नवीन लेखन...

अस्वच्छतेला जबाबदार कोण?

एका लग्नसमारंभात लग्न लागल्यानंतर पेढे वाटले. हॉलमध्ये असलेल्या जवळजवळ सर्वच जणांनी पेढ्यावरील प्लास्टिकची पिशवी हॉलमध्ये इतस्ततः टाकून दिली. पाचवीतल्या इशाननी मला येऊन विचारले, “काका, ही पिशवी कुठे टाकू”? ह्याला संस्कार म्हणतात.

शासन कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सज्ज आहे पण कचरा एकत्रितपणे ठेवण्याची जबाबदारी मात्र नक्कीच नागरिकांची आहे. सरकार कुठे पुरे पाडणार? शाळेत मुलाला स्कूटरने सोडायला जातांना वडीलच पचकन रस्त्यात थुंकतात मग मुलगाही तेच अनुकरण करणार. आपण पृथ्वीला धरणीमाता म्हणतो, मग तिच्यावर थुंकायचं धाडस तरी कसं होतं? रस्त्यानं चालतांना कोणी गरम गरम शेंगदाणे खातो. मात्र खाऊन झाल्यावर तो कागद फेकण्यासाठी कचराकुंडी मिळेपर्यंत धीर नसतो? सरकारने जागोजागी कचरा टाकण्यासाठी डब्बे ठेवले आहेत. पण त्याठिकाणी चालत चार पावलं जायला आपल्याला कष्ट पडतात? ज्याला एवढंही चालायची शक्ती नसेल त्याने चक्क कचराकुंडीच्या बाजूला उभे राहून तोंड चालवावं नाहीतर खाण्याचा मोह टाळावा.

औरंगाबाद रेल्वे स्थानकावर माझ्या डोळ्यादेखत घडलेला प्रसंग. एक कुटुंब आपल्या ३-४ मुलांसह गाडीची वाट पहात उभे होते. ते सर्वमिळून कसलेतरी चॉकलेट्स खात होते. इंचभर आकाराच्या प्रत्येक चॉकलेटवर कागदी आवरण होते आणि अशा १० – १२ चॉकलेट्सचे ते पॅकिंग होते. प्रत्येकजण चॉकलेट खाऊन कागद खाली टाकत होता. तेवढ्यात प्लॅटफॉर्म झाडणारी बाई आली आणि सर्व कागद घेऊन गेली. तरीदेखील त्या चॉकलेट खाणाऱ्यांचं कागद फेकण्याचे सत्र सुरूच राहिलं.

सरकारने स्वच्छता करण्यासाठी कामगार ठेवले आहेत, ते आपल्यापरीने कामही करतात. पण कचरा करणाऱ्यांची संख्या आणि स्वच्छता करणाऱ्यांची संख्या यांचा ताळमेळ कसा बसणार? स्वच्छता राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

पुण्यात एका नवीन वसाहतीमध्ये रस्त्यांची सुंदर आखणी केली होती, बाजूला सुशोभित करण्यासाठी फुलझाडे लावली होती, पावसाळा असल्याने सभोवतालचे गवतही त्यात हिरवळीची जोड देत परिसर अधिकच सुशोभित करीत होतं. रहिवाशांच्या सोयीसाठी बँकांनी त्याठिकाणी ATM लावले होते. त्या ATM च्या बाहेर पैसे काढल्यानंतर मशीनमधून येणाऱ्या दीड दोन इंचाच्या स्लिप्सचा बाहेर खच पडला होता. वास्तविक आतमध्ये ह्या स्लिप्स टाकण्यासाठी डबा ठेवलेला असतो. ATM मशीनमधून मिळालेल्या नोटांचं ओझं आपण खिशात घेऊन जातो मग एवढीशी स्लिप जर खिशात ठेवली तर त्याचं कितीसं ओझं होणार? डब्यात टाकायची नसेल तर खिशात ठेवावी, कचऱ्याचा डबा दिसेल त्याठिकाणी टाकावी. ह्या प्रवृत्तीवर शासन तरी काय करणार?

गणपतीपुळ्याला स्थानिक रहिवाशांपेक्षा पर्यटक किंवा भक्तमंडळी अधिक जातात. बाहेरचे पाणी पिऊन पोट बिघडेल अशा भीतीपोटी सर्वजण बाटलीबंद पाणी विकत घेतात. पिऊन झाल्यावर बाटल्या रस्त्यात भिरकावून देतात. वास्तविक भरलेली बाटली किती वजनदार असते? त्यात पाणी असेपर्यंत आपण अगदी सांभाळून ते ओझं बाळगतो. पण रिकामी झाल्याक्षणी भुर्र . . . !

बिस्किटाचा पुडा, चॉकलेट्सचं रॅपर, वेफर्सची पिशवी, एवढंच काय तर अगदी बसचं तिकीट ह्या गोष्टींचं मुळीच ओझं होत नही. त्यामुळे योग्य जागा दिसेपर्यंत ह्या गोष्टी जवळ बाळगणं फारच सोपं आहे. स्वच्छता सर्वांनाच आवडते पण ती राखण्यासाठी आपणहून काही प्रयत्न करण्याची मानसिकता का नाही? आपण कितीही घाण करावी आणि त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी मात्र सरकारची? हा कोणता न्याय? उद्या आपल्याला अंघोळ घालण्यासाठी, दात घासून देण्यासाठी, नाक शिंकरून देण्यासाठी, दाढी करण्यासाठी पण सरकारनेच कर्मचारी नेमावेत का?

ज्यांच्या अंगी स्वतःला आणि स्वतःच्या आसपासच्या परिसराला स्वच्छ ठेवण्याची क्षमता नाही त्यांनी घालवावं अख्खं आयुष्य सरकारला दोष देण्यात आणि मरावंही अशाच अस्वच्छ परिसरात.

आपल्याला कोणी काही भेटवस्तू दिली तर त्यावर चकचकीत किंवा रंगीत कागद गुंडाळलेला असतो. काही लोकांना हा कागद चांगली घडी करून ठेवण्याची आणि परत कधी लागला तर वापरण्याची सवय असते. हाच कागद चुरगळून फेकला तर कचरा होतो आणि चांगली घडी करून ठेवला तर कचरा होत नाही. किती सोपं आहे हे काम.

गेल्या ५ वर्षांपासून मी स्वतः एक अभिनव उपक्रम चालू केला आहे. मी कागदाचा एक टिचभर तुकडाही रस्त्यात इतस्ततः टाकत नाही आणि तुम्हीही टाकू नका. हा संदेश फक्त दोन जणांना सांगायचा (अर्थात स्वतःही पाळायचा) आणि त्यांना हा जसाच्या तसा पासऑन करायला सांगायचा. गणिताची किमया अशी आहे की एकाचे दोन, दोनाचे चार, चाराचे आठ, पुढे सोळा, बत्तीस, चौसष्ट ह्या पद्धतीने दुप्पट होत होत ही संख्या ३० दिवसात किती होते माहिती आहे? त्रेपन्नकोटी अडुसष्टलाख सत्तरहजार नऊशेबारा. ही जवळजवळ भारताची निम्मी लोकसंख्या झाली. आपल्याला नक्कीच कोणीतरी दोन व्यक्ती रोज भेटतात. अगदी पोस्टमन असेल, बसचा कंडक्टर असेल किंवा भाजीवाला. “केल्याने होत आहेरे, आधी केलेचि पाहिजे”. सरकारला दोष देत आपल्या तोंडाची वाफ दवडण्यापेक्षा हे कितीतरी सोपं आहे.

कल करे सो आज, आज करे सो अभी और अभी करे सो इसी वक्त.

 

— डॉ. संतोष जळूकर
३/४४, माधवी सोसायटी,
मोगल लेन, माहीम,
मुंबई ४०० ०१६

Avatar
About डॉ. संतोष जळूकर 34 Articles
डॉ. संतोष जळूकर हे आयुर्वेदिक डॉक्टर असून ते आयुर्वेदिक औषधनिर्मितीच्या व्यवसायात आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..