गच्चीतून पाणी गळण्याची कारणे खूप आहेत. काँक्रिटच्या स्लॅबची जाडी वाजवीपेक्षा कमी ठेवल्यास स्लॅब वजनाखाली झुकणे, परिणामी मध्यभागी खालच्या बाजूस व तुळईच्या ठिकाणी वरच्या बाजूस भेगा पडणे, कॉक्रिटसाठी वापरलेले सिमेंट कमी प्रतीचे व वाजवीपेक्षा कमी वापरलेले असणे, पाण्याचे प्रमाण जास्त ठेवल्यामुळे सिमेंटची मजबुती कमी होणे, कॉक्रिट ओतल्यावर ते व्हायब्रेटरने नीट हलवून मिश्रणातील हवेचे बुडबुडे पूर्ण नष्ट न केल्याने कॉक्रिटमध्ये अनेक पोकळया राहणे, काँक्रिट ओतल्यावर २४ तासांनी त्यावर पाणी साठवून कमीत कमी १५ दिवस कॉक्रिट ओले न ठेवल्याने (क्युरिंग) अंतर्गत पाण्याचे बाष्पीभवन न झाल्याने पाणी-सिमेंट यांची रासायनिक प्रक्रिया अपुरी राहून कॉंक्रिटची मजबुती अपेक्षेपेक्षा कमी होणे, स्लॅबच्या पृष्ठभागाला योग्य उतार न दिल्याने पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने पाणी जागोजाग साठून राहणे, गच्चीतील पाणी वाहून नेण्यासाठी असलेल्या पाईपची वाजवीपेक्षा कमी संख्या असणे, पाईपांच्या तोंडाशी व पाईपांत कचरा साठलेला असणे वगैरे कारणांच्या एकत्रित परिणामांमुळे पावसाळ्यात स्लॅब गळू लागते.
जर घरांच्या भितींच्या फ्लॅस्टरची जाडी कमी असेल, फ्लॅस्टरिंगमध्ये सिमेंट आणि रेतीचे मिश्रण योग्य वापरले गेले नसेल, विटांचे सांधे भरतानाच्या काँक्रिटमध्ये सिमेंट- रेतीचे मिश्रण ठिक नसेल, विटांचे सांधे भरताना त्यात अनेक भेगा आणि भोके राहिली असतील, बांधकाम झाल्यावर २४ तासांच्या आत पाणी मारुन ते १० दिवस ओले ठेवले नसेल, फ्ल्स्टरवर योग्य ते वॉटरप्रूफिंगचे रंग दिले नसतील, कॉंक्रिट आणि विटांची भिंत यांच्या सांध्यावर गॅल्व्हनाइज्ड जाळी वापरली नसेल तर या सगळ्यांचा एकत्रित परिणाम होऊन भिंतीत पाणी झिरपू लागते आणि भिंती ओल्या होतात.
बांधकाम व्यवसायात तंत्रज्ञानाची खूप प्रगती झाली आहे परंतू हा व्यवसाय आता अशिक्षित ठेकेदार आणि पैसेवाल्यांच्या हाती गेला असल्याने कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष न देता लवकर पैसा मिळवण्याचे उद्दीष्ट गाठले जाते. यामुळे वरील दोष सर्रास दिसून येतात.
Leave a Reply