२३ ऑगस्टला चांद्रयान ३ चं सॉफ्ट लॅंडिंग यशस्वी झालं..अमेरिका,रशिया,चीन या देशांनंतर चंद्रावर यान पाठवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला.साहजिकच भारताची जगातील प्रतिष्ठा कैकपटीने वाढली..
भारतीयांना प्रचंड आनंद होणं,अभिमान वाटणं अगदी नैसर्गिक होतं..फेसबुक,व्हॉट्सऐप,इन्स्टा,ट्विटर या समाजमाध्यमांवर भारतीयांच्या आनंदाचे अविष्कार निरनिराळ्या स्वरूपात पहायला मिळाले..यात चंद्रापेक्षाही आपल्या चांदोमामाच्या जवळ आपण पोहोचलो,हा आनंद जास्त होता..
अगदी आपल्या माननीय पंतप्रधानांच्या भाषणातही याचा उल्लेख आला..
कुणी कविता केल्या,कुणी लेख लिहिले,कुणी चित्रे काढली, कुणी पृथ्वीची राखी चांदोबाला बांधली..
कुणी आपल्या शत्रुराष्ट्रापेक्षा आपण किती महान आहोत ,हे सांगितले..
कुणी नेहरुंना श्रेय दिले तर कुणी ते खोडून काढून भाजपवरील विश्वास उद्धृत केला..
पण या सगळ्या जल्लोषात प्रत्येक भारतीय ज्या इस्रोने हे महत्कार्य यशस्वी केले त्या इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक करायला, त्यांचे आभार मानायला विसरला नाही..!!
पृथ्वीपासून एखादे स्वयंचलित यान लाखोकिलोमीटर दूर असलेल्या चंद्रावर पाठवणे,ते ठरलेल्या सेकंदाला,ठरलेल्या ठिकाणी यशस्वीपणे उतरवणे …ही केवढी मोठी कामगिरी..डोळे दिपवणारी..प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावणारी..
ही उपलब्धी साध्य झाली ती केवळ इस्रोच्या शास्त्रज्ञांमुळे!!
या शास्त्रज्ञांच्या अफाट बुद्धिमत्तेला, कष्टांना, अचूकतेच्या ध्यासाला, देशप्रेमाला तोड नाही..!!
या शास्त्रज्ञांचे पगार पाहिले तर हजारात किंवा फारतर लाखात…
यांची बुद्धिमत्ता पाहता हे लोक परदेशात गेले असते तर त्यांनी कोटीत पैसा कमावला असता..!!
अशा या भारतीय शास्त्रज्ञांबद्दलचा आदर कैकपटीने वाढला नि आदराने मान झुकली…
ज्या शास्त्रज्ञांमुळे भारताला आज जगातील पहिल्या पाच प्रगत देशात स्थान मिळालं, त्या इस्रोच्या शास्त्रज्ञांची टीम कोणती असेल, त्यातील व्यक्ती कोण व कशा असतील याची मोठी उत्सुकता मनात निर्माण झालेली असतानाच या व्यक्तींची नावे व फोटो असलेली एक पोस्ट फेसबुकवर पहाण्यात आली..
शास्त्रज्ञांची नावे वाचल्यावर एक गोष्ट लक्षात आली की हे पहिल्या फळीचे म्हणजेच टॉप आठही शास्त्रज्ञ दाक्षिणात्य आहेत..
कुणी कर्नाटकी,कुणी तामिळ, कुणी मळ्याळम् तर कुणी तेलगु…
या आठ नावांत एकही मराठी नाव नव्हते.
एवढेच काय पण बंगाली, उत्तरप्रदेशी, पंजाबी, बिहारी, काश्मिरी… कुणीच नाहीत..
मनात उत्सुकता निर्माण झाली..
“रॉकेट सायन्स ” सारख्या इतक्या उच्च तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दाक्षिणात्य सोडून इतर भारतीयांना रस नाही का? की त्यासाठी लागणारी विशिष्ट बुद्धिमत्ता, मेहनतीची तयारी अशा गोष्टी फक्त दाक्षिणात्य लोकांकडेच आहेत?
इतर प्रातांचे राहू दे पण आपली मराठी मुले इकडे मोठ्या प्रमाणावर का वळत नाहीत?
कदाचित मी शिक्षिका असल्यामुळे मला याची जास्त काळजी वाटतेय की सगळ्यांनाच असच वाटतय ,हे आजमावण्यासाठी मी एक पोस्ट माझ्या फेसबुकच्या भिंतीवर व एका तथाकथित बुद्धिमान समजल्या जाणा-या मराठी समुहावर टाकली..
ती पोस्ट अशी होती…
इस्त्रोच्या चांद्रयान ३ टीममधील शास्त्रज्ञांची नावे वाचनात आली.
१) एस.सोमनाथ
२) एस.उन्नीकृष्णन् नायर
३) पी.बिरामुथुव्हेल
४)बी.एन.रामाकृष्णन
५) एम् .शंकरन्
६) एस्.मोहनकुमार
७) डॉ.के.कल्पना
८) व्ही.नारायणन
सगळ्या व्यक्ती दाक्षिणात्यच कशा?
यात या दाक्षिणात्य शास्त्रज्ञांविषयी वाटणारा आदर,कौतुक होते…कोणतीही आसूया नव्हती..
पण आपली मराठी मुले यात नाहीत ही खंत होती… ठिकाणी निवडली जातात, उच्चपदी विराजमान होतात...
केवळ शास्त्रज्ञच नव्हे तर उच्च सरकारी अधिकारपदी हे लोक असतात, अनेक मोठ्या कंपन्यांचे सी.ई.ओ. हे लोक असतात, जगभर दाक्षिणात्य रेस्टोरंट्स या लोकांची आहेत., अनेक अध्यात्मिक गुरू
दाक्षिणात्य लोकांमधे काय विशेष आहे म्हणून ती इस्रोसारख्याही हेच लोक आहेत..
यांच्यात काय वैशिष्ट्ये असतात ?
आमची मराठी मुले कुठे कमी पडतात ?
याची उत्तरे मिळवण्यासाठी ही पोस्ट होती..काही अपवाद वगळता प्रतिक्रिया मिळाल्या त्या अशा—-
१) मग काय ? काय problem आहे? असूदेत की …
२) जाऊ द्या हो …यान पोहोचलं नं?
३) आता तुम्हाला यातही आरक्षण पाहिजे का?
४) जातीवरून झालं आता प्रांतावरून भांडणे लावता का?
५) काय बिघडलं …आपण सगळे भारतीयच आहोत नं?
आपण आपल्या मुलांच्या करीअरबद्दल, भविष्याबद्दल किती उदासीन आहोत, हे यावरून समजलं..
सतत जातीभेद नि आरक्षण वाचनात आल्याने प्रत्येक गोष्टीकडे किंवा प्रश्नाकडे पाहताना आपण त्याच चष्म्याने पाहतो , हे लक्षात आले..
६) काही लोकांनी दक्षिण धृवावर लॅंडिंग होतं म्हणून दाक्षिणात्य शास्त्रज्ञ!
७) तुम्हीच का नाही इस्रोत गेलात? म्हणत अजून आपण मराठी बांधव अत्रे किंवा पुलंच्या काळातून बाहेर यायला तयार नाही आहोत, व दुस-याची खिल्ली उडवण्यातच आपण धन्यता मानतो , याची खात्री पटवली…
७ ) काहींच्या मते दाक्षिणात्य लोक लॉबिंग करतात ,त्यामुळे इस्रोसारख्या संस्थेत त्यांची संख्या जास्त असते..
मला याचा काहीच अनुभव नाही.
८) काहींच्या मते हुशार मराठी मुले परदेशात जाणे पसंत करतात..
पण दाक्षिणात्यही मोठ्या प्रमाणात परदेशात जातातच की!
९) दाक्षिणात्यांचा भात-सांबर हा आहार , त्यांची धार्मिकता यांमुळे ते बुद्धिमान व मेहनती असतात ..
१० ) दाक्षिणात्यांची शिक्षणपद्धती त्यांना शास्त्र, गणित या विषयांकडे वळवते व त्यांच्यात ” प्युअर सायन्स” ची आवड निर्माण करते. त्यामुळे ती मुले शास्त्रज्ञ होणे पसंत करतात..
११) दाक्षिणात्यांत व्यापारी दृष्टिकोण कमी असल्याने ती नोकरीकडे मोठ्या प्रमाणावर वळतात..
मी याच्याशी तितकीशी सहमत नाही..कारण भारतभर,जगभर रेस्टॉरंट काढणारी पहिली माणसे दाक्षिणात्य होती ..
असो, प्रत्येकाची विचारसरणी, अनुभव , माहिती वेगवेगळी असते त्यामुळे मतेही वेगळी असणारच..!!
मी सगळ्या मतांचा आदर करते..
मी मिरजेसारख्या लहानशा गावात जन्मले नि वाढले. मिरज रेल्वे जंक्शन …त्यामुळे असेल किंवा कर्नाटकच्या बॉर्डरवर असल्याने असेल पण लहानशा मिरजेत ५०-६० वर्षांपूर्वी अनेक उडुपी रेस्टॉरंट्स,लॉजेस होती.. मराठी हॉटेलांच्यामानाने यांची संख्या, हॉटेलांची सजावट जास्त चांगली असे.. पुण्यासारख्या ठिकाणीही वैशाली,रुपाली वगैरेची उदाहरणे देता येतील..
मिरजेच्या रेल्वेस्टेशनवरील अधिकारी मंडळी मोठ्या प्रमाणावर दाक्षिणात्य असत..
मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमधील परिचारिका मोठ्या प्रमाणावर केरळी असत..
त्या तिथे प्रशिक्षण घेऊन नंतर नोकरीसाठी गल्फ देशांत किंवा पाश्चिमात्य देशांत जात असत.
आजही अगदी मुंबईसारख्या मोठ्या शहरातही हे दृश्य पहायला मिळते..
लग्न होऊन सोलापुरात आले ..नि आंध्राच्या बॉर्डरवर असलेल्या सोलापुरातील तेलगुंशी परीचय झाला..
अतिशय साधी राहणी, मेहनतीवृत्ती , नम्रपणा यांमुळे त्यांचं वेगळेपण जाणवू लागलं..
सोलापुरातील टेक्सटाईल व्यवसाय, इडलीगृहे ,विडी व्यवसाय यांवर त्यांचे प्राबल्य आहेच पण त्यांची मुले शिक्षणातही आघाडीवर आहेत..
मला एक किस्सा आठवतो..
सोलापुरातील सर्वात मोठ्या टेक्स्टाईल शोरूममधे पाहुण्यांबरोबर गेले होते..
मोठ्या आवारात मोठी तीन-चार दुकाने ..पॉश..चादरी,बेडशीट्स,टॉवेल , पडदे …खचाखच भरलेला माल..
खरेदीसाठी परगावहून गाड्या भरून आलेल्या गि-हाइकांनी ठासून भरलेली दुकाने…कोट्यवधीचा टर्नओव्हर..!!
माझी लेक लहान होती..
ती गर्दीत रडायला लागली..
म्हणून तिला घेऊन बाहेर आले..
दुकानाच्या बाहेर एक सत्तर-पंचाहत्तरीच्या इरकल पातळ नेसलेल्या आजीबाई जमिनीवर विड्या वळत बसल्या होत्या..
एकूण पाहता परिस्थिती बेताचीच दिसत होती.. दुकानातील कामगार असाव्यात असा अंदाज बांधत शेजारच्या बाकावर बसले..
त्यांनी बोलायला सुरुवात केली..
बोलण्याच्या ओघात समजलं की त्या त्या दुकानाच्या मालकीणबाई होत्या..
अफाट श्रीमंती असतानाही ती बाई रोज विड्या वळून त्याचे पैसे मिळवत असे.
मला त्यांच्या या मेहनती वृत्तीचं नि स्वावलंबनाचं फार आश्चर्य वाटलं!
माझ्या एका मैत्रिणीच्या सासुबाईंचीही अशीच कथा!
यजमानांचा चादरींचा मोठा कारखाना..
मुलगा डॉक्टर..मोठं हॉस्पिटल..
मुलाने फार्म हाऊस घेतलं..
या बाईंनी त्या वयातही विड्या वळून मिळवलेल्या पैशांतून एअर कंडिशनर मुलाला वास्तुशांतीला भेट म्हणून दिला!!
अनेक वर्षांपूर्वी माझ्याकडे स्कॉलरशिपच्या क्लासला एक तामिळी मुलगी येत असे..
बुद्धिमत्ता चाचणी विषयातील दोन टॉपिक्स हे जरा अवघड असतात..
त्यातील प्रश्न अनेक मुलांना जमतच नाहीत..पण ती मात्रं ते प्रश्न क्षणार्धात सोडवीत असे..कदाचित ही वेगळी बुद्धिमत्ता तिच्यात असावी..
क्लास संपल्यानंतर ती रोज घरी सोडवलेल्या प्रश्नांतील न आलेले प्रश्न तासभर थांबून विचारत असे..
कळेपर्यंत ती विचारत राही..
इतर मुले मात्रं क्लास संपल्या संपल्या धूम पळून जात..
साहजिकच ती मुलगी राज्यात पहिली आली हे सांगायलाच नको!
माझ्याकडे काम करणा-या मदतनीस मावशींमधेही कानडी नि तेलगु मदतनीस मावश्या जास्त नम्र, झोकून काम करणा-या असतात..
सोलापुरजवळच्या कर्नाटकातील एका खेडेगावातील कुटुंबात काही कारणाने जाणं झालं..
कुटुंब सधन होतं.घरचा मोठा व्यापार होता..पण घर अतिशय साधं ..माणसेही तशीच साधी फारशी न शिकलेली…जेवण झाल्यावर आमच्या हातावर घरातल्या साठीच्या कर्त्या पुरुषानं पाणी घातलं..
या घरातील एक जावई नासात शास्त्रज्ञ होता तर मुलगा इस्रोत …!!
इस्रो, नासा, टी.आय.एफ.आर . सारख्या मोठ्या संस्थांमधील संशोधक, सरकारमधील उच्च सनदी अधिकारी, मोठ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांचे सी.इ.ओ. , आय.टी.क्षेत्रातील अभियंते , इत्यादी अनेक क्षेत्रांतील दाक्षिणात्य लोकांची लक्षणीय संख्या पाहता …थोड्या काळात बेंगळुरू,हैदराबाद या दक्षिणी शहरांचा झालेला प्रचंड विकास पाहता … यांमागील कारणांचा शोध घ्यावासा वाटतो..
काय असतील यांच्या प्रगतीमागील कारणे?
परकीय आक्रमणांपासून दूर राहिलेला समृद्ध दक्षिण भारत ?
घरांत असलेलं धार्मिक वातावरण ?
धाडसीपणा ?
मातृभाषा किंवा इंग्रजी या हट्टामुळे
थोडयाशा विचित्र ढंगात पण न घाबरता सर्रास बोललं जाणारं इंग्रजी?
शिक्षणाची विशिष्ट पद्धती?
पैशाचा कमी हव्यास?
नैसर्गिक बुद्धिमत्ता?
सांबार,भात,इडली,डोसा यांसारखं साधसं अन्न ?
नम्रपणा?
कामाप्रती असलेली भक्ती?
परफेक्शनचा आग्रह?
मेहनतीपणा?
स्वकेंद्रीवृत्ती?
लॉबिंग ?
तुम्हाला काय वाटतं ?
आपली मराठी मुलं असं दैदीप्यमान यश मिळवताय का? नसतील तर त्यासाठी काय केले पाहिजे ?
-नीला महाबळ गोडबोले
सोलापूर
Leave a Reply