नवीन लेखन...

परफेक्ट बॉस कोण ?

हल्ली स्त्री-पुरूष असा भेदभाव पूर्वीएवढा तीव्र राहिला नाही. त्यामुळे ऑफिसेसमध्ये स्त्रिया सर्रास बॉस म्हणून दिसू लागल्या आहेत. पण अजूनही एकीकडे पुरुषांना ‘स्त्री बॉस’ चालत नाही असा अनुभव अनेक ठिकाणी येतो, तर दुसरीकडे स्त्रियाही अधिकारांचा गैरवापर करताना दिसतात. शेवटी स्त्री असो किंवा पुरुष ‘बॉस’च्या खुर्चीवर बसल्यावर तिथे फक्त मानवी मनाचाच विजय होत असतो.

बॉस आणि कामगार हे अनेक नाजूक नात्यांपैकी एक नातं. घरातल्या नात्यांइतकंच अपरिहार्य. कारण आजकाल घरची दोन माणसं तरी कुठे ना कुठे नोकरी करतात. ऑफिसमधलं वातावरण, तिथले ताण-तणाव यावर ठिकठिकाणी चर्चा होत असते. या चर्चेचा केंद्रबिंदू नेहमी ‘बॉस’ हाच असतो. कधी कुणाविषयी तक’ार तर कधी एखाद्याचे अंदाज कसे खरे ठरतात यावरील टिप्पणी असते. आजच्या परिस्थितीचा नीट विचार केला तर ‘बॉस’ या संकल्पनेत स्त्रियांचा सहभागही वाढला आहे. शिक्षणाच्या संधी आणि अंगभूत गुणवत्तेच्या आधारावर स्त्रियांनी नोकरी-व्यवसायात चांगली चमक दाखवली आहे. आज अनेक उच्चपदांवर स्त्रिया काम करत आहेत.

खरं तर एखाद्या ठिकाणी स्त्री बॉस असली तर त्यात एवढं मोठं काय? असा प्रश्न काही जणांना पडेल. पण त्यांची संख्या केवळ 20 टक्के असेल, बाकी 80 टक्के वर्गाला हा बदल फारसा रुचत नाही. त्यातही पुरुषांची संख्या अधिक ! कारण स्त्रियांवर हक्क गाजवणं ही कल्पना मनाला चिकटलेली असते. आता त्यांच्या हाताखाली काम करायचं म्हणजे… पण अपरिहार्यतेच्या दृष्टिकोनातून त्याला ‘अंजाम’ दिला जातो. अगदी परवाच ऐकलेली घटना. पुण्या-मुंबईची सीमा ओलांडून निमशहरी भागात ‘ऑफिसर’ म्हणून काम करण्याची वेळ कल्पनावर प्रथमच आली. बँकेच्या शाखा विस्तारल्याने तिला बढतीही मिळाली होती. तिने नव्या उत्साहाने काम करायला सुरुवात केली. घरापासून लांब राहायचं दु:ख बाजूला सारून कामात लक्ष घातलं. पण तिला वेगळाच अनुभव आला. नव्या ऑफिसरचं स्वागत सोडाच पण तिच्या कामाच्या पहिल्या दिवशी निम्मा स्टाफ गैरहजर होता. तिने मस्टरवर नजर फिरवली तर एकूण कर्मचार्‍यांपैकी बरेचसे पुरुष कर्मचारी असल्याचे लक्षात आले. सुरुवातीलाच वाद नको म्हणूनही ती गप्प बसली. पण, कामातही तिला सहकार्य मिळेना. ‘तुम्हाला इथली माहिती नाही. इथे कामं अशीच होतात’ या सुरातली उर्मट उत्तरं तिला ऐकवली जाऊ लागली. ‘डिपॉझिट’ सेक्शनच्या कदमबाईंकडून तिला रिपोर्ट कळला की एका बाईने सूचना देणं तिथल्या पुरुषवर्गाला पसंत नाही. अनेकांच्या मनात आपली सेवाज्येष्ठता डावलून तिला दिल्या गेलेल्या कामाबद्दल आकस होता. त्यामुळे कल्पनाला तिथे काम करणंच शक्य होईना. शेवटी सहा महिने संपल्यावर तिने पुन्हा बदली मागून घेतली.

कधी तरी महिला बॉसकडून इतरांना चांगली वागणूक न मिळण्याची शक्यता असते. बरं त्याबद्दल बाहेर बोलायची चोरी. मोठ्या पदावर काम करणार्‍या व्यक्तीमध्ये स्वत:च्या अधिकारपदाची थोडी आढ्यता असतेच. इथे स्त्री असेल तर त्याला अहंपणाची धार अधिक येवू शकते. हे केवळ पुरुष कर्मचार्‍यांच्या बाबतीच घडतं असं नाही तर कधी महिलांनी चालवलेल्या संस्थांमध्येही त्याचा प्रत्यय येतो. तिथे आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. स्त्री स्वभावाला पूरक अशी चढाओढीची आणि वर्चस्वाची भाषा वापरणं हे तर अगदी सहजपणे घडून येतं. दोन स्त्रिया एकत्र आल्या की पूर्वी माहेरचे गुण गायची स्पर्धा लागायची तशी आता विविध कार्यालयात अधिकार गाजवण्याची स्पर्धा लागते. आपल्या बाजूची ‘लॉबी’ तयार करण्यासाठी धडपड होताना दिसते. अर्थात हे काही स्त्रियांच्याच बाबतीत होतं असं नाही. पण, स्त्रियांना आर्थिक स्थर्य लाभावं म्हणून ज्या संस्था काढल्या गेल्या तिथे त्यांचच राज्य असल्याने इथेही ‘राजकारण’ अटळ असतं.

महिला सहकार्‍याबद्दलच्या भावना कशा असतील यावर आजवर अनेकदा चर्चा झाल्या आहेत. अजूनही महिलांना समान अधिकार देण्याकडे पुरुषांचा कल नसतो. अर्थात नव्या पिढीमध्ये ही बंधनं गळून पडू लागली आहेत. जिथे सहकार्याशिवाय गत्यंतर नसतं तिथे कोणालाच अशा चौकटीत राहून काम करता येत नाही. आता पुरुषांना स्त्री बॉसकडून कशी वागणूक मिळते यावरही चर्चा-संशोधन होऊ लागलं आहे. त्यातून पुरुषांच्याही काही बोलून न दाखवता येण्याजोग्या समस्या आहेत यांचा विचार होत आहे. अधिकारपदावरील स्त्रीकडून पुरुष सहकार्‍यांनाही ‘सेक्शुअल हॅरॅसमेंट’ होते हे आता बाहेर येऊ लागलं आहे. त्यामुळे अशा समस्यांना कसं तोंड द्यायचं यावरही आता पुरुष मंडळात चर्चा होतात. पूर्वी बॉस आणि सेक्रेटरीच्या संबंधांकडे चांगल्या चष्म्यातून पाहिलं जायचं नाही. आता ही वेळ पुरुषांवरही येऊ शकते हे कळून आल्याने बॉस मग तो पुरुष असो किंवा स्त्री त्याच्याशी कितपत संबंध वाढवायचे हे प्रत्येकाने ठरवण्याची वेळ आली आहे.

स्त्रियांच्या हातात सत्ता आल्यावर कामाला अधिक शिस्त लागेल. कामं वेळेत संपतील किंवा त्यावर कल्पकतेचा साज चढेल अशी अनेक स्वप्न पाहिली गेली होती. त्यातल्या काहींचे परिणाम समोर आलेही. स्त्रियांच्या कार्यक्षमतेमुळे कामाचा दर्जा सुधारला असं दिसूनही आलं. पण कालांतराने स्त्रीही माणूसच असते. आणि पुरुषाप्रमाणे तिलाही पैशाचा मोह पडतो ही गोष्ट सिध्द झाली आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत स्त्रियाही काही कमी नाहीत. उलट पुरुषांच्या बरोबरीने त्याही अधिकाराचा गैरवापर करू शकतात. हे उघडकीला आलं आहे. स्त्रीदाक्षिण्याचा फायदा घेऊन त्यांना हे काम अधिक सुलभपणे करता येतं असंही आता बोललं जातं.

एकूण काय घरची सत्ता सांभाळतच स्त्रियांनी बाहेरही अधिकारपदे गाजवायला सुरुवात केली आहे. आणि स्त्री त्या पदावर बसली म्हणून तिच्याकडून काही वेगळ्या निकालाची अपेक्षा करण्यात तथ्य नाही, असंच म्हणावं लागेल. शेवटी स्त्री असो किंवा पुरुष ‘बॉस’च्या खुर्चीवर बसल्यावर तिथे फक्त मानवी मनाचाच विजय होत असतो.

— मधुरा कुलकर्णी
(अद्वैत फीचर्स)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..