नवीन लेखन...

कोकणची मुंबई का नको? काही कारणं

Why not Transform Konkan to Mumbai - A few reasons

‘कोकणची मुंबई;नको रे बाप्पा’ या माझ्या लेखावर अनेक संमिश्र प्रतिक्रीया आल्या. त्या सर्वांच्या मुद्दयांना त्याच ठिकाणी उत्तर देणं, म्हणजे जो पटला नाही तो आणि जो पटला तो ही, शक्य नसल्याने मी हा स्वतंत्र लेख लिहिण्याचा निर्णय घेतला.

पहिली गोष्ट मला सांगायला आवडेल, की अनेकांना मी विकासाच्या विरोधात आहे असा जो गैरसमज झालाय किंवा असं चित्र उभं केलं गेलंय ते चुकीचं आहे. की माझा विकासाला विरोध नाही. परंतू मुंबईच्या माॅडेलबरहुकूम विकासासोबत ज्या ज्या बऱ्या-वाईट गोष्टी येतील, त्या ही स्विकारायची तयारी ठेवायला हवी हे मला सांगायचंय. तशो कल्पना आणि त्या स्विकारायची कोकणातील माणसांची तयारी अाहे किंवा नाही, मला माहित नाही, परंतू ती तशी स्विकारायची अथवा नाही हे तेथील स्थानिकांनीच ठरवावं, तो अधिकार माझा नाही. मी फक्त त्यांना त्याची जाणिव करून दिली.

आता बाकीच्या गोष्टी.
उद्योग आल्याशिवाय विकास होत नाही हे बरंचस खरं आहे;आणि सर्वच उद्योग लहान-मोठ्या प्रमाणात प्रदुषण करतात हे सर्वच खरं आहे. तरीही उद्योग यायला हवेत, परंतू कोकणचा युएसपी तेथील निसर्ग आहे आणि त्याची कमीत कमी हानी करणाऱ्या उद्योगाबद्दल विचार व्हायला हवा. आणि रिफायनरी, मग ती कोणत्याही रंगाची असो, हे त्यावर उत्तर नाही. पर्यटन, फुड प्रोसेसिंग, टेक्सटाईल (एकेकाळी नागडेबाबांची कणकवली कपड्यांच्या हातमागासाठीही प्रसिद्ध होती) उद्योग, आयटी, बिपीओ, मोटर उद्योग, चित्रपट उद्योग असे इतर कितीतरी उद्योग आहेत, जे कोकणातील स्थानिकांना रोजगार देऊ शकतात, त्यासाठी रिफायनरी हा एकमेंव आणि अक्सिर इलाज नव्हे हे माझं मत. तरीही कोकणातील स्थानिकांना ते हवं असेल तर माझी काही हरकत नाही.

माझा आक्षेप आहे तो मुंबईचं माॅडेल डोळ्यासमोर ठेवण्याला. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असली, तिची अंतर्गत परिस्थिती पार मोडकळीला आलेली आहे. बाहेरून स्वर्ग दिसणारी मुंबई फक्त २०-२५ टक्के धनिकांची आहे आणि ते ही बाहरून मुंबईत आलेल्यांची. मुंबईत वाहतुकीचे, पर्यावरणाचे, निवासाचे प्रश्न अत्यंत गंभीर आहेत. मुंबईतील बहुसंख्य स्थानिक कधीच महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर गेलेले आहेत. मुंबईतले उद्योग कधीच उठले आहेत आणि त्याजागी सेवा उद्योग आलेले आहेत आणि तेथे बहुसंख्य बाहेरून आलेले लोक काम करत आहेत ही वस्तुस्थिती आहे. मुंबईतल्या गिरण्या, मोठमोठ्या गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत आणि तेथील स्थानिक माणूस मुंबईतच उपरा झालेला असून तिथेच कुठेतरी वाॅचमनची नोकरी करत आहे. ज्या उद्योगांमुळे मुंबई जगभरात प्रख्यात झाली, ते उद्योग प्रदुषणाचं कारण देत मुंबईबाहेर गेलेले आहेत. साधारण २०-२५ वर्षांपू्वी सोन्याचा धुर निघणारा, मुंबईचं इंडस्ट्रीयल हार्ट असणारा सीएसटी रोड आणि ठाणे-बेलापूर रोड आज मोठमोठाले हाऊसिंग काॅम्प्लेक्सेस आणि आयटी-बिपीओ कंपन्यांनी भरून गेलाय. मुंबईची औद्योगिक नगरी बनवणारे सर्व उद्योग मुंबबाहेर जाण्याच सर्वात महत्वाचं कारण म्हणजे, हे उद्योग अभे असलेल्या जमिनिंना आलेला सोन्या-रुप्याचा भाव आणि दुसरं म्हणजे ते करत असलेलं प्रदुषण.

मुंबईला महानगरी बनवली ती मुख्यत: कोकणी माणसाने. त्यामुळे कोकणी माणूस आळशी वैगेरे आहे यावर माझा विश्वास नाही. पण कोकणी माणसाने उबवलेल्या मुंबईने दिलेली सोन्याची अंडी खाण्यासाठी आज हा माणूस मुंबईत फक्त नांवालाच शिल्लक राहीलेला आहे. अवाढव्य पसरलेल्या झोपडपट्टया, मरणयात्रा हेच नांव योग्य असलेला प्रवास, महागाई, गगनाच्याही पार पलिकडे गेलेले खोल्यांचे भाव या यर्व गोष्टी हे औद्योगिकरणाचं बायप्राॅडक्ट आहेत, असतात. मुंबईला सोन्याचं बनवणारा मराठी मुंबईतून कधीचाच हद्दपार झालाय आणि उरलाय तो १०-१५ हजारांसाठी १०-१२ तास राबणारा निम्न स्तरावरचा कष्टकरी. मुंबईत आर्थिक दृष्ट्या सुखी आणि सुरक्षित आहेत ते फक्त सरकारी, निम सरकारी, बॅंक कर्मचारी, बुद्धीच्या बळावर पैसे कमावणारे प्रोफेशनल आणि व्यावसायिक. त्यातही प्रोफेशनल आणि व्यावसायिकांमध्ये बहुसंख्य बाहेरचे लोक आहेत हे थोडं निरीक्षण केलं तर लक्षात येईल. लांब मुंबईला राहून पोट भरलेले माझ्यासारखेच कोकणच्या ऑक्सिजनची काळजी करतायत हा आणखी एक आक्षेप माझ्या लेखावर घेण्यात आला आहे. मुळात मुंबईतलं जीवनमानच एवढं महागडं आहे, की महिना २५-३० हजार कमावणारा उथं गरीब असतो आणि महिना ५०हजार कमावणाराही इथे सुखी आणि भरल्यापोटी असतोच असं नाही. उभी उमेद घरासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यात खर्ची पडते. मुंबईत दोनच प्रकारचे लोक सध्या उरलेत. एक, ज्यांची पोटं तुडुंब भरून ओघळतायत असे गगनचुंबी इमारतीत राहणारे १०-२० टक्के धनिक आणि त्यांची सेवा करण्यासाठी झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे अर्धपोटी गरीब. आम्ही मधलेच आहोत. धड पोट भारलेलेही नाही आणि उपाशीही नाही, असे काहीसे. कोकणसाठी मुंबईचं माॅडेल डोळ्यांसमोर असेल, तर मग हे पॅकेजही स्विकारावं लागेल याचीही जाणीव असणं आवश्यक आहे. कोणत्याही गोष्टीला बऱ्या-वाईट अशा दोन बाजू असतात आणि ती गोष्ट स्विकारताना दोन्ही गोष्टी स्विकाराव्याच लागतात.

आपण भारतीय राज्यघटना स्विकारली, तेंव्हा ‘कल्याणकारी राज्या’ची ( Walfare State) कल्पना स्विकारली आहे. या या संकल्पनेत आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षा इ. महत्वाच्या गरजा फायदा-तोट्याचा विचार न करता सरकारने पुरवायच्या असतात. हाॅस्पिटल्स, काॅलेज आणि शाळा इत्यादी गोष्टी खेड्यापाड्यातील जनतेला पुरवणं सरकारचं कर्तव्य आहे आणि ह्या गरजा पुरवण्यासाठी सरकारला भाग पाडणं हे स्थानिक लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे, जनतेनेही ह्या गोष्टी मिळाव्यात यासाठी लोकप्रतिनिधींवर दबाव आणायला हवा हे ही तेवढंच खरं आहे. त्यासाठी इंडस्ट्री यायलाच हवी असा आग्रह नसावा. कल्याणकारी राज्यात आरोग्य, शिक्षण हे पुरवण्याची जबाबदारी सरकारची असते, उद्योगांची नाही.

इंडस्ट्रीमुळे रोजगार मिळतो हे खरं आहे. म्हणून उद्योग यायलाच हवेत असं माझंही मत आहे. परंतू ते व्यवसाय कोकणातील स्थानिक वातावरणाला पोषक नसले, तरी किमान मारक नसावेत. कोकण हा स्वर्ग आहे, तो तसाच राहून विकास होत असेल तर विरोध कोण आणि कशाला करणार? लेखाच्या तिसऱ्या परिच्छेदात उल्लेख केलेले किंवा तत्सम उद्योग आणले तर अधिक संयुक्तिक होईल असं मला वाटतं.

थोडंसं विषयांतर. मला बेरोजगारांचा अपमान करायचा नाही, परंतू रोजगार नसणं ही किंचित फसवी टर्म आहे. मुंबईतही सर्वांना रोजगार नाही. देशातही नसावा हे पेपरमधे येणाऱ्या बातम्यांवरून समजतं. मुंबईत सर्वांच्या हाताना काम नसुनही, परप्रांतीय इथे येऊन मेहेनत करून पोट भरतायत, काही तर प्राॅपर्टीही बनवतायत हे ही तेवढंच खरं आहे. स्थानिकांना रोजगार नाही मात्र परप्रांतीयांना आहे, हे कसं काय? एवढं असुनही रोजगार मेळावे, पेपरमधल्या ‘पाहिजेत’च्या पान पान भरूनच्या जाहिराती का असतात हा प्रश्न मला पडतो. सांगायचा मुद्दा हा की रोजगार नाही या पेक्षा योग्य कामासाठी योग्य मनुष्यबळ नाही किंवा आहेत त्यांचं कोणतंही काम करायची तयारी नाही. गांधीयन इकाॅनाॅमीत ‘डिग्निटी आॅफ लेबर’ आपण अर्थशास्त्रात शिकतो पण प्रत्यक्षात आणत नाही ही आपली समस्या आहे, रोजगार नसणं ही नाही. मुंबईच्या रोल माॅडेलमधे ही गोष्टही नजर अंदाज करून चालणार नाही.

कोणत्याही लिहिणाऱ्या माणसाला जपून पेक्षा विचार करून लिहावं लागत, कारण त्या लिखाणाचा बरा-वाईट परिणाम वाचणाऱ्यांवर होत असतो. मी लिहिताना नेहेमी याच भान ठेवलेलं अाहे. लिहितांना मी शक्य तेवढी काळजी नेहेमीच घेतो. मी लिहिलेला परंतू माझ्या लिखाणाप्रमाणे नसलेला एखादा मुद्दा जर मला पटला, तर मला माझं पाऊल मागे घ्यायलाही काही वाटणार नाही, कारण यात माझा वैयक्तिक स्वार्थ काही नाही. मी कोकणचा प्रतिनिधी नाही परंतु कोकणचा पुत्र मात्र आहे आणि माझी दूधआई असलेल्या मुंबईचे धिंडवडे जसे निघालेत तसे ते जन्म देणाऱ्या आईचेही निघू नयेत एवढीच माझी साधी अपेक्षा आहे आणि म्हणून मी तो लेख लिहिला होता.

या उप्पर मला काहीच सांगायचं नाही..!!

— नितीन साळुंखे 
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..