भोग प्रत्येक साधू म्हणवणारा भोंदू याच पद्धतीने घेत असतो. काही प्रमाणात वाघमारेबाबाचं वरील समर्थन या ठिकाणी खरं असतं, असं मलाही वाटतं आणि याला समाजशास्त्रीय कारणं आहेत, त्यावर मी पुढे केंव्हातरी स्वतंत्र लेखन करेनव. पण बऱ्याच ठिकाणी प्रथम उपाय म्हणून, नंतर थ्रील म्हणून व नंतर नाईलाज म्हणून बायकांचा हा ‘भोग’ चालू राहातो आणि जेंव्हा अति होतं तेंव्हा सारं उघडकीस येतं. राम रहीम बाबाने फक्त दोनच साध्वींवर बलात्कार केले असं म्हणनं म्हणजे आपलीच फसवणूक करून घेतल्यासारखं आहे. दोन जणी अति झाल्याने पुढे आल्या तर आणखी अगणीत बायका-मुलींना अनेक कारणांमुळे गप्प राहायला भाग पाडलं जाऊ असलं शकेल.

स्त्रीला ‘भिक्षा’ म्हणून किंवा ‘चढावा’ म्हणून ‘डावा’वर लावायची आपली परंपरा पांडवांइतकी जुनी आहे आणि पुढेही चालूच राहाणार आहे. राम रहीम पहिला नाही आणि शेवटचा तर नाहीच नाही. आणखी काही बाबा, बापू, माॅं हे स्वत:ला परमेश्वराचा अवतार म्हणून हे सारे खेळ या क्षणालाही करत असावेत असं म्हटलं तर खोटं ठरू नये. जोपर्यंत बाबांना राजाश्रय आहे आणि लोक देवापेक्षा उपायांच्या शोधात आहेत, तो पर्यंत आपल्या समाजात असंच चालू राहाणार.

आपल्या लाडक्या बाप्पाला एकच साकडे घालतो की माझा भारत देश या भोंदू बाबा-महाराज यापासून मुक्त होवो, देवांपेक्षा चांगल्या माणसांचे राज्य येवो..! बाबा, महाराजांचा, मुनींचा पाठिंबा घेऊन मते मिळविणारे कोणीही असोत, राम रहिम व बाबा, मुनींच्या पापांचे ते वाटेकरीच ठरतात…!!
तूर्तास, ” शहाणपण देगा देवा..!”

— गणेश कदम,
कुडाळ सिंधूदुर्ग

साभार- श्री. नितीन साळुंखे सर..

Avatar
About गणेश कदम 48 Articles
पुणे येथे वास्तव्य असलेले गणेश कदम हे विविध विषयांवर समाजमाध्यमांतून लिहित असतात. ते टेक महिंद्र या कंपनीत वरिष्ठ सल्लागार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..