बोईंग कंपनीचे जनक विल्यम बोईंग यांचा जन्म १ ऑक्टोबर १८८१ रोजी झाला.
बोईंग कंपनीचा संस्थापक विल्यम बोईंग हा लाकडाचा व्यवसाय करायचा. त्यातूनच त्यानं बोटी बनवायचा धंदा सुरु केला आणि पुढे नौदलाने त्याचं काम बघून नौदलाकडून ऑर्डर्स मिळाल्या, त्यानंतर तो विमानं बनवायच्या व्यवसायात पडला तो कायमचाच… १९३३ साली त्यानं युनायटेड एरलाईन्ससाठी संपूर्ण धातूचे विमान बनवलं. हेच ते “बोईंग-२४७”. पुढे त्याला अमेरिकन लष्कराने नव्या पद्धतीची बॉम्बर विमाने बनवायची ऑर्डर दिली. हे काम कठीण होतं पण आव्हान स्वीकारायला बोईंग कधीच कचरत नसे.
त्याच्या या गुणधर्माच उदाहरण म्हणजे १९२९ मध्ये अमेरिकेत मंदीची लाट आली तेव्हा हवाई दलाला एक विशिष्ट तऱ्हेचे आणि अत्याधुनिक विमान हवं होतं. त्यावेळी ते विमान बनवणं म्हणजे अत्यंत खर्चिक बाब होती. तरी बोईंगनं यात सर्वस्व पणाला लावलं, कारण जर का डिझाईन तयार करून ते खपले नाहीत तर पूर्ण कंपनीच रसातळाला जाणार होती. बोईंगला चार इंजिनच्या विमानाची ऑर्डर मिळाली, आणि त्यानं ते बनवलेही. पण त्याची चाचणी सुरु असताना वैमानिकाच्या चुकीमुळे ते विमान कोसळलं आणि सरकारने बोईंगची ती ३५० विमानांची ऑर्डर रद्द केली. झालं, सर्वस्व पणाला लावलेल्या बोईंगची शेवटची घरघर सुरु झाली. पण यावेळी बोईंगला वाचवलं ते ‘पॅनम’ या विमान वाहतूक कंपनीने. पॅनम आणि बोईंग यांच्या संबंधातूनच जन्माला आलं ते ऐतिहासिक असं “बोईंग-७४७” विमान. ही विमाने बनवायला जो कारखाना काढला त्याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये घेतली गेली. विमान तयार करण्यासाठी एका खूप मोठ्या आणि खर्चिक अशा “विंड टनेल” ची गरज असते, असा विंड टनेल बनवणारी जगातली पहिलीच कंपनी ठरली.
दुसऱ्या महायुद्धाने बोईंगला बऱ्याच प्रमाणात साथ दिली. तिकडे माणसांचे जीव का जाईनात पण “फ्लाईंग फॉर्ट्रेस” म्हणून ओळखले जाणारे बी-१७ हे विमान आणि त्यानंतर आलेली बी-२४ आणि बी-२९ ही विमाने खूपच गाजली. नागासकीवर जगातील दुसरा अणुबॉम्ब पडला तो बोईंगच्या बी-२९ या विमानातूनच टाकला गेला होता. युद्धात बोईंग कंपनीला बराच नफा तर झालाच पण अमेरिकन हवाई दलाशी त्यांचे संबंध अधिक निकटचे झाले. त्यामुळे जेट इंजिन्सविषयी “आतली” माहिती मिळण्यास मदत झाली. स्वतःचा विंड टनेल आणि जर्मन जेट फायटर विमानाची इथ्यांभूत माहिती याच्या जोरावर बोईंगने बी-४७ आणि बी-५२ ही बॉम्बर विमाने तयार केली. यामुळे जेट तंत्रज्ञानात बोईंगच नाव खूपच गाजू लागलं. याच जोरावर पुढे बोईंगने ६०० कोटी डॉलर्स खर्चून २००० बी-४७ विमाने बनवली. ती एवढी यशस्वी झाली की अमेरिकन सरकारने त्यांना बी-५२ ही खूपच मोठ्या ताकदीची विमानं बनवायची ऑर्डर दिली.
प्रवासी वाहतुकीसाठी जेट इंजिन्स असलेली विमाने वापरायला अजून परवानगी नव्हती, कारण ती त्यासाठी सुरक्षित आहेत कि नाहीत याबद्दल चर्चा सुरु होत्या. त्यामुळे ती विमानं बनवली तरी स्वीकारली जातील की नाही ही फार मोठी रिस्क होती. यशस्वी झाले तर बोईंग फारच वर येणार होती आणि जर फसले तर सर्व कंपनीच बंद पडणार होती. पण बोईंगने ती रिस्क घेतली आणि बनवलं प्रसिद्ध असं बोईंग-७०७ विमान. यासाठी त्याकाळी २० कोटी डॉलर्स (आताच्या २०० कोटी डॉलर्सपेक्षा जास्त) खर्च होणार होते, तो खर्च वसूल व्हायलाच जवळपास १० वर्षे लागणार होती, त्यानंतर नफा मिळणार होता. पण तरी बोईंगने ही रिस्क घेतली. तेवढ्यात डग्लस कंपनीही स्पर्धेत उतरली आणि किमती पाडणं सुरु झाल. बोईंग-७०७ आणि डग्लस डीसी-८ या विमानांत अटीतटीची स्पर्धा होती. या सगळ्या स्पर्धेतून बोईंग-७०७ यशस्वीपणे बाहेर पडली. स्पर्धक दूर फेकले गेले.
२००० च्या दशकात बोईंगची परिस्थिती स्पर्धेच्या तुलनेने घसरली. तरी आजही बोईंग दिमाखाने आकाशात भराऱ्या मारत आहे.
विल्यम बोईंग यांचे २८ सप्टेंबर १९५६ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply