(ह्या लेखात मी माझी मतं मांडलीत. अर्थात ती अंतिम नव्हेत. या विषयावर चर्चा अपेक्षित आहे. कृपया हा लेख काळजीपूर्वक वाचावा ही विनंती..)
बलात्काराची साध्या शब्दात व्याख्या करायची म्हणजे, पुरुषाने स्त्रीचा बळजबरीने घेतलेला शारिरीक उपभोग. निसर्गाने प्राणीमात्रांचं वंशसातत्य कायम राहावं म्हणून नर आणि मादी अशा दोन भिन्न जाती बनवल्या आणि त्यांच्यात आकर्षण निर्माण केलं. हे आकर्षण त्या दोघांनी गरजेनुसार एकत्र यावं आणि त्यांच्यासारखाच नविन जीव निर्माण करावा यासाठी निर्माण केलं गेलं. दोघांनी एकत्र यावं याचा अर्थ, त्यांच्यात ‘सेक्स’ची क्रिया घडावी इतका साधा, सरळ आणि नैसर्गिक आहें. पृथ्वीतलावरचे सर्व प्राणीमात्र त्यांचं निसर्गाने ठरवून दिलेलं हे कर्तव्य बिनबोभाट पार पडत असतात.
हे कर्तव्य प्राणीच असलेल्या मनुष्यालाही चुकलेलं नाही. जशी पोटाची भूक असते, तशीच शरीराचीही भूक असते आणि ती योग्य वेळी जागृतही होत असते. मात्र मनुष्य’प्राणी’आणि उर्वरित प्राणीमात्रात फरक आहे तो विकसित बुद्धीचा. तशी ‘फिक्सड वायरिंग’ पद्धतीची बुद्धिमत्ता सर्व प्राण्यात असते परंतु ती त्यांची दैनंदिन कर्तव्य पार पाडण्यापुरातीच मर्यादित असते. मनुष्याची बुद्धी मात्र सातत्याने विकसित होत असते. म्हणून सर्व प्राणीमात्रात मनुष्यप्राणी हा वेगळा ठरतो. सेक्सची क्रिया केवळ वंशसातत्याबरोबरच आनंद देणारीही क्रिया असल्याचा शोध मनुष्याला पुर्वी कधीतरी लागला आणि मग इतर प्राणीमात्रांप्रमाणे मनुष्याचा सेक्स, इतर प्राणीमात्रांप्रमाणे केवळ ब्रिडींग पिरियडपुपता मर्यादीत न राहाता, सर्वकाळ होऊ लागला. बुद्धीमान मनुष्याने या सेक्समधे प्रेम, मोहोब्बत, मैत्री-दोस्ती इत्यादी भावना मिसळल्या आणि सेक्सचा आनंद वाढवायचा प्रयत्न केला. प्रेम-दोस्ती या भावना कितीही उदात्त असल्या तरी त्या भावनांचं उद्यापन शेवटी सेक्समधेच होतं हे कोणाला नाकारता येणार नाही. ‘प्रेम हे फुकट मध्ये सेक्स करण्याच नांव आहे’ असं आम्ही कॉलेजमध्ये असताना बोललं जायचं, ते काही उगाच नव्हे. एक मात्र आहे, प्रेमपात्राबरोबरचा अथवा चांगली मैत्री असलेल्या स्त्री-पुरुषांमधला सेक्स, कर्तव्यभावनेने केलेल्या ‘मॅकॅनिकल’ पद्धतीच्या सेक्सपेक्षा आनंद द्विगुणीत करणारा असतो यात अजिबात दुमत नाही..
सेक्समधे स्त्री आणि पुरुष असं दोघांचंही असणं आवश्यक असते. प्रेम किंवा कर्तव्य अशी भावना उद्दीपीत करणारी कोणतीही नांवं दिली, तरी त्या क्रियेतून आनंदाव्यतिरिक्त निसर्गाला अपेक्षित अशी वंशसातत्याची क्रियाही घडत असते. सेक्सच्या खेळात पुरूष ‘अॅक्टीव्ह’, तर स्त्री ‘पॅसिव्ह’ असते. स्त्रीची कितीही इच्छा असेल आणि पुरुषाची नसेल, तर सेक्स घडू शकत नाही. याच्या उलट स्त्रीची इच्छा नसेल आणि पुरुषाची असेल तरी सेक्स घडतो..थोडक्यात सेक्सची क्रिया निसर्गाने संपूर्णपणे पुरुषाच्या मर्जीवर ठेवलेली आहे. तरीही स्त्रीच एक बलस्थान आहे. पुरुषाच्या तुलनेत स्त्री सेक्सच्या खेळात, तिची इच्छा असो वा नसो, अमर्याद काळापर्यंत भाग घेऊन शकते किंवा तिला भाग घेण्यास भाग पाडले जाऊ शकते. पुरुषाच्या या खेळत एका वेळेस भाग घेण्याच मर्यादा अत्यंत सीमित असते किंवा पुरुषाला सेक्स करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. एका संभोगा नंतर पुरुष काही काळ आपलं ‘पुरुषत्व’ गमावतो व त्याला पुन्हा तयार होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. माझं तर असंही म्हणण आहे, की स्त्रीमधल्या सेक्सच्या खेळात मर्जीने अथवा गैरमर्जीने भाग घेण्याच्या या अमर्याद शक्तीला ओळखून स्त्रीला विविध व्रतवैकल्याच्या जाळ्यात पुरुषाने अडकवल असावं आणि योनी शुचीतेच्या कल्पना तिच्यावर बिंबवल्या असाव्यात. बुद्धीमान मानवाने पुरुष आणि पुरुषी वृत्ती ही सर्वोच्च आहे अशी भावना निर्माण केली आणि समाजातही तसे नियम केले, यामागे इतर काही कारणांप्रमाणे हे ही एक कारण असावं अस मी समजतो..
पुरुषाच्या मर्जीशिवाय संभोग होऊ शकत नसला तरी, अपत्यप्राप्तीसाठी कोणत्या नराच्या बिजाला आपल्या गर्भाशयात स्थान द्यायचं हे ठरवण स्त्रीच्या मर्जीवर अवलंबून असतं. हे तत्व निसर्गात सर्व प्राणीमात्र पाळताना दिसतात. निसर्गात प्राणी-पक्षांमधे नराला देखणं बनवलं आहे तर मादी कुरुप किंवा सर्वसाधारण म्हणता येईल अशी असते. प्राणी-पक्षांच्या ब्रिडींग काळात मग मोर पिसारा फुलवतो, कोकीळ गातो (मादी कोकीळेला कंठ नसतो. तरी ‘गान कोकीळा’ का म्हणतात हे कळत नाही.). वाघ-सिंहांमधे कळपातील माद्यांसाठी लढाया होतात व वरचढ कोण हे ठरवण्याची स्पर्धा लागते. या सर्वातील जो नर मादीला देखणा वाटतो किंवा शुर वाटतो, त्याला मादी तिच्याशी संभोग करण्याची मूक परवानगी देते आणि बाकीचे नर वेगळ्या कळपातील माद्यांच्या शोधात चार दिशेला गुमान निघून जातात. हे असं घडण्यामागे मादीला आपला गर्भ देखणा, शुर आणि ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ या निसर्गाच्या तत्वात बसणारा हवा असतो, हे साधं नैसर्गिक गणित असतं. माणसासहीत सर्व माद्यांमधे ही निसर्गसुलभ भावना जन्मत:च असते, परंतु या भावनेची जाणीव नसते. याच गोष्टीचा मनुष्यातील अविष्कार म्हणजे, पूर्वीची स्वयंवरं आणि आपल्या पिढीतील मुलगी दाखवून आणि मुलाची संपूर्ण माहिती काढून मगच केली जाणारी लग्न..! स्वयंवरातून हुशार आणि शूर राजकुमारच्या गळ्यात राजकन्या वरमाला घालायची आणि नंतर आमच्या वेळी जो मुलगा शिकलेला असेल, गरीब असला तरी विचाराने चांगला असेल त्याला पसंत केलं जायचं. हल्लीच्या काळात मुलींवर इम्प्रेशन मारण्यासाठी मुलांकडून जे काही प्रकार केले जातात, तो त्यांनी केलेला मादीचा अनुनयच असतो. निसर्गातील सर्व माद्याप्रमाणेच मनुष्यातही होणारे हे प्रकार, आपलं होणारं अपत्य उत्तम निपजावं ह्या भावनेतूनच केले जातात. प्रेमविवाह ही याच सुप्त भावनेने केले जातात. कर्तुत्ववान पुरुषाच्या आयुष्य अनेक स्त्रिया येतात, त्या स्त्रीच्या या भावनेतूनच. त्या कर्तुत्ववान पुरुषासारखं अपत्य आपल्याला प्राप्त व्हावं, ही निसर्गातील कोणत्याही मादी प्रमाणे मनुष्याच्याही मादीची भावना असल्यास नवल नाही.
निसर्गातील मादीप्रमाणेच नराच्याही निसर्गसुलभ भावनांचा अभ्यास करणं आवश्यक ठरतं. मुळात नर-मादीची निर्मितीच वंशसासतत्यासाठी झालेली आहे. मादीला आपल्या गर्भात कोणाचं बीज रुजवून घ्यायचं हे ठरवण्याचा अधिकार आहे, हे आपण वर पाहिलं. कारण त्या बीजातून निर्माण झालेल्या गर्भाचं पालनपोषण करण्याची जबाबदारी निसर्गाने मादीवरच सोपवली आहे. तर मग नराचं प्रयोजन फक्त तिच्या पोटात बीज सोडण्यापुरतंच आहे का, तर या प्रश्नाचं उत्तर होय असं आहे. मादीप्रमाणे नराला आपण कोणाशी संग करतोय याच्याशी फार कर्तव्य नसतं, त्याला फक्त आपलं बीज त्या मादीच्या गर्भाशयात स्थापन करायचं असतं. इथे निसर्गाने निर्माण केलेली एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. एक नर एकाच वेळेस जीतक्या माद्यांच्या गर्भाशयांत आपलं बीज सोडेल, तेवढ्या संख्येने एकाच वेळी होऊ शकणाऱ्या अपत्यांची संख्या वाढते, तर मादीचा संबंध एकाच वेळी अनेक मरांशी आला, तरी अपत्य संख्या केवळ एकच राहाते. मादीच्या पुनरुत्पादन क्षमतेला निसर्गतःच मर्याद आहे आणि पुरुष मात्र मरेपर्यंत प्रजननक्षम असतो, ही देखील वंश सातत्य टिकवण्यासाठी निसर्गाने केलेली योजना आहे. बहुपत्नीत्व यातूनच आलेलं आहे. स्त्री आणि पुरुषांच्या सेक्सकडे पाहाण्याच्या दृष्टीत हा मुलभूत नैसर्गिक फरक आहे. यावर अधिक वाचण्यासाठी माझा ‘भ्रमर’ हा लेख वाचवा..! (https://www.facebook.com/nitin.salunke.1…/…/1358928180828702)
नर आणि मादी त्यांना निसर्गाने सोपवलेले कर्तव्य अगदी बीनबोभाट पार पाडत असतात. याच भावना मनुष्य प्राण्यांत असुनही हीच गोष्ट वादावादीची होते याचं कारण, मनुष्याने समाजाचं केलेले नियमन..मुळात कुटुंबव्यवस्था आणि त्यातून निर्माण झालेले विविध नाते संबंध आणि त्यातील नैतिक-अनैक्तिक भावना या समाजाचं वागण नियंत्रित करण्यासाठी केली गेलेली कृत्रिम निर्मिती आहे. मनुष्याच्या काम भावनांची पूर्ती समाजाने ठरवून दिलेल्या नियमातच व्हावी आणि समजत स्वैराचार मजू नये असा त्यामागचा विचार आहे. अनेक वर्षांच्या नियमातून, संस्कारामुळे आपल्या या नैसर्गिक भावना दाबल्या गेलेल्या असतात, मात्र नाहीश्या झालेल्या नसतात आणि संधी मिळताच त्या उफाळून येतात. इथेच अनैतिक संबंध निर्माण होतात आणि मग त्यातून बलात्कारासारखे प्रकारही घडतात. अनैतिक संबंधाची करणे अनेक आहेत, परंतु तूर्तास आपला तो विषय नसल्याने त्याची चर्चा इथे करत नाही. त्यावर पुन्हा कधीतरी बोलू. आता फक्त बलात्कार या विषयाची चर्चा करू.
चौथ्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे, प्राणीमात्रात मादीने पसंत केलेल्या नराव्यतिरिक्तचे सर्व नर मग दुसऱ्या माद्यांच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने निघून जातात. निसर्गात मादीच्या मनाविरुद्ध तिचं आणि नराचं मिलन होत नाही. हा नियम निसर्गात कटाक्षाने पाळला जातो. मनुष्याच्या बुद्धीने (वाम बुद्धीने म्हणा हव तर) मात्र त्याला असं करण्यापासून परावृत्त केलं. याचं एक कारण, वर म्हटल्याप्रमाणे, संभोग हा केवळ अपत्यप्राप्तीसाठी नसून आनंदासाठीही असतो हा त्याला लागलेला शोध. या आनंदापोटीच (विकृत आनंद म्हणा हवं तर) मला हवी ती मादी मी कशीही करून मिळवणारच हा हट्ट मनुष्याच्या मनात बसला आणि मग इथे बलात्काराने जन्म घेतला.
आपल्या समाजात बलात्कार का होतात?
आपल्याला हव्या त्या मादीचा, तिची मर्जी असो वा नसो, हव्यास बलात्काराला कारणीभूत ठरतो. मग त्या मादीच्या प्राप्तीसाठी तिला भुलवण्याचे विविध प्रकार सुरु होतात. यात प्रामुख्याने येतो तो पुरुषाने तिला स्वतःबद्दलच्या खऱ्या-खोट्या विविध गोष्टी तिला सांगून तिला भुलवण्याचा प्रकार. खोटी आश्वासनं, लग्नाचं वचन, एखाद्या मोक्याच्या जागेवरची नेमणूक किंवा निवडणूकीच तिकीट आणि अशीच बरीच काही आश्वासनं दिली जातात ..!. पुरुषाच्या भूल-थापांना, त्याच्या खऱ्या-खोट्या कर्तुत्वाला भुललेली ती स्त्री स्वतःला त्याच्या स्वाधीन करते. पुढे बऱ्याच कधीतरी आपण फसवले गेलोय हे तिच्या लक्षात येते आणि मग त्या पुरुषावर बलात्काराचे आरोप केले जातात. वास्तविक आपण फसव्लो गेलोय हे तिला कळेपर्यंत तिच्याशी त्या पुरुषाने ठेवलेलं संबंध तिच्या सहमतीने (अल्पवयीन मुली वगळता) ठेवलेले लैंगिक संबंध असतात. त्यामुळे त्यांना बलात्कार म्हणावं, की आणखी काही हे नीट समजत नाही..यात अज्ञान किंवा सज्ञान मुली-स्त्रीया असा भेद नसतो. यातील बरेचसे संबंध महिनोंमहीने किंवा दिवसेंदिवस सुरु असतात आणि याची प्रत्यक्षात उघडणूक बऱ्याच काळाने होते आणि त्यांची व्याख्या बलात्कार अशी केली जाते. असे बलात्कार सिद्ध होणं अवघड असतं. पुरुषाच्या दृष्टीने ती त्याची वासना पूर्ती असते.
सुड किंवा बदला घेण्याच्या निनित्तानेही बलात्कार केला जातो. दोन व्यक्ती किंवा दोन कुटुंब किंवा दोन समाज किंवा दोन देश यामधील भांडणात शत्रुपक्षातील स्त्रियांवर बलात्कार केला जाणे अगदी नित्याचे आहे. या बालात्कारामागे वासनांची पूर्ती हा उद्देश नसतो, तर शत्रूला धडा शिकवणे हा उद्देश असतो. इथे बलात्काराचा उपयोग एक हत्यार या पेक्षा जास्त नसतो. असे बलात्कार हा ठरवून केला जातात असं ठामपणे म्हणता येणार नाही. देशाविरुद्ध, समाजाविरुद्र किंवा व्यक्तीविरुद्धचा बदला किंवा सूड या भावनेतून असे बलात्कार होत असतात. सामुहीक बलात्कारांची कारणे बऱ्याचदा अपमानाचा बदला किंवा सुड ही असु शकतात. एखाद्या पुरुषाला एखाद्या स्त्रीने दिलेल्या नकाराचा राग ठेवून, आपल्या झालेल्या तथाकथित अपमानाचा बदला घेण्यासाठी बलात्काराचा हत्यार म्हणून उपयोग केला जातो.
आपल्यासारख्या असंख्य जाती-जमातीच्या देशात त्यां त्यां जाती-जमातींच्या उच-निचतेच्या कल्पनाही सामुहीक बलात्काराला कारणीभूत असतात. स्त्री ही संपत्ती असा समज असल्याने, स्रीवर केलेला बलात्कार हा संपत्तीच्या लूटीसमान मानण्याची आपली पुरातन कल्पना आजही आपल्या मनात कुठेतरी शाबूत असल्याच्या मानसिकतेतून असे बलात्कार घडतात. योनीशुचीतेच्या आपल्या सांस्कृतिक कल्पनाही बलात्कार घडवण्यास कारणीभूत असतात. त्यातून शत्रूच्या स्त्रीला नासवणे ही भावना या बलात्काराच्यामागे असते. शिवाय कोणत्याही मोठ्या भांडणात स्त्री हे सॉफ्ट टार्गेट असल्याने, सामुहीक किंवा वैयक्तिक बलात्कारांच्या घटना घडतात. हे बलात्कार सिद्ध करून त्यांना कायद्याच्या चौकटीतून शिक्षा देणं तुलनेने सोपं असतं. सेक्स मध्ये मोकळ्या ढाकळ्या असणाऱ्या पाश्चिमात्य समाजातील बलात्कार साधारण या मुळे घडतात.
आता आपल्या देशातील सर्वात जास्त प्रकारच्या बलात्कारांबद्दल. आपल्या सारख्या बंदिस्त समाज व्यवस्थेत स्त्री-पुरुषांच्या काम भावनांच्या पूर्तीचा समाजमान्य मार्ग म्हणजे केवळ लग्न ही व्यवस्था असते. ‘नातिचरामी नातिचरामी’ किंवा ‘सात जन्म हाच पती किंवा पत्नी’ या भावना कितीही उदात्त असल्या, तरी लग्नाच्या बंधनात अडकलेल्या त्या स्त्री –पुरुषांच्या काम भावनांना त्या मर्यादेत ठेवतात असं ठामपणे म्हणता येणार नाही. अशा अनेक स्त्री-पुरुषांमध्ये कामभावनांची पूर्ती होऊ न शकल्यामुळे मग त्यांच्यात विकृती निर्माण होते. स्त्रीवर असलेली बंधन, समजाची नजर, विविध बंधनं यामुळे स्त्री आपल्या या भावना दडपून टाकते, तर पुरुष हा समाजात मोकळा असल्याने, आपल्या काम भावनांची पूर्ती करण्यासाठी तो विविध मार्ग छुप्या रीतीने शोधत असतो. यातूनच मग अंगवस्त्र, वेश्याव्यवसाय, अनैक्तिक संबंध वैगेरे निर्माण होतात. ‘वेश्या नसत्या तर चांगल्या घरातील बायका मुलीना घराबाहेर पडण मुश्कील झाल असत’ असं म्हणतात ते याचमुळे. पुरुष आपल्या लैंगिक भावना फार काळ दाबून ठेवू शकत नाही. पूर्वीपेक्षा समाज अधिक मोकळा झाल्याने अनैक्तिक संबंधाच प्रमाण आपल्याकडे वाढत आहे ते याचमुळे. अशा संबंधात स्त्रीचाही सहभाग असलातरी तिची अशा संबंधातली गुंतणूक बहुतकरून भावनिक असते, तर पुरुषाची संपूर्णपणे शारीरिक. स्त्रीचा अनैतिक समजला जाणारा संबंध एका पुरुषा पर्यंत मर्यादित असू शकतो, तर त्याच वेळेस त्या पुरुषाचे अनेक स्त्रियांशी असे संबंध असू शकतात. असे संबंध उघडकीस आल्यावर मात्र बऱ्याच स्त्रिया त्यांची बदनामी होईल म्हणून गप्प बसतात तर काहींकडून त्या पुरुषावर बलात्काराचा आरोप ठेवला जातो, हे सत्यही समजून घेण्याची गरज आहे.
आपल्याकडील ‘स्त्री ही एका क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता’ असते हे सत्यही नवरा-बायकोच्या काम संबंधात अडथळा आणते, अशी तक्रार माझ्याकडे मी ‘भ्रमर’ हा लेख लिहिल्यानंतर अनेक ‘नवऱ्यांनी’ केली होती. माझंही मत काही वेगळं नाही. खरच, आपल्याकडे माता होण्यासाठीच स्त्री पत्नी होते की काय, अशी वाटण्यासारखी परिस्थिती आहे खरी. एकदा का ती त्या मुलात गुंतली, की मग पत्नीधर्म ती साफ विसरून गेलीय की काय, असं वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण होते हे खरंय. अगदी शंभर टक्के नव्हे, परंतु ह्या सत्याची टक्केवारी बरीच मोठी आहे. पुरुषाला चळण्यासाठी हे ही एक कारण आहे.
वेश्यांकडे जाण्याचे धारिष्ट्य नसलेले किंवा प्रयत्न करूनही अनैतिक संबंध प्रस्थापित न करू शकलेले पुरुष मग आपल्या लैंगिक भावनांच्या पूर्तीसाठी सॉफ्ट टार्गेट्सच्या शोधात असतात. असे टार्गेट त्यांना त्यांच्या घरात, शेजारी किंवा जवळच्या नातेसंबंधात सहज उपलब्ध होऊ शकते. अशी टार्गेट बहुतकरून अल्पवयीन मुली (हल्ली मुलंही) असतात. लहान मुलांच्या घरातील किंवा शेजारच्या वयाने मोठ्या असलेल्या काका-मामा वैगेरे पुरुषाविषयी असलेल्या भीतीयुक्त आदराचा आणि लहान मुलीना यातलं फारसं काही कळत नसल्याचा पुरुषांकडून गैरफायदा घेतला जातो आणि आपल्या काम भावनांची विकृत पुरती केली जाते. लहान मुलींशी मोठ्या वयाच्या पुरुषाने केलेल्या संभोगामुळे त्या पुरुषाच्या लैंगिक ताकदीत वाढ होते या सारख्या खुळचट कल्पनाही काही ठिकाणी अशा प्रकारच्या संबंधात असतात. यात बळी पडणाऱ्यांत अल्पवयीन मुलींचा भरणा जास्त असतो. अल्पवयीन बालांवर केल्या जाणाऱ्या बलात्कारांना मी ‘बालात्कार’ असं म्हणतो.
‘भारतीय गुन्हे नोंद ब्युरो NCRB’च्या माहितीनुसार आपल्या देशातील जवळपास ९५ टक्के बलात्कार घरातील जवळच्या माणसांकडून अथवा नातेवाईकांकडून केले जातात. ‘बाला’त्कारांचा हेतूच मुळात पुरुषाच्या विकृत वासनेची पूर्ती हा असतो. आपल्याकडे हे बलात्कार फारसे उघडकीस येत नाहीत, कारण ‘समाज काय म्हणेल’ ही भिती. कारण यात पुरुषापेक्षा स्त्रीची किंवा त्या मुलीचीच बदनामी होत असते. आपण आज कितीही शिकलो सवरलो किंवा जगाला दिशा वैगेरे देण्याच्या गप्पा जरी मारल्या, तरी आजही कुठल्याही वयाच्या स्त्रीकडे पाहाण्याचा आपला एकूणच दृष्टीकोन हिनतेचाच आहे. स्त्रीची सामाजिक बदनामी होऊ नये म्हणून अशा बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद पोलिसात होण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे.
आणखी एक बलात्कार आपल्याकडे नित्यनेमाने होत असतो. ह्या बलात्काराला किमान आपल्या देशातील सर्व वयोगटाच्या मुली-स्त्रिया दररोज आणि सकाळ संध्याकाळ बळी पडत असतात. हा बलात्कार म्हणजे नजरेने केला जाणारा बलात्कार. असा बलात्कार करणाऱ्यामध्ये तरुणांपासून पुढील सर्व वयोगटाचे, संस्कृतीचा अभिमान असणारे आणि नसणारेही, सर्व प्रकारच्या हुद्द्यावारचे, अमीर-गरीब अश्या सर्व प्रकारचे पुरुष कमी-अधिक प्रमाणात सामील असतात. समाज, नियम, कायद्याची भीती किंवा धाडसाचा अभाव यामुळे हे प्रत्यक्षात काही करत नाहीत, परंतु केवळ नजरेने समोरच्या स्त्रीला तिची वस्त्र फेडून आरपार पाहत, तिच्याशी ते काल्पनिक संग करत असतात. हा बलत्कार सिद्ध करता येत नाही, मात्र कोणत्याही वयाच्या स्त्रीला तो व्यवस्थित जाणवतो. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना विचारून पहा, त्या बरोबर सांगतील. गर्दीचा फायदा घेऊन धक्का मारणे, बसच्या कमी अधिक होणाऱ्या गतीचा फायदा घेऊन स्त्रियांच्या अंगचटीला जाणे, काही न काही निमित्ताने स्त्रियांशी बोलणे, तिला स्पर्श करणे हा बलात्कार आहे. ह्यात किंवां घरगुती गैरप्रकारात बहुसंख्य स्त्रिया याची वाच्यता करीत नाहीत कारण आपल्या समाजाची स्त्रीलाच दोष देब्ण्याची वृत्ती.
देशात नुकत्याच घडणाऱ्या विविध बलात्कारांच्या बातम्या आणि त्यतून सरकारवर केले दोषारोप हा राजकारणाचा भाग आहे. बलात्काराची कारण सामाजिक आणि मानसिक आहेत. स्त्री-पुरुषांचा सेक्स बद्दल असलेला नैसर्गिक कल या मागे आहे. कोणतंही सरकार आणि कितीही कठोर शिक्षा बलात्कारांना आळा घालू शकत नाहीत. अखाती देशातील शिक्षा अत्यंत क्रूर म्हणता येतील अशा असूनही त्या देशातील बलात्कार आणि स्त्रियांचं लैंगिक शोषण थांबलेलं नाहीय. याउलट पुढारलेल्या देशात सेक्स हा अत्यंत सामान्य जाणारा प्रकार असूनही तेथील बलात्कार थांबलेले नाहीत. आपल्या देशात तर सेक्स हा शब्दही चारचौघात उच्चारण अशिष्ट मानल जात, तिथे प्रत्यक्ष काम भावनांचं काय होत असेल याची कल्पना करा. तरी आता आपला समाज बराच मोकळ झालाय आणि त्याच प्रतिबिंब टीव्ही मालिकांमधल्या अनैतिक संबंधातून दिसतंय. जो पर्यंत काम भावना आहे, तो पर्यंत अनैतिक संबंध आणि बलात्कार होणारच आहेत..!
— ©️नितीन साळुंखे, मुंबई
9321811091
Leave a Reply