‘तुम्ही का लिहिता’ हा प्रश्न मला अनेकजण विचारत असतात. मलाही हा प्रश्न बऱ्याचदा पडतो. इतरांना पटो वा न पटो, पण याचं साधं सोपं उत्तर आहे. ते म्हणजे, मला लिहायला आवडतं, हे. परंतू हे एवढंच नाही. तर माझ्याकडे सांगण्यासारखं जे आहे किंवा मला जे प्रश्न पडतात, ते मला कागदावर (आता स्क्रिनवर) मांडायला (आता टायपायला) आवडतं, असा त्याचा पुढचा भाग आहे.
तसं सांगण्यासारखं तर प्रत्येकाकडे काही न काही असतं आणि ते सारखंच इंटरेस्टींग असतं. प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा पट काणत्याही चित्तथरारक कादंबरी किंवा चित्रपटापेक्षा तसूभरही कमी नसतो असं मला वाटतं. माझ्या आयुष्यात आलेले अनुभव, मी भोगलेलं किंवा उपभोगलेलं जगणं, मला माणूस म्हणून जगताना, नागरिक म्हणून वावरताना, ग्राहक म्हणून किंवा नातेसंबंधातल्या विविध भुमिका बजावताना आलेले तेवढेच विविध अनुभव मला कुणाशी तरी शेअर करावेसे वाटतात, म्हणून मी लिहितो. मी लिहू शकतो, कोणताही आडपडदा न ठेवता आणि कुणाचाही मुलाहीजा न राखता मी लिहू शकतो, बाकीचे लिहू शकत नाहीत, म्हणून मी लिहितो. हाच काय तो फरक. गंम्मत म्हणजे मी जे लिहितो, ते माझं वाचणारांशी बऱ्याच टक्क्यांनी रिलेट होत असतं, असा मला गेल्या चार-पाच वर्षांचा अनुभव आहे. याचा अर्थ एकच, व्यक्ती लहान असो की मोठी, गरीब असो की श्रीमंत, आयुष्य जगताना आणि जगण्यातल्या विविध भुमिका बजावताना येणारे अनुभव सर्वांचे सारखे, युनिव्हर्सल असतात, फरक असलाच तर फक्त तपशिलातला. उदा. कोणत्याही स्तरातल्या अथवा जगातील कोणत्याही कोपऱ्यातल्या गांवात राहाणाऱ्या नवरा-बायकोंचा एकमेंकांबद्दलचा अनुभव सारखाच असतो;किंवा आपल्या देशात सरकारी अधिकाऱ्यांचा, एक नागरिक म्हणून आपल्या कुणालाही येणारा अनुभव सारखाच असतो. हे सारं मला कुणाला तरी सांगावसं वाटतं म्हणून मी लिहितो.
वर म्हटल्याप्रमाणे, सांगण्यासारखं तर प्रत्येकाकडे काही न काही असतं आणि ते सारखंच इंटरेस्टींग असतं. माझ्यासोबत एक राजु नांवाचा मुलगा काम करायचा. दारू आणि जुगार एवढंच त्याचं आयुष्य. परंतू हे दुर्गूण म्हणावेत, तर तो टोकाचा प्रामाणिक. यालाही सारखं काहीतरी सांगायचं असायचं. परंतू एका बेवड्याचं काय ऐकायचं, म्हणून ड्रिंक्स घेणारी प्रामाणिकमाणसं त्याला टाळायची. बरं, त्याचं सांगणं म्हणजे अगदी लहानसहान गोष्टी असायच्या. जसं आज मी लावलेला आकडा लागला आणि मला पैसे मिळाले, त्या पैशांने म्हातारीला(पक्षी-आईला) एक मोबाईल दिला किंवा आज मला अमुकतमूक माणसाने मला पैसे दिले आणि त्या पैशांच्या मी माझ्या चाळीतल्या मुलांना वह्या कशा वाटल्या वागेरे वैगेरे. त्याचा आनंद त्या सांगण्यातंच असायचा, पण ऐकायला कुणी नसायचं. माझंही बऱ्याचदा असंच व्हायचं किंवा होतं. मलाही कुणालातरी काहीतरी सांगायचं असायचं, पण ऐकायला कुणाकडे वेळच नसायचा. अशा वेळी राजू दारू पिऊन रस्त्यावर बडबडायचा, तर मी लिहायचो. राजुला त्याच्या मनातलं बोलण्यासाठी दारुची धुंदी लागगायची, तर माझी लिहण्यातच तंद्री लागायची, म्हणून मी लिहायला लागलो.
इतरांचं माहित नाही, परंतु सोशल मिडियावरचं माझं लिहिणं म्हणजे माझा मी माझ्याशीच केलेला संवाद असतो. मला सतावणारे परंतू इतरांना बावळट वाटणारे प्रश्न, मला वाटत असलेली भिती, खंत, मला आलेले अनुभव माझ्यासमोरच मांडण्यासाठी मी लिहितो. मला सापडलेली उत्तरं तपासून पाहाण्यासाठीही मी लिहितो. हा आत्मसंवाद असतो. तुकोबांनी सांगीतलंय ना, “तुका म्हणे होय मनासी संवाद,
आपुलाचि वाद आपणासि..” अगदी तसंच..! ‘मनासी संवाद..’ असला म्हणजे, वेगळं कौन्सिलिंग लागत नाही, वायफळ आणि वाळुत मुतल्यासारख्य चर्चा नकोत, वाद नकोत की काही नको. माझं लिहिणं म्हणजे माझ्या मनाचं रिसायकलिंग किंवा ओव्हरहाॅलिंग असतं. असं केलं की मग स्वत:चीच स्वत:शी, स्वत:च्या मनाशी घट्ट मैत्री होत जाते आणि मग एकटेपणा अजिबात जाणवत नाही. वेगळे योग-प्राणायाम करायला लागत नाहीत. कुणीतरी म्हटलंय ना, की आपणच आपले फ्रेन्ड, फिलाॅसाॅफर, गाईड असतो म्हणून, ते जे कुणीतरी म्हलंय, ते नेमकं अशावेळी अनुभवायला येतं. स्मार्ट फोनच्या जमान्यात आपण इकडे बसून जगातल्या कुठल्याही व्यक्तीशी क्षणात संवाद साधू शकतो आणि आपण तसं करतही असतो. अनेकजण जवळच्या माणसांना कारणपरत्वे भेटत असतात. आपल्याकडे वेळ नाहीय, तो स्वत:लाच भेटायला. लिहण्यातून मला माझ्यातल्या मला भेटता येतं. मला वाटतं, लिहिणंच कशाला, कोणत्याही माध्यमातून व्यक्त होणाऱ्या कुणाही प्रत्येकाची हिच भावना असावी, मी लिहून तसं करतो एवढंच..!
गेली चार वर्ष मी सातत्याने लिहितोय. माझं लिखाण फेसबुक-व्हाट्सअॅपवर पोस्ट करतोय. माझ्या पोस्ट्सना उत्तम प्रतिसाद मिळतो. अक्च्युली, तो प्रतिसाद मला नसतो, तर मी माझ्याशी केलेल्या संवादाला असतो, कारण माझ्या मनाशी मी केलेला संवाद हा प्रत्येकजणांनी त्यांच्या त्यांच्या मनाशी केलेल्या संवादाचेच शब्दरुप असतं. प्रतिसाद मिळतो, तो त्या सारखेपणाला, मला नाही. अनेकांना असं वाटतं की मी लोकप्रिय होण्यासाठी लिहितो. लोकप्रियता ही शाश्वत नाही, विचार शास्वत असतात. मी विचार मांडण्यासाठी लिहितो, ते चुकीचे की बरोबर हे वाचणारांनी ठरवायचं परंतु ते मला पटलेले विचार असतात. मला पटलेलं मांडण्यासाठी मी लिहितो, लोकप्रियतेसाठी बिलकून नाही. लोकप्रियता मिळत असेल, तर ते बायप्राॅटक्ट आहे असं मी समजतो. बायप्राॅटक्टच्या नादात मी ‘मनसंवाद’ या मुख्य प्राॅडक्टकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून पुन्हा लिहायला बसतो..!!
मी माझ्याच विचारांना शिस्त लावण्यासाठी लिहितो, ती शिस्त मग अंगात भिनत जाते आणि प्रगट स्वरुपही घेते. देहबोलीचा तो पाया आहे. आत्म्संवादाचा फायदा हा की आपल्याच जगण्याने आपल्यालाच घातलेली कोडी आणि समोर उभे केलेले प्रश्न आपल्यालाच सोडवता येतात. त्यासाठी हैराण, परेशान होऊन कुणाच्या तोंडाकडे पहावं लागत नाही, म्हणूनही मी लिहितो..!
-@नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply