परवा पेपरात बायकोने नवर्याला मारायची सुपारी दिल्याची बातमी वाचल्यावर माझे होश उडाले. कारण होते नवरा सतत वॉट्सअॅप आणि फेसबुकवर असायचा. मलाही वॉट्सअॅप आणि फेसबुकचा वापर जरा कमी करायला हवे याची प्रकर्षाने जाणीव झाली. हल्ली लोकांची सहनशीलता खूपच कमी झालेली आहे! कशावरून काय करतील याचा नेम नाही!
तसे सांगायचे म्हटले तर माझा फोन हा सार्वजनिक फोन आहे, म्हणजे घरात गेल्यावर बायकोपासून लपवणे वगैरे भानगड नाही. तिला माझा पासवर्ड माहित असतानाही फोन ज्यावेळी तिला पासवर्ड विचारतो त्यावेळी तिला तो अपमान वाटतो आणि ती उगाचच माझ्यावर चिडते. मग फोन उघडायला बंड्या तिला मदत करतो आणि ते दोघे मिळून माझे फेसबुक, वॉट्सअॅपचे चॅट बघत बसतात. त्यात काहीही संशयास्पद आढळल्यास सेन्सॉरप्रमाणे स्पष्टीकरणही मागतात. शेवटी मोबाईल कंपन्यानी लॉकिंग पॅटर्न किंवा पासवर्ड हे नेमके कुणासाठी काढलेत याचा आता संभ्रम होउु लागला आहे. आता बायकोशीच पासवर्ड शेअर केल्यावर त्या फिचरचा तसा फारसा उपयोग रहात नाही हे ज्याला समजले त्याला काय नाही उमगले?
व्यक्तिस्वातंत्र्य जपायला हवे म्हणून मी कधीही तिचा फोन बघत नाही पण तिला माझा फोन पाहू नकोस म्हटले की डाउुट येतो. “असे काय आहे की मी पाहिले तर चालणार नाही?” हे जेव्हा ती विचारते त्यावेळी माझ्याकडून काय उत्तराची अपेक्षा असते हे समजण्यापलीकडचे आहे. त्यात मला वस्तू जपून वापरायची सवय आहे. म्हणजे लहान मुलगी बाहुली पडली तर तिला उचलून “तुला लागलं तल नाही ना?” अशी विचारते, तसे माझा फोन पडला तर मी त्याला पटकन उचलून बाजूला ठेउुन देत नाही. त्याला कुठे लागले ते पहातो आणि तो व्यवस्थित आहे याची खात्री झाल्यावरच हळूच बाजूला ठेवतो.
हिचे मात्र फोनबद्दलचे निकष एकदम वेगळे आहेत. म्हणजे हातातून पडला तरी फोनला काहीही होता कामा नये हा पहिला. शिवाय भांडी घासत असताना हाताचे पाणी पुसूनही फोन उचलता येतो यावर तिचा विश्वास नाही. हात पुसेपर्यंत फोन कट झाला तर? हा तिचा सवाल असतो. बरं हिला येणारे फोनही काही हिलरी क्लिंटन किंवा सुषमा स्वराज असल्या मंडळींचे असायचे कारणच नाही. एवढ्या मोठया व्हीआयपीने फोन केल्यावर नाही उचलला तर पुन्हा त्या काही फोन करणार नाहीत वगैरे. फोन बाजूच्याच कुठल्यातरी बिल्डींगमधला असतो. तो ही “केक किती वेळ ओव्हनमध्ये फिरवत ठेवायचा?” किंवा “अहो, काल मला यायला जमलं नाही, यावेळची भिशी कुणाला लागली?” हे विचारायला!
एकदा चुकून मी वात्रटपणा केला होता. “तुम्हांला जोपर्यंत जळका वास येत नाही तोपर्यंत फिरवा.” असे मी तोंडातल्या तोंडात बोललेले असतानाही समोरच्या पक्षकारास कसे ऐकू गेले देव जाणे! तेव्हापासून तिच्या फोनला हात लावायचा नाही असा माझ्यावर निर्बंध आहे. वास्तविक माझी अवस्था उत्तर कोरियाप्रमाणे आहे. माझ्यावर खूप सारे निर्बंध आहेत. त्याची यादी किचनमध्ये एंट्री घेण्यापासून सुरु होते.
“माझ्या फोनला अजिबात हात लावायचा नाही,” असे ती एका बाजूने सांगते आणि फोन मिळेना झाला की “माझा फोन शोधून द्या ना हो!” असे टुमणे मागे लावते. ऐनवेळी हिचा फोन कुठे ठेवलाय ते सापडत नाही. हिच्या फोन ठेवण्याच्या जागाही अगदी विवक्षित असतात. देव्हार्यात देवाकडे डिस्प्लचे तोंड करून लोक वायरलेस चार्जिंग करतात की कुठल्या पौराणिक सिरीयलचा एपिसोड डाउुनलोड करतात हे मला तरी अजून समजलेले नाही. आपल्याला कुणीतरी “अमके कुठाय, तमके कुठाय?” असे विचारायला लागल्यावर आपण जसे “गळयात घालून फिर!” म्हणतो तशाही सुचना देउुन पाहिल्या पण काहीही उपयोग होत नाही. गुगलवाल्याने बहुतेक बायकांचे फोन शोधायलाच ‘फाईंड माय फोन’ नावाची कन्सेप्ट शोधून काढली असावी. कुणाचा फोन घरच्या घरी हरवला असल्यास लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर चालू करून तो लगेचच्या लगेच शोधता येतो. (गुगलवर याची सविस्तर माहिती दिलेली आहे. कसा म्हणून विचारायला फोन करू नये. आणि हो, मी पुण्याचा नाही! (पुणेकरांचा मान ठेउुन – ठाण्याचा आहे!)
ऐनवेळी तिच्या फोनच्या चार्जिंगचे बारा वाजलेच पाहिजेत हा दुसरा एक नियम आहे. कोंबडीचे पिल्लू आई हरवल्यावर जसे ‘चिऽव चिऽव’ करून ज्या आर्ततेने ओरडते, त्याप्रमाणे फोनमधून तसा आवाज आल्यावरच ही त्याला चार्जर लावते. त्याच्या आधी फोन चार्ज केला तर तो फुटेल अशी तिची समजूत आहे. चार्जिंगला लावलेल्या फोनला ती कधीही डायरेक्ट स्पर्श करत नाही. नाही नाही, गैरसमज करून घेउु नका. सेफ्टी प्रिकॉशन म्हणून नाही तर खाली वाकून तो उचलायचा कंटाळा म्हणून! पूर्वीच्याकाळी विहीरीतून किंवा आडातून लोक जसे पाणी शेंदायचे तसे त्या चार्जरच्या वायरला धरून ती चार्ज होत असलेला मोबाईल वर खेचते आणि तो हातात आला की आतापर्यंत मोबाईलला चार्ज करत असलेल्या बिचार्या पिनला काढून टाकते.
मी फोन केला की ती कधीही उचलत नाही. मग त्यानंतर तिला वेळ मिळाला, हातात फोन घेतल्यावर माझा मिसकॉल दिसला, तिचा मूड असला आणि तिला अगदीच बोअर होत असेल असे साडेतीन मुहुर्त जुळून आले तरच मला तिचा परत फोन येतो. तिने मात्र फोन केला की मी उचललाच पाहिजे अशी तिची इच्छा असते. नाही उचलला तर मिटींग असो किंवा काहीही, ही फोन करणे चालूच ठेवते. तिला “आय वुईल कॉल यू लॅटर ” वगैरे केलेल्या मेसेजवर अजिबात विश्वास नसतो.
आजकाल समोरासमोर भेटूनही तोंडातून चकार शब्द न काढणारे समाजसुधारणा, व्यक्तिमत्व विकास, अमक्यापासून सावध रहा आणि तमक्यापासून सांभाळा वगैरे मेसेज पाठवून भंडावून सोडत असतात. तसे काही मेसेज आल्यावर त्याचा आडोसा घेउुन “उजव्या कानाला मोबाईल लावून सतत बोलल्याने कॅन्सर होण्याचा जास्त धोका असतो. मेंदूला त्याने इजा व्हायची शक्यता असते, जरा डाव्या कानानेही बोलत जा.” असे सांगितले तरी त्याच्यावर विश्वास बसणार नाही. का तर मी सांगतोय म्हणून! विजा चमकत असताना खिडकीत जाउुन फोनवर बोलू नको म्हटलं तरी ऐकणार नाही. आता वीज सगळं सोडून माझ्यावर पडेल काय? या प्रश्नाला तुमच्याकडे काय उत्तर आहे?
चार्जिंगला फोन लावून गेम खेळत बसणे हा तर तिचा आणि पोरांचा छंद झाला होता. खूप सांगून झाले पण उपयोग नव्हता. असे केल्यास फोन फुटतो त्याचे व्हिडीओ इंटरनेटवरून शोधून काढून दाखवावे लागले. फोनचा स्फोट होउुन घरे जळतात ह्यासारख्या बातम्या दाखवल्यावर त्यांना पटलं की नाही माहित नाही, पण मी उगाच कटकट करतो म्हणून आता माझ्यासमोर तरी ते खेळत नाहीत.
सगळी जेवणे वगैरे झाल्यावर दिवसभर थकल्या भागल्या जीवाला आराम म्हणून डोके अंथरुणाला लावतोय की नाही तो पर्यंत ही फोन घेउुन बेडरुममध्ये येते. त्यानंतरचा साधारण अर्धा ते पाउुणतास हा वेळ केवळ तिचा आणि त्या मोबाईलचा असतो. मध्ये डिस्टर्ब केलेले तिला अजिबात आवडत नाही. कुणाला छंदही काय असतील ते सांगणे कठीण आहे. लोकांच्या वॉट्सअॅपची स्टेटस बघणे हा तिला छंद आहे. आजकाल तर स्टेटस म्हणून ते गाणे ठेवणारेही लोक आहेत. ही माझ्या एका मित्राचे स्टेटस वरचेवर चेक करत असते. आणि तो ही लेकाचा लग्न झाले आहे तरी “दिल दिवाना बिन सजना के माने ना…” अशी क्युट कार्टुन्सवाली स्टेटस ठेवतो. आमचे स्टेटस पहाल तर एक स्मायली चेहरा. हल्ली हल्ली तो तरी येतोय. पूर्वी तर “कान्ट टॉक, अर्जन्ट कॉल्स ओन्ली,” अशी असायची!
हिचा फोन हँग व्हायला लागला की ही माझ्यामागे “अहो हा बघा कसा करतोय,” म्हणून टुमणे लावते. म्हणजे फोननेही आमच्यासारखे वागायला पाहिजे अशी तिची अपेक्षा असते. बरं त्याची बिचार्याची काय चूक? तो ही मुद्दाम तसे करत नाही. त्याच्या वापराच्या ज्या काही कमाल आणि किमान अशा मर्यादा असतात त्या मर्यादेपर्यंत तो फोन खरोखरलतो की नाही हे पाहिले जाते. म्हणजे त्याचे काम करण्याचे कमाल तापमान पंचावन्न अंश सेल्सिअस असले तर तो फोन कँडी क्रश किंवा तसलाच कुठलातरी खेळ खेळून एवढा गरम करायचा की बिघडलेले पोट किंवा पाठ शेकायला त्याचा वापर आरामात करता यावा. ड्रॉप टेस्टला तर हिशेबच नाही! एवढे सगळे अत्याचार होउुनही तो बिचारा येईल त्यांचे कॉल वाजवत असतो.
परवा ती “मला नवीन फोन हवा.” म्हणून संप करायच्या मूडमध्ये दिसली. मी लगेच “माझा नवीन (म्हणजे मागच्या वर्षी घेतलेला!) तू घे आणि तुझा मला दे. वापरतो मी.” म्हणालो. मला माहित आहे, एकदा फोनची सवय झाली की मग दुसरा नवीन आलेला फोनही सुरवातीचे काही दिवस वैताग वाटतो. अशावेळी बॅक बटन दाबले की नवीन मेनू उघडतो आणि काहीतरी चुकले म्हणून अनडू करायला सर्वात डाव्या बाजूचे बटन दाबले की भरपूर सार्या खिडक्या उघडतात. सेटींगमध्ये घुसल्यावर तर आपला अभिमन्यूच होतो.
अचानक माझा असा बदललेला पवित्रा बघून तिने नवीन फोन घ्यायचा बेत तात्काळ रद्द केला त्यावेळी तिच्या फोनच्या स्क्रीनवर मला डोळा मारत असलेली मोठी स्मायली दिसल्यासारखी झाली.
© विजय माने, ठाणे
https://vijaymane.blog/